Balasaheb Thackray's Funeral Process on 9am
सकाळी १०.३०
बाळासाहेब अमर रहे!
'श्वासांची माळ तुटली, ध्यासाची कधीच नाही', अशा हळव्या भावना फेसबुक, ट्विटरवर आणि रस्तोरस्ती लागलेल्या होर्डिंग्जवरून व्यक्त होत असताना, शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या महायात्रेत 'बाळासाहेब अमर रहे'चा गजर केला. वांद्रे ते माहिम हे चार किलोमीटरचं अंतर गाठायला तब्बल दीड तासांचा कालावधी लागला. माहिमपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सैनिकांची गर्दी होती, पण माहीममध्ये, बाळासाहेबांचं पार्थिव असलेल्या वाहनापुढेही त्यांच्या चाहत्यांचा अथांग प्रवाह दिसतोय. त्यामुळे महायात्रेचा वेग मंदावलाय. महायात्रेच्या मार्गावरील प्रत्येक इमारतीची प्रत्येक खिडकी आणि गच्ची 'पॅक' होती. इतकंच नव्हे तर, दुकानांच्या शेडवर, पत्र्यांवरही तरुण उभे होते आणि बाळासाहेबांचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करत होते.
सकाळी १० वाजता
आदित्य-तेजसला रडू आवरेना...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खांदा देताना उद्धव ठाकरे यांना अश्रू आवरणं कठीण झालं होतं. त्यावेळी त्यांना सावरण्याचा प्रयत्न आदित्य-तेजस करत होते. पण, अंत्ययात्रा जसजशी पुढे सरकू लागली, तसतसा शिवसैनिकांचा बांध फुटू लागला आणि आपल्या आजोबांवरचं जनतेचं हे प्रेम पाहून आदित्य-तेजसलाही अश्रू आवरणं कठीण झालं. रश्मी ठाकरे यांचे डोळेही पाणावले.
सकाळी ९.३०
तुडुंब रस्ते, पाणावलेले डोळे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो शिवसैनिक महायात्रेत सहभागी झालेत. बाळासाहेबांचा चेहरा दिसावा, त्यांना हात जोडून वंदन करता यावं आणि आपल्या 'दैवता'चं रूप मनात साठवून ठेवता यावं यासाठी सा-यांचेच डोळे आसुसलेत. अर्थात, बाळासाहेबांचं हे रूप पाहून, त्यांच्यावर उदंड प्रेम करणा-या शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू दाटून येताहेत. त्यांच्या अलोट गर्दीमुळे, अर्ध्या तासात अंत्ययात्रेनं अर्धा किलोमीटर अंतरही पार केलेलं नाही. तिकडे, शिवाजी पार्कात सैनिकांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी फुलांनी सजवलेल्या खुल्या वाहनावर, त्यांच्या पार्थिवाशेजारी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई, स्मिता ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि इतर नेतेमंडळी आहेत.
सकाळी ९.००
बाळासाहेबांची महायात्रा निघाली!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. बाळासाहेबांचं पार्थिव सकाळी नऊ वाजता 'मातोश्री'बाहेर आणण्यात आलं. बाळासाहेबांचं पार्थिव भगव्या वस्त्रात लपेटलेलं असून, त्यांची ओळख ठरलेला गॉगल त्यांच्या डोळ्यांवर ठेवण्यात आलाय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना-भाजपचे प्रमुख नेते पार्थिवासोबत आहेत. बाळासाहेबांवर शासकीय इतमामात अंत्यंस्कार होणार असल्यानं 'मातोश्री'बाहेर पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. त्यांचं पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आलं आणि एका खुल्या वाहनातून बाळासाहेबांची अंत्ययात्रा निघाली. ही महायात्रा वांद्र्यापासून शिवाजी पार्कपर्यंत जाणार आहे.
No comments:
Post a Comment