Wednesday, November 21, 2012

२६/११… फ्लॅश बॅक!

मुंबईवर झालेला आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असे २६ / ११ चे वर्णन करता येईल . पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या देखरेखीखाली आखलेल्या या भीषण हल्ल्यात १६८ जणांचा बळी गेला , ३०८ जण जखमी झाले . या कटात सामील असलेल्या अजमल आमीर कसाब याच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले . कराचीतल्या आयएसआयच्या कण्ट्रोल रुममधून मुंबईत घुसलेल्या ११ दहशतवाद्यांना हिंदीतून सूचना देणारा अबु जुंदाल हा दहशतवादीही सध्या क्राइम ब्रँचच्या ताब्यात आहे .
0 कराचीमार्गे एका स्पीड बोटीने कुलाबा येथे हे ११ दहशतवादी दाखल झाले . एके ४७ , हॅण्डग्रेनेड अशा घातक शस्त्रांनी ते सज्ज होते . बराच काळ लढण्याची तयारी ठेवण्यासाठी त्यांनी सोबत सुकामेवाही आणला होता . छत्रपती शिवाजी टर्मिनस , ताज पॅलेस , ओबेरॉय ट्रायडण्ट , कॅफे लिओपोल्ड , कामा हॉस्पिटल , छाबड हाऊस या भागांना दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते . हल्ल्याचे स्वरुप इतके भीषण होते की एनएसजीच्या कमांडोंना ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो ही मोहीम हाती घ्यावी लागली .
0 छत्रपती शिवाजी टर्मिनसवर रात्री सव्वा नऊच्या सुमारास दोन दहशतवादी घुसले . कसाबही त्यात होता . एके ४७ रायफलने त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला . पावणे अकरा पर्यंत दहशतवाद्यांचे हत्यासत्र सुरु होते . या गोळीबारात ५८ जण ठार झाले तर १०४ जखमी झाले . हे दहशतवादी सीएसटी स्थानकावरुन कामा हॉस्पिटलच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसचे तत्कालिन प्रमुख हेमंत करकरे , विजय साळस्कर , अशोक कामटे हे अधिकारी त्या दिशेने धावले . कामा हॉस्पिटलच्या परीसरात कसाब आणि खान या दोघांशी झालेल्या चकमकीत हे तिघेही अधिकारी शहीद झाले . खानचा खात्मा झाला . आधी पोलिसांच्या जीपने आणि नंतर एका कारने पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कसाबला सह सब इन्सपेक्टर तुकाराम ओळंबे यांनी जिवंत धरले . या प्रयत्नात जखमी झालेल्या ओळंबे यांना वीरमरण आले .
0 कुलाबा येथील लिओपोल्ड कॅफे येथे झालेल्या हल्ल्यात काही परदेशी नागरीकांसह दहा जण ठार झाले . ताज पॅलेस येथे झालेला हल्ला सर्वात भीषण होता . ताजमध्ये सहा बॉम्बस्फोट झाले . फायर ब्रिगेडच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हॉटेलमधून २०० जणांची सुटका केली . ताज आणि ओबेरॉय ट्रायडण्टला एनएसजी कमांडो , मरीन कमांडो ( मार्कोस ) आणि रॅपिड अॅक्शन फोर्सने वेढा घातला होता . एनएसजीचा तरुण कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन या हल्ल्यात शहीद झाला . छाबड हाऊसमध्ये झालेल्या चकमकीत एनएसजी कमांडो हवालदार गजेंद्रसिह शहीद झाले . दोन दहशतवादी ठार झाले . दोन ज्यु धर्मगुरुंसह सहाजण ठार झाले .
0 आयएसआयच्या देखरेखीखाली लष्कर तय्यबा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला . तय्यबाचा सदस्य असलेल्या डेव्हीड हेडली याने मुंबईतल्या टार्गेट्सची रेकी केली . आयएसआयचा मेजर इक्बालने हेडलीला या कामासाठी रसद पुरवली होती .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive