Monday, September 2, 2013

मना सज्जना राघवी वस्ती कीजे...

आपण जे जीवन जगतो त्याचे दोन स्तर स्पष्टपणे आपल्याला जाणवतात. (१) आपले शारीरिक स्तरावरील जीवन (२) आपले मानसिक स्तरावरील जीवन. शरीर स्थूल आहे तर मन सूक्ष्म आहे. मन वासना निर्माण करीत राहते तर शरीर त्या वासनेनुसार वागत राहते. मनाची वासना निर्माण करण्याची शक्ती प्रचंड असून शरीराची वासना भोगण्याची क्षमता मात्र मर्यादित आहे. यातून अनेक ताणतणाव निर्माण होतात. असा तणावग्रस्त मनुष्य भक्ती नीट करू शकत नाही. एवढेच नव्हे तर त्याचे सांसारिक जीवनदेखील नाना विवंचनांनी ग्रस्त असते. यावर समर्थांनी सुंदर उपाय सांगितला. जे मन नाना प्रकारच्या वासना निर्माण करते ते भगवंताच्या चिंतनात ठेवले तर शरीरधर्मानुसार गरजा पूर्ण होत राहतील.

समर्थांच्या मते माणसाने शरीराने आपले कर्तव्यकर्म पार पाडावे आणि मनाने भगवद्चिंतन चालू ठेवावे. प्रत्यक्षात व्यवहारात उलटे घडते. शरीराने मनुष्य पूजा करीत असतो आणि मनाने सांसारिक चिंतन करीत असतो. पुजाऱ्याच्या स्वप्नात भगवंत कधी येत नसेल. त्याला देणगीदारांचेच स्वप्न पडत असेल. हल्ली प्रवासाची साधने वाढली आहेत. माणसाच्या हातात पैसादेखील भरपूर आला आहे. माणसे सज्जनगड, आळंदी, पंढरपूर अशा तीर्थक्षेत्री सहली काढतात. पण बरोबर पत्त्याचा डाव, वृत्तपत्रे, क्रिकेटची कॉमेन्ट्री ऐकावी म्हणून ट्रान्झिस्टर असा सगळा सरंजाम बरोबर ठेवतात. भगवंताचे दर्शन घेताना आपले मन तरी स्थिर असते का? पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर जो आनंद ज्ञानोबा अथवा तुकोबांना झाला तो आपल्याला होतो का? म्हणून समर्थ म्हणतात,

मना प्रार्थना तुजला येक आहे। रघुनाथ थक्कीत होऊनि पाहें।

अवज्ञा कदा हो यदशीर् न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे।।

बहू हिंडता सौख्य होणार नाहीं। सिणावें परी नातुडे हीत काहीं।

विचारे बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।

माणसे परमार्थाच्या नावाखाली वृथा हिंडत राहतात. शरीरही हिंडत राहते आणि मनही फिरत राहते. आपण देवाचे फार करतो असा अभिमान वाढत जातो. पण प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही. एखाद्या देवस्थानासाठी पैसे गोळा करीत फिरणे म्हणजे भक्ती नव्हे. हे सारे रजोगुणी माणसाचे उद्योग आहेत. शेवटी अनावश्यक पैसा उभा राहिला म्हणजे विश्वस्तांचा कल उपभोगाकडे झुकतो आणि यातून नाना कटकटी आणि कोर्टकचेऱ्या देवस्थानात सुरू होतात.

माणूस सुखी व्हावा ही समर्थांची तळमळ आहे. परमार्थ ही माणसाला दु:खमुक्त करणारी गोष्ट आहे पण आज पारमाथिर्क माणसेच दु:खी आढळतात. कारण त्यांना परमार्थाचे मर्म कळलेले नसते. देवासंबंधी काहीतरी करीत राहणे आणि प्रत्यक्ष देवासाठी काही करणे यात खूप फरक आहे. शुद्ध भक्ती केली की आनंद मिळालाच पाहिजे. म्हणून समर्थ तळमळीने म्हणतात-

मना पाविजे सर्वही सुख जेथे। अती आदरें ठेविजे लक्ष तेथें।

विवेके कुडी कल्पना पालटीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।

अनेकदा माणसाला सुख हवे असते पण सुखाचा शोध चुकीच्या जागी सुरू असतो. या जगात कुणावरही कधीही अन्याय होत नाही. आपल्या वाईट कल्पना आपल्या दु:खास कारणीभूत ठरतात. माणसाने एकांतात बसून आपल्या सु:खाची आणि दु:खाची कारणे शोधावीत. ज्या गोष्टींमुळे आपण दु:खी झालो आहोत त्या गोष्टी करण्याचे माणसाने कटाक्षाने टाळले पाहिजे. प्रत्यक्षात विपरीत घडते. मानवी मनाच्या विचित्र दशेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात -

जेणेकरिता दु:ख जाले। तेचि पुन्हा मनी धरिले।

तेणे गुण प्राप्त जाल। पुन्हा दु:ख।।

दारुड्या दारूच्या व्यसनामुळे दु:खी होतो; पण हे दु:ख विसरण्यासाठी तो पुन्हा दारू पितो. भांडणं, मारामारी, कोर्टकचेऱ्या यातून काही कल्याण होणार नाही हे सर्वांना ठाऊक असते. तरीदेखील अनेक माणसे त्या मार्गाने जातात. म्हणून समर्थ कुडी वासना टाकून द्यायला सांगतात.

समर्थांच्या मते मनाची चंचलता कमी होण्यासाठी माणसाने हृदयात भगवंताची दृढ स्थापना केली पाहिजे. सूर्यफूल ज्याप्रमाणे सूर्याभिमुख असते, त्याप्रमाणे आपण भगवंताभिमुख असावे. म्हणून तुकोबा म्हणतात-

घेई घेई वाचे। गोड नाम विठ्ठलाचे।।

डोळे तुम्ही घ्या हो सुख। पहा विठ्ठलाचे मुख।।

तुम्ही आईका हो कान। विठ्ठलाचे गुण गान।।

तुकोबाराय मनाला विठ्ठलचरणी वस्ती करायला सांगतात.

- सुनील चिंचोलकर

लेखांक : ७२

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive