मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात शक्ती मिल कम्पाउंडमध्ये फोटोग्राफर तरुणीवर बलात्कार करणा-या नराधमांचं आणखी एक कूकर्म आज उघडकीस आलं आहे. या पाच जणांपैकी तिघांनी आपल्यावरही सामूहिक बलात्कार केला होता, अशी तक्रार एका १९ वर्षीय तरुणीनं आज सकाळी भांडूप पोलीस स्टेशनात दाखल केली आहे. त्यामुळे आता या बलात्का-यांभोवती चौकशीचा फास आणखी आवळला गेलाय.
शक्ती मिल कम्पाउंडमध्ये २२ ऑगस्ट रोजी एका इंग्रजी मासिकाच्या छायाचित्रकार तरुणीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. स्वाभाविकच, मुंबई पोलिसांनी अत्यंत वेगानं या प्रकरणाचा छडा लावला होता आणि दोनच दिवसांत पाचही आरोपींना जेरबंद केलं होतं. त्यानंतर चौकशीदरम्यान, त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होतीच, पण याआधीही असं कृत्य केल्याचंही मान्य केलं होतं. त्यानंतर आज, त्यांच्या या दुष्कृत्याची शिकार ठरलेली एक तरुणी समोर आली आहे.
वृत्तछायाचित्रकार तरुणीवर बलात्कार करणा-या नराधमांनीच आपल्यावरही शक्ती मिल परिसरात ३१ जुलैला बलात्कार केल्याची तक्रार या तरुणीनं भांडूप पोलीस स्टेशनात नोंदवली. तिनं पाच आरोपींपैकी तीन जणांना ओळखलंही आहे. ३१ जुलैला ती आपल्या मित्रासोबत महालक्ष्मी परिसरात आली होती. वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकट म्हणून तिनं शक्ती मिल कम्पाउंडमधील रस्ता निवडला होता. परंतु त्याचवेळी, पाच नराधमांनी तिला निर्जनस्थळी ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. या घटनेनं घाबरलेल्या तरुणीनं बदनामी टाळण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. मात्र फोटोग्राफर तरुणीला देशभरातून मिळालेला पाठिंबा पाहून, तिनंही या नराधमांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचं धाडस केलंय.
दरम्यान, भांडूप पोलिसांनी हे प्रकरण एन. एम. जोशी पोलीसांकडे वर्ग केल्यानंतर तिथून या तक्रारीचा तपासही गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या तरुणीची वैद्यकीय तपासणी आणि अन्य कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय. या नराधमांविरुद्ध आणखी एक ठोस पुरावा मिळाल्यानं पोलिसांची बाजू भक्कम झालेय.
No comments:
Post a Comment