Thursday, November 15, 2012

जंगलात फुटलेलं पेव Grass Demon Skipper

पळसाला पानं तीन , तेरड्याचा रंग तीन दिवस अशा प्रकारच्या अनेक मराठी म्हणी झाडाफुलांशी संबंधित आहेत . पुरातन काळापासूनच या हिरवाईचं निरीक्षण करण्याची एक वृत्ती आणि कला आपणा सर्वांमध्ये दडली आहे . सध्या येऊरच्या जंगलात ' पेव फुटणं ' या म्हणीचा प्रत्यय येऊ लागला आहे .

योग्य अशी मोठ्या झाडाखाली सावलीची जागा बघून हे पेव बघता बघता वाढत चाललंय . फुलतंय म्हणेपर्यंत एकदम येऊरच्या जंगलात पेवाच्या पानाच्या हिरव्या पताका आणि फुलांचे लाल - पांढरे बावटे फडकायला सुरुवात झाली आहे .

' पेव ' दिसायला अगदी छोटं , कमरेएवढं वाढणारं असलं तरी herb या प्रकारात मोडता shrub या प्रकारात सामावतात . कारण त्याचा बुंधा अगदी सुरुवात होते तिथे लाकडी असतो . थोडा उंच झाल्यावर मात्र herb सारखा हिरवा , मांसल , मऊ लागतो . १५ ते ३० सेमीची कर्दळीसारखी मोठी पानं sessile म्हणजे बिनदेठाची असतात . देठावर इंचा - इंचाच्या अंतरावर लाल खूण असते . गोलाकार जिन्याच्या पायऱ्यांसारखी पानांची मांडणी असते . अशा पानाच्या रचनेचा फायदा असा की सर्व पानांना सूर्यप्रकाश मिळतो . एकतर थोड्याशा सावलीत वाढणारं हे झुडूप , त्यातून त्याच्याच एका पानाची सावली दुसऱ्या पानावर नको पेवाचा नाजूक पण लवचिक बुंधा फक्त spirally फिरतो . अशी ही चक्राकार चढत जाणारी सुंदर रचना तितकीच फायदेशीरसुद्धा . या shrub-herb ची फुलं फारच शोभिवंत असतात .

हिरव्या पानांमधून बाहेर आलेली लाल - किरमिजी रंगाची मॉडिफाइड पानं (bracts). त्यातून नरसाळ्यासारखे बाहेर डोकावणारं पांढरं फूल . उगवताना या नरसाळ्याची खालची नळी वरच्या बाजूला जाणारी पण फुललेलं फूल मात्र एका बाजूला वळून झुकलेलं असतं . आतून मध्यभागी पिवळा रंग असणाऱ्या या पांढऱ्या नरसाळ्याच्या कडा चुरगळलेल्या क्रेपच्या कागदासारख्या दिसतात .

Zingiberaceae म्हणजे आलं . याच्या कुळात समावेश होणाऱ्या या फुलालासुद्धा परागीभवनासाठी लांब सोंड (Probosis) असणाऱ्याची गरज असते . त्यामुळे पेवाच्या बरोबरीनेच Grass Demon Skipper ही मोठ्या प्रमाणावर येऊरच्या जंगलात उडताना दिसतात . या फुलपाखरालासुद्धा सावली प्रिय आहे . उडताना हे चपळ वाटलं तरी जमिनीपासून फार उंच जात नाही . स्वतःच्या शरीराच्या दुपटीपेक्षाही लांब असणाऱ्या सोंडेची कॉइलसारखी गुंडाळी करून फिरणारं हे फुलपाखरू फुलावर बसल्यावर पूर्ण सोंड उलगडत नेतं आणि पेवाच्या फुलाच्या नळीतून आत मधापर्यंत पोहोचतं .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive