Wednesday, November 14, 2012

सोने विक्री २० टक्क्यांनी वाढली

सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला असला , तरी दिवाळीत सोन्याला तितकीच मागणी असल्याचे या दिवाळीत दिसून येत आहे . सराफांच्या पेढ्यांमध्ये पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून यंदा सुवर्ण बाजारात तेजीचे वातावरण आहे . सुरक्षित आणि घसघशीत रिटर्न्स मिळत असल्याने सोने खरेदी करण्याचा कल वाढल्याचे सराफांचे म्हणणे आहे . धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपुजनापर्यंत नेमकी किती उलाढाल झाली याबाबत सराफ अधिकृतपणे माहिती देत नसले तरी मागील वर्षाच्या तुलनेत किमान २० टक्क्यांनी सोन्याची विक्री वाढल्याचे सांगण्यात आले .

दिवाळीत सोन्याचा बाजार तेजीत असतो . या मुहूर्तावर थोडे का होईना , पण अनेकजण सोने खरेदी करतात . वर्षांपूर्वी सोन्याचा भाव प्रती तोळा १६ हजार रुपये इतका होता . तो मागच्या दिवाळीत २३ हजारांवर गेला आणि यंदा तर सोन्याचा भाव पाहूनच डोळे दिपण्याची वेळ आली असली तरी सराफांची दुकाने मात्र गर्दीने फुलून गेली आहेत . दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या शिक्क्यांचे पूजन करण्यात येते . त्यासाठी काही जण नव्याने सोने खरेदी करतात तर काहीजण आहे त्यात भर घालण्यासाठी सोने खरेदी करतात . यावेळी सराफांप्रमाणेच पोस्ट विभागानेही कमी किंमतीत शुद्ध सोन्याची नाणी उपलब्ध करुन दिल्याने दिवाळीत या पोस्टाच्या कार्यालयांमध्ये खरेदीसाठी गर्दी उसळली होती . वास्तविक नाण्यांवरही मजुरी लागत असली , तरी हा खर्च दागिन्यांच्या तुलनेत अगदीच किरकोळ असतो . त्यातच ही नाणी मोठ्या प्रमाणात खपत असल्याने सराफ हा खर्च ग्राहकांकडून घेत नाहीत .

सोनेखरेदी हा गुंतवणुकीचाही सुरक्षित पर्याय असल्याने ग्राहक या मौल्यवान दागिन्याची खरेदी करत असल्याचे महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष अनिल वाघाडकर यांनी सांगितले . शेअर बाजारात गुंतवणूक केली तर चांगला नफा मिळतो असा अनुभव असला तरी सध्या मात्र हा बाजार थंड असल्यानेही सोने खरेदीत वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले . सोन्यातील तेजीपुढे प्लॅटिनमचे दागिने मात्र पुरते झाकोळून गेले असून या धातू ची मागणी फारशी वाढलेली नाही असे एका सराफाने सांगितले .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive