Sunday, November 18, 2012

दुसरे शिवसेनाप्रमुख होणे नाही!

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... खणखणीत आवाजातील हे उद्गार आता कानी पडणार नाहीत... ठाकरी भाषेचे आणि कुंचल्यांचे फटकारे आता कुणाला घायाळ करून सोडणार नाहीत... शिवसैनिकांत भगवी सळसळ निर्माण करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वादळ पुन्हा घोंघावणार नाही... हिंदुहृदयसम्राट हे सिंहासन धारण करणारे आता कुणीच असणार नाही, कारण दुसरे शिवसेनाप्रमुख होणे नाही... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार, पत्रकार, वक्ते, रसिक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकेका पैलूचा केवळ ओझरता आढावा घ्यायचा म्हटले, तरीही कित्येक पाने खर्ची घालावी लागणार. त्यामुळे ठाकरे यांचा जीवनपट मर्यादित शब्दांत उलगडणे हे आव्हान तर आहेच पण अपयशाची टीका ओढवून घेण्यासारखे आहे. त्यामुळे काही प्रमुख घटना आणि पैलू यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
BT.jpg 
शिवसेनानिर्मितीची प्रेरणा

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे तेज, १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचे कारुण्य, आचार्य अत्रे-प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखणी-वाणीची गर्जना आणि मराठी माणसांच्या राज्यात मराठीवर होणाऱ्या अन्यायाची धुम्मस या मुशीत १९ जून १९६६ रोजी शिवसेनेचा जन्म झाला. 'माझा बाळ आजपासून मी या महाराष्ट्राला अर्पण केला' या प्रबोधनकार ठाकरे यांच्या आश्वस्त शब्दांनंतर तमाम मराठी माणसांना आपला नेता गवसला. त्याला त्यांनी तब्बल चार दशकांहून अधिक काळ हृदयसिंहासनावर बसवले. बाळासाहेबांवर लोकांनी मनापासून प्रेम केले किंवा कडवट टीका केली. देशभरात ४३ प्रादेशिक पक्ष असून त्यामधील बहुतांश पक्षांच्या नेत्यांचे उद्दीष्ट्य हे सत्ताप्राप्ती हेच असते. मात्र, सत्तेच्या कुठल्याही पदावर बसता आपला करिष्मा टिकवून ठेवणारे ठाकरे हे एकमेव नेते आहेत. बाळासाहेब यांच्या बोलण्या, वागण्यात आणि लिखाणात कमालीची विसंगती राहिली आहे. काहीवेळा तर आपण आखून दिलेल्या पक्षाच्या धोरणांची मर्यादा खुद्द ठाकरे यांनी ओलांडली. तरीही शिवसैनिकांची त्यांच्यावरील माया कमी झालेली नाही. शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख हे नाते कायमच गूढरम्य असे राहिले आहे.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर

मराठी माणसावर नोकऱ्यांमध्ये होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा हाती घेऊन शिवसेनेने राजकारणात पहिले पाऊल टाकले. वेगवेगळ्या कंपन्यांमधील नोकरभरतीत मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध 'मार्मिक'मधून वाचा फोडली जाऊ लागली. त्याचवेळी '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' हे शिवसेनेचे ब्रीद राहिल्याने अडीअडचणीला धावून येणारा तो शिवसैनिक ही संकल्पना लोकांच्या मनात दृढ झाली. बेळगाव, कारवारसह या सीमावर्ती भागातील रहिवाशांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा या करिता घनघोर संघर्ष झाला. मोरारजी देसाई यांची मोटार शिवसैनिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. सत्यकांत पेणकर या शिवसैनिकाच्या अंगावरून गाडी गेली. चार दिवस मुंबई पेटत राहिली. पोलिस गोळीबारात ६८ ठार झाले. १९७३ मध्ये विधानसभेने सीमाप्रश्नी एकमताने ठराव संमत केला. आजतागायत हा प्रश्न सुटला नसला, तरी जेव्हा जेव्हा सीमावर्ती भागातील रहिवाशांवर दमनशक्तीचा वापर केला गेला तेव्हा तेव्हा ठाकरे यांनी लेखणी-वाणीने कर्नाटक सरकारचे वाभाडे काढले आहेत.

१९८१ साली गिरणी कामगारांचा संप सुरू झाला. कष्टकरी माणसांचे शहर या मुंबईच्या ओळखीला ग्रहण लागले. गिरण्यांच्या जमिनी मोकळ्या होऊन इथे टॉवरचे शहर वसायला प्रारंभ झाला. १९६० साली ३९ टक्क्यांहून अधिक असलेला मुंबईतील मराठी माणूस हळूहळू कमी होऊ लागला. १९८७ साली शिवसेनेने धोरणीपणे हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला. डॉ. रमेश प्रभू यांची पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर लढवली. हिंदुत्त्वाचा आधार घेऊन निवडणूक लढवल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांचा मताचा अधिकार सहा वर्षांकरिता काढून घेण्यात आला. हिंदुत्ववादी राजकीय विचारसरणी थेट स्वीकारण्यापूर्वी कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याचा वाद किंवा महाडमधील महिकावतीच्या मंदिराचा तिढा अशा निमित्तांनी शिवसेनेने मुस्लिम विरोधाची भूमिका घेतली होती. मात्र अयोध्येतील बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यावर मुंबईत उसळलेल्या दंगलीत शिवसेनेने बजावलेल्या भूमिकेमुळे ठाकरे हे हिंदूसंरक्षक अर्थात हिंदूहृदयसम्राट झाले. मराठी आणि हिंदुत्व या दोन परस्परपुरक की परस्परविरोधी भूमिका आहेत यावरून नेहमीच शिवसेना आणि राजकीय चिकित्सक यांच्यात मतमतांतर राहिले आहे. शिवसेनेत डॉ. हेमचंद्र गुप्ते, दत्ता प्रधान, मनोहर जोशी, सुधीर जोशी अशी नेमस्त मंडळी होती, तशीच अशोक कुळकर्णी, चंद्रकांत वाईरकर, विशा खटाटे, भाई बंडू शिंगरे बंधू, नायडू बंधू अशी रस्त्यावर राडे करणारी मंडळीही होती. कालांतराने काही नेमस्त मंडळी दुरावली आणि शिवसेनेचा जहाल चेहरा हाच मुख्य चेहरा बनला. शिवसेनेतील विठ्ठल चव्हाण, जयंत जाधव, खिमबहाद्दूर थापा अशा अनेकांच्या ऐंशी नव्वदच्या दशकात हत्या झाल्या. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे स्वीकारल्यावर पुन्हा नेमस्त मंडळींचा प्रभाव वाढला.

दाक्षिणात्य, कम्युनिस्ट, दलित, मुस्लिम संघर्ष

शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत दाक्षिणात्य, कम्युनिस्ट, दलित आणि मुस्लिम यांच्याशी शिवसेनाप्रमुखांचा वेळोवेळी संघर्ष झाला. जून १९६६ च्या मार्मिकच्या अंकात 'युंडू-गुडुं'चे मराठी माणसांच्या हक्कावरील आक्रमण परतवून लावण्याकरिता शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरू होणार, असे आवाहन ठाकरे यांनी केले होते. 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' ही शिवसेनेची घोषणा त्यावेळी गाजली होती. दक्षिणेत हिंदी चित्रपटांना बंदी घातली, तर मुंबईत तामिळ निर्मात्यांचे चित्रपट चालू देणार नाही, असा आवाज ठाकरे देत असल्यानेच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिलीपकुमारपासून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत सर्व मातब्बर कलाकार मातोश्रीचरणी लीन झाले.

कम्युनिस्टांचे वाढते वर्चस्व काँग्रेसवाल्यांच्या डोळ्यात खुपत होते. शिवसेना स्थापन झाल्यावर कम्युनिस्टांच्या वर्चस्वाला चाप बसवण्याकरिता काँग्रेसने त्यांना पुरेपुर रसद पुरवली. १३ ऑगस्ट १९६० रोजी मार्मिकचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. पुढेपुढे तर कम्युनिस्ट शिवसेनेची संभावना 'वसंतसेना' (तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या वळचणीला राहिलेली शिवसेना) असा करीत असत. शरद पवार बाळासाहेब ठाकरे यांनी सोयीस्करपणे परस्परपुरक राजकारण केल्याचे अलीकडच्या काळातील अनेक दाखले आहेत. २८ डिसेंबर १९६७ रोजी परळ नाक्यावरील कम्युनिस्ट युनियनचे कार्यालय असलेली दळवी इमारत शिवसैनिकांनी जाळली आणि संघर्षाची ठिणगी पडली. कृष्ण मेनन यांना धूळ चारण्याकरिता कै. . गो. बर्वे आणि ताराबाई सप्रे यांना शिवसेनेने निवडणुकीत पाठिंबा दिला होता. जून १९७० रोजी कॉ. कृष्णा देसाई या आमदाराचा खून झाला. कम्युनिस्टांच्या रेडगार्डला आव्हान देण्याकरिता शिवसेनेचा भगवागार्ड सुरू झाला. दलित आणि शिवसैनिक यांचेही राडे झाले आहेत. १९८९ साली चेंबूरच्या सिद्धार्थनगर येथे मेळावा संपवून निघालेल्या शिवसैनिकांवर हल्ला झाला आणि संघर्षाला तोंड फुटले. दलित पँथर फॉर्मात असताना वरळीच्या बी.डी.डी. चाळीत भागवत जाधव या कार्यकर्त्याच्या डोक्यात पाटा टाकून त्याची हत्या करण्यात आली. या वरळी दंगलीत शिवसैनिक दलितांच्या विरोधात सक्रिय होते. १९९२ मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतर वादात शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लक्ष्य केल्याने मराठवाडा धगधगू लागला. काळाचा महिमा असा की, दलित पँथरचे तेजतर्रार नेते नामदेव ढसाळ यांनी आपला राजकीय वानप्रस्थाश्रम शिवसेनेची स्तुतीपर कवने लिहिण्यासाठी खर्च घालण्यात धन्यता मानली, तर रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना सोबत घेऊन सत्तेकरिता युतीला महायुतीचे रुप देणे ही शिवसेनेची गरज बनली.

१९८४ मध्ये भिवंडी, ठाणे, कल्याण आणि मुंबईत जातीय दंगली भडकल्या त्यावेळी शिवसेनेने हिंदूच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतली. ठाकरे यांनी महंमद पैगंबरांचा अवमान केल्याच्या निमित्ताने तो हिंसाचार उसळला होता. हिंदुस्थानात राहायचे तर 'वंदे मातरम' म्हटलेच पाहिजे किंवा रस्त्यावरील नमाज आणि मशिदींवरील भोंगे उतरवले जावेत, अशा मुद्द्यांवरून बाळासाहेब जहाल विधाने करीत. यामुळे १९८६ ते ८९ (शिवसेनेने हिंदुत्त्वाची भूमिका जाहीरपणे घेईपर्यंत) मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई येथे जातीय दंगली झाल्या. अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आला तेव्हा तर देशभरात धार्मिक उन्मादाला ऊत आला होता. डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशिद कोसळली आणि मुंबईत डिसेंबर ९२ जानेवारी ९३ अशा दोन टप्प्यांत भूतो भविष्यती अशा दंगली झाल्या. या दंगलींचा बदला घेण्याकरिता १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत १३ बॉम्बस्फोट झाले. या धार्मिक तेढीतून उसळलेल्या हिंदुत्वाच्या लाटेवर शिवसेना-भाजप युती स्वार झाली महाराष्ट्रात त्यांची सत्ता आली. त्यानंतर अतिरेकी संघटनांनी भारताविरुद्ध जिहाद पुकारला. बॉम्बस्फोट, रक्तपात या वरचेवर घडणाऱ्या घटना झाल्या. उत्तर भारतीयांचा मुंबईतील वाढता टक्का ओळखून शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मी मुंबईकर' अभियान सुरू केले होते. मात्र उत्तर भारतीयांचे लांगुलचालन करण्याच्या या राजकारणाला राज ठाकरे यांनी विरोध करीत शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले लक्ष्य उत्तर भारतीय ठरले.

शिवसेना आणि सत्ता

शिवसेनेला स्थापनेनंतर वर्षभरातच सत्तेचे दर्शन घडले. १३ ऑगस्ट १९६७ रोजी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सेनेचे अधिकृत पुरस्कृत असे २१ उमेदवार विजयी झाले आणि ठाण्याचा गड सर झाला. २६ मार्च १९६८ रोजी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ४२ जागा मिळाल्या. कॉ. कृष्णा देसाई यांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परळ पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक हे सरोजिनी देसाई यांचा पराभव करून विजयी झाले. १९७२ मध्ये प्रमोद नवलकर निवडून गेले. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या यशाचा आलेख चढता राहिला. १९८५ सालच्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेचे ७५ नगरसेवक विजयी झाले. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५२ तर भाजपला ४२ जागा मिळाल्या. बरोबर पाच वर्षांनंतर १९९५ मध्ये शिवसेनेला ७६ तर भाजपला ६५ जागा मिळाल्याने महाराष्ट्रातील विधानसभेवर भगवा फडकला. राज्यातील सत्तेमुळे मुंबई महापालिकेतील गमावलेली सत्ता १९९७ साली शिवसेनेने पुन्हा काबीज केली. मात्र १९९९ साली राज्यातील सत्ता गमावल्यापासून गेल्या १३ वर्षांत शिवसेनेला पुन्हा सत्तेचा सोपान गाठता आलेला नाही. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडून भाजपने हिसकावून घेतले आहे. फुटीचा शाप लागलेली शिवसेना कमकुवत झाली आहे. १९९७ साली मुंबई महापालिकेत १०८ जागा मिळविणाऱ्या शिवसेनेचे सध्या ७५ सदस्य आहेत.

फुटीचा शाप

शिवसेनेच्या सुरुवातीपासून काही नेते बाळासाहेबांपासून दुरावले तर काहींना त्यांनी स्वतःहून दूर केले. यामध्ये बळवंत मंत्री, सुधाकर लोणे, बंडू शिंगरे, डॉ. हेमचंद्र गुप्ते, दत्ता प्रधान, अरुण दाभोळकर, माधव देशपांडे, विलास गुंडेवार, अशोक देशमुख, मोरेश्वर सावे, डॉ. रमेश प्रभू, सतीश प्रधान, सुबोध मोहिते, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, सुरेशदादा जैन, बाळासाहेब विखे-पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, दशरथ पाटील, संजय निरुपम, भास्कर जाधव, शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर यांचा मुख्यत्त्वे समावेश आहे. याखेरीज छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी केलेल्या बंडाचा विशेष स्वतंत्रपणे उल्लेख करणे गरजेचे आहे. तत्पूर्वी ठाणे शहरातील एक घटना येथे नमूद करणे गरजेचे आहे. ठाण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्याने पराभव झाला. त्यानंतर श्रीधर खोपकर या नगरसेवकाची भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. ही घटना १९८७-८८ सालातील. त्यामुळे शिवसेनेत फुटीची शिक्षा मृत्यू असते, हे शिवसैनिकांच्या मनावर कोरले गेले. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मनोहर जोशी यांना दिल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी मंडल आयोगाला शिवसेनेने केलेला विरोध पटल्याने शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. भुजबळ आपल्यासोबत १८ आमदार घेऊन बाहेर पडले. त्यावेळी सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते. भुजबळ भूमिगत असल्याने शिवसैनिक त्यांचा माग काढत होते. अत्यंत नाट्यमयरित्या भुजबळ नागपूरमध्ये प्रकट झाले. भुजबळ यांनी शिवसेना सोडल्याचा जबर धक्का शिवसेनाप्रमुखांनाही बसला. मात्र १९९५ मध्ये युतीची सत्ता आली. माझगावमध्ये बाळा नांदगावकर या तरुणाने भुजबळ यांचा पराभव करून जाएंट किलर हा किताब मिळवला होता. भुजबळ हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते झाले. मनोहर जोशी यांच्या विरोधात भुजबळ यांनी आघाडी उघडली. दादर येथील रहिवासी रमेश किणी यांची घर रिकामे करून घेण्याकरिता हत्या झाल्याचे प्रकरण भुजबळ यांनी उपस्थित करून भारतीय विद्यार्थी सेनेचे तत्कालीन अध्यक्ष राज ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शिवसेना आणि भुजबळ यांच्यातील घनघोर संघर्षात भुजबळांच्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केला, तर सूडाने पेटलेल्या भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भडक भाषणांकरिता अटक केली. कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपेक्षा झाल्यावर भुजबळ-ठाकरे यांच्यातील वैरभाव संपुष्टात आणण्याकरिता उभयतांनी पावले उचलली. आता भुजबळांच्या मनात पुन्हा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख यांच्याबद्दलचे ममत्व जागृत झाले आहे. गणेश नाईक यांचे नवी मुंबईतील ऐश्वर्य वाढते वर्चस्व यामुळे त्यांना शिवसेना सोडावी लागली.

तत्कालीन महापौर सुषमा दंडे यांनी नाईक यांच्या दगडांच्या खाणी बांधकाम क्षेत्रातील त्यांचे हितसंबंध याची माहिती बाळासाहेबांपर्यंत पोहोचवली. शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त दिलेली कोट्यवधी रुपयांची देणगी आणि शेकडो अॅम्ब्युलन्स यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. नाईक यांनी शिवसेनेवर तुळशीपत्र ठेवले. नारायण राणे हे एकेकाळी कट्टर शिवसैनिक होते. ठाकरे यांना असलेल्या सुरक्षा कवचात त्यांचा समावेश होता. नगरसेवक झाल्यावर राणे यांच्याकडे सलग तीनवेळा बेस्ट समितीचे अध्यक्षपद सोपवून ठाकरे यांनी त्यांच्यावरील विश्वास प्रकट केला होता. राज्यात युतीची सत्ता असताना प्रारंभी दुय्यम दर्जाचे खाते सांभाळणाऱ्या राणे यांच्याकडे महसूल खाते सोपवले गेले आणि त्यांच्यात मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा प्रबळ झाली. मनोहर जोशी यांना आशिष कुळकर्णी यांच्याकरवी एका ओळीची चिठ्ठी पाठवून मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्यानंतर राणे यांच्या गळ्यात जेमतेम सहा महिन्यांकरिता मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. १९९९ साली निवडणूक निकालानंतर पुन्हा युतीची सत्ता येऊ नये याकरिता भाजपच्या गोपीनाथ मुंडेंकडून प्रयत्न झाले. त्यानंतरही राणे यांनी हार पत्करली नाही. काँग्रेसचे आमदार फोडून मातोश्री क्लबवर नेऊन ठेवण्यात आले. मात्र सरकार पडले नाही. २००४ च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्याकरिता राणे यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची इर्ष्या उघड झाल्याने राणे-ठाकरे संघर्षाला सुरुवात झाली. अखेर राणे यांची बाळासाहेबांनी हकालपट्टी केली. राणे हे काँग्रेसमध्ये दाखल झाले तरीही त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.

राज हे बाळासाहेबांचे राजकीय वारस ठरणार असेच संकेत मिळत होते. बाळासाहेबांसारखीच वाणी, कुंचल्याचे फटकारे आणि हावभाव. राज शिवसेनेत सक्रिय होते तेव्हा उद्धव ठाकरे यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. अचानक उद्धव यांचा शिवसेनेत उदय झाला आणि ठाकरे परिवारातील संघर्षाला तोंड फुटले. २००३ साली महाबळेश्वर येथील शिबिरात उद्धव यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर झाला. हा ठराव राज यांनी मांडला होता हा निर्णय झाला तेव्हा आपण तेथे हजर नव्हतो, असे शिवसेनाप्रमुखांनी जवळपास प्रत्येक सभेत स्पष्ट केले. उद्धवला मी तुमच्यावर लादले नाही. हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? हे विचारले होते, असे ठाकरे सांगत राहिले. उद्धव यांच्याकडे संघटनात्मक कामाची चिकाटी आहे तर राज यांच्याकडे करिष्मा शिवसैनिकांना प्रभावित करणारे वक्तृत्व आहे. दोघांनी मिळून जर शिवसेना पुढे नेली असती तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. मात्र 'माझ्या विठ्ठलास बडव्यांनी घेरले आहे', अशी टीका करीत राज यांनी शिवसेना सोडली. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' पक्ष स्थापन केला. लोकसभा विधानसभा निवडणुकीत राज यांच्या करिष्म्याने शिवसेनेलाच नव्हे तर भाजपलाही दणका दिला. मनसेचे १२ आमदार सध्या सभागृहात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे शिवसेनेला दणका देणार, अशी चिन्हे दिसत असतानाही काठावरील बहुमत घेऊन शिवसेनेने सत्ता राखली. बाळासाहेब उद्धव यांच्या आजारपणात राज हे राजकारण बाजूला ठेवून नात्याची जबाबदारी पाळण्याकरिता मातोश्रीवर गेले. आता नात्यातील ओलावा ठाकरे बंधूंना एकत्र आणतो की राज यांच्या करिष्म्याच्या चुंबकाकडे शिवसैनिक आकर्षित होतात हे येता काळ ठरवणार आहे.

युतीमधील घडले-बिघडले

महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती १९८४ सालापासून कायम आहे. देशात एवढा दीर्घकाळ दोन पक्ष एकत्र राहिल्याचे दुसरे उदाहरण सापडणे विरळाच. १९८४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार भाजपच्या कमळ निशाणीवर लढून पराभूत झाले. १९८९ मध्ये ही युती बळकट झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन हे या युतीचे शिल्पकार होते. १९९० साली युतीच्या झाडाला यशाची फळे लगडली. राज्यात युतीचे सरकार असतानाही युतीमध्ये वरचेवर धुसफूस सुरू असायची. वेळोवेळी ठाकरे-महाजन यांच्या भेटीतून हे संघर्ष निस्तरले जात होते. १९९९ मध्ये युतीची सत्ता गेल्यानंतर तर उभयतांमधील वाद विकोपाला जाऊ लागले. २००६ साली महाजन यांची त्यांचे बंधू प्रवीण यांनी गोळ्या घालून हत्या केली. महाजन यांच्या हत्येनंतर २००७ मध्ये युतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. लालकृष्ण अडवाणी यांच्या दरबारात तो वाद मिटवला गेला. मात्र उद्धव ठाकरे-नितीन गडकरी, मनोहर जोशी-गोपीनाथ मुंडे अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या अहंकारामुळे युती वरचेवर संकटे, आरोपप्रत्यारोप यांच्या वावटळीत सापडते. हे कमी म्हणून की काय, शिवसेना आणि भाजप यांच्या अंतर्गत राजकारणामुळेही आज युती खिळखिळी झाली आहे. नारायण राणे, राज ठाकरे यांच्या फुटीने शिवसेना कमकुवत झाल्याचा भाजपचा दावा शिवसेनेला मान्य नाही, तर शिवसेनेखेरीज भाजपचे अस्तित्त्व शून्य आहे हे शिवसेना नेतृत्वाचे मत भाजपच्या पचनी पडत नाही हेच युतीमधील संघर्षाचे मूळ आहे. राज्यातील सत्तेची चव चाखलेले युतीचे नेते पुन्हा सत्ता हाती येत नसल्याने अस्वस्थ आहेत. त्यामुळेच युतीमध्ये रामदास आठवले यांचा समावेश करून त्याला महायुतीचे स्वरुप दिले गेले. आता राज ठाकरे यांना महायुतीत सामील करण्याकरिता भाजपचा आग्रह सुरू आहे. उद्धव आणि राज हे या प्रयत्नांना कसा प्रतिसाद देतात त्यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे. राज यांचा करिष्मा मान्य करायला उद्धव यांचे मन तयार नाही, तर शिवसेना-भाजप युतीत सर्वात छोटा मित्र म्हणून सामील होण्याऐवजी भाजपचा बरोबरीचा पार्टनर म्हणून सहभागी होण्याची राज यांची लपून राहिलेली महत्त्वाकांक्षा या दोलायमान स्थितीत युती आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी या सर्व प्रश्नांची उत्तरे आता ठाकरे बंधूंकडून दिली जातील.

बाळासाहेब आणि वाद

बाळासाहेब आणि वाद यांचा सिलसिला अखंड सुरू राहिला. फटकळ स्वभावामुळे बाळासाहेबांनी अनेकांना दुखावले. आचार्य अत्रे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चिडलेल्या बाळासाहेबांनी अत्रेंचा उल्लेख वरळीचे डुक्कर, असा केला होता. पु. लं. देशपांडे यांनी युतीची सत्ता असताना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार स्वीकारताना हुकुमशाही प्रवृत्तीवर कोरडे ओढताच 'झक मारली आणि यांना महाराष्ट्र भूषण दिले. जुनी पुलंपाडून नवी पुलं बांधली पाहिजेत' अशी टीका ठाकरे यांनी केली होती. दादर येथील साहित्य संमेलनाची संभावना बैलबाजार अशी केली होती. यामुळे संतापलेले संमेलनाध्यक्ष वसंत बापट यांनी 'सरकारच्या मदतीवर थुंकतो', असे संतापजनक उदगार काढले. शतकवीर सचिन तेंडुलकर हाही ठाकरी शैलीच्या फटकाऱ्यातून सुटला नाही. ठाकरे यांनी साहित्यिक, पत्रकार, न्यायालय यांच्यावर तोंडसुख घेतल्याची अशी असंख्य उदाहरणे देता येतील. व्यक्तींना नावं ठेवणे ही तर खास ठाकरेशैली होती. अण्णा हजारे यांचा उल्लेख वाकड्या तोंडाचा गांधी, माजी पंतप्रधान देवेगौडा यांची संभावना म्हैसूर सँडलसोप, शरद पवार यांना बारामतीचा म्हमद्या किंवा मैद्याचे पोत अशी शेलकी विशेषणे लावणे हा तर त्यांच्या डाव्या हातचा मळ होता. छगन भुजबळ यांचा लखोबा असा वरचेवर उल्लेख ठाकरे यांनी केल्यावर भुजबळ यांनी टी. बाळू असा ठाकरे यांचा उल्लेख करण्यास सुरूवात केली. नारायण राणे यांचाही नारोबा असाच उल्लेख ठाकरे यांनी केला. मोरारजी देसाई, पुष्पा भावे, उषा मेहता, मेधा पाटकर, अॅलेक पदमसी, बी. जी. देशमुख, अबू आझमी अशी अनेकांची बारशी ठाकरे यांनी जाहीर सभेत केली. मात्र त्याच ठाकरे यांच्यावर कुणी एका शब्दानेही टीका केली तर त्याच्यावर ठाकरी शैलीत प्रहार करण्यास त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांनी व्यक्ती पाहून मतदान करण्याचे आवाहन केल्याचे मुंबईकरांना आवडल्याने शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत कोळी समाजावर केलेल्या टीकेचे परिणाम शिवसेनेला भोगावे लागले होते. १९७५ साली ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिल्याने तर शिवसेनेला मोठ्ठा धक्का बसला. १९८० साली शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देत त्या बदल्यात विधान परिषदेच्या दोन जागा घेतल्या. १९७९ साली मुस्लिम लीगबरोबर ठाकरे यांनी युती केली. लीगचे नेते जी. एम. बनातवाला आणि ठाकरे यांनी सरकारविरुद्ध संयुक्त मोर्चा काढला होता. मात्र ही युती टिकली नाही. १९८१ साली गिरणी कामगारांचा संप सुरू झाला तेव्हा या कामगारांचे नेतृत्व हाती घेण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला. मात्र कामगार त्यांच्या मागे आले नाहीत. शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येऊनही कामगार बधला नाही. राज्यात युतीचे सरकार असताना वादग्रस्त एन्रॉन प्रकल्प पुन्हा मंजूर करण्याच्या कृतीनेही ठाकरे वादात सापडले होते. मुंबईतील दंगलीबाबतचा श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल सभागृहात मांडून ठाकरे यांना क्लीनचिट दिल्यामुळेही ठाकरे यांच्यावर टीका झाली होती. मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेला फटका बसल्यावर सामनातील अग्रलेखात 'मराठी माणसानेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला' अशी टोकाची भाषा ठाकरे यांनी वापरली होती. अलीकडच्या काळात शिवसेनाप्रमुखांनी भाजपचा विरोध डावलून काँग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला.

बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट मोजक्या शब्दांत उलगडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. हजारो शिवसैनिकांना पोरके करून शिवसेनाप्रमुख गेल्याने आता साहेब ही हाक ते कुणाला मारणार? आणि उद्धव राज यांचा पिलगा (हे बाळासाहेबांचे घरात हाक मारण्याचे नाव) गेल्याने कसोटीच्या क्षणी ते विश्वासाने कुणाच्या कुशीत विसावणार? या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित ठेवून बाळासाहेब निघून गेलेत...

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive