Tuesday, September 3, 2013

एका माणसाची पुण्याई


एका माणसाची पुण्याई



एक वैदिक ब्राह्मणाचे गाव होते . गावातील सर्व ब्राह्मण अत्यंत धर्मनिष्ठ , वेदाध्ययनात पारंगत होते . ते अखंडपणे विधिविधानांमध्ये मग्न असत . प्रत्येकाच्या घरापुढे एकेक अग्निकुंड होते . तो अग्नी सतत प्रज्वलित राहावा , याची ते काळजी घेत . एकदा एका ब्राह्मणाच्या घरातील पुत्रवधू रात्रीच्या वेळी घराबाहेर येते . अंधारामुळे ती घाबरते आणि घराजवळच्या अग्निकुंडात लघवी करते . सकाळी घरातील लोकांना अग्निकुंडात एक सोन्याची वीट दिसते . ती पाहून सर्व आश्चर्यचकित होतात . कुटुंबप्रमुखास या गोष्टीची शंका वाटते . तो घरातील सर्वांची कसून चौकशी करतो . तेव्हा सुनेला रात्री घडलेली हकीकत सांगावी लागते . पुन्हा अशी चूक करू नकोस , अशी ताकीद देऊन तो ती सोन्याची वीट घरात नेऊन ठेवतो . पण ही बातमी लगेच गावभर पसरते . पुढे गावात अधूनमधून चमत्कार घडू लागले . प्रत्येकाला सोन्याच्या विटा मिळू लागल्या . ही गोष्ट हळूहळू नित्याचीच झाली . त्यामुळे गावाचे रंगरूप बदलून गेले . गावाचे वैभव वाढले . लोक ऐषआरामात राहू लागले .

गावात एक गरीब ब्राह्मण जोडपे होते . या गरीब ब्राह्मणाच्या बायकोला आपणही दुसऱ्याप्रमाणे श्रीमंत व्हावे असे वाटायचे . ' मी अग्निकुंडाकडे जाते , आपणासही सोन्याच्या विटा मिळतील , आपले दारिद्र्य संपेल ', असा तिने नवऱ्याकडे लकडा लावला होता . पण तिचा नवरा तिला तसे करू देत नव्हता . तो बायकोला सांगतो , ' हे बघ , आपणही गावातील इतरांप्रमाणे वागू लागलो तर गाव उद  ्ध्वस्त होईल . आपण गरीब आहोत तोपर्यंतच गावाचे वैभव अबाधित राहील .' पण बायकोला ते पटत नव्हते . एकदा तो बायकोला म्हणाला , ' मी काय म्हणतो याची तुला खात्री करायची आहे का ? तर मग साऱ्या सामानाची आवराआवर कर , आपण हे गाव सोडून जाऊ .' त्याप्रमाणे ते जोडपे गाव सोडून निघून गेले .

एका आठवड्यानंतर गावातील सर्व ब्राह्मण एकमेकांशी भांडू लागले . अधिकाधिक सोन्याच्या विटा मिळाल्या पाहिजेत म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न सुरू होता . त्यामुळे प्रत्येकाच्या घरासमोरील अग्निकुंड विझून गेले . स्वार्थामुळे ते लोक एकमेकांच्या घरावर अग्नी फेकू लागले . सारा गाव जळून खाक झाला . गाव सोडून गेलेला दरिद्री ब्राह्मण बायकोला म्हणाला , ' आली ना माझ्या बोलण्याची प्रचीती ? एका माणसाची पुण्याई केवळ त्या एकट्या माणसाचे रक्षण करीत नसते , तर सा ऱ्या गावाला तारण्याचे सामर्थ्य त्याच्या पुण्याईत असते , हे लक्षात ठेव .'

आज प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे . पैसा मिळवण्याचे सर्व अवैध मार्ग अवलंबिले जाताहेत . भ्रष्ट मार्गांनी श्रीमंत होण्याची चढाओढ लागली आहे . पैसा हाच परमेश्वर अशी स्थिती झालीय . पण याही परिस्थितीत प्रामाणिकपणे , सत्याच्या मार्गाने जगणारे लोक समाजात आहेत . त्याची संख्या अत्यल्प असेल ; पण त्यांनी तो दिवा निष्ठेने तेवत ठेवला आहे . त्या छोट्याशा शांत तेवणाऱ्या दिव्यात सारे विश्व प्रकाशाने उजळून टाकण्याचे सामर्थ्य आहे . तो दिवा मात्र जपायला हवा .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive