Monday, November 5, 2012

'चायना आयटम'चे उगमस्थान - China Items from senjon, gonjao, eu

मुंबईतल्या गल्ल्या आणि मार्केट चिनी बनावटीच्या रंगबिरंगी तोरणे , कंदील , दिवे , पणत्यांनी उजळून गेल्या आहेत. ' चायना आयटम ' ने मुंबईची बाजारपेठ फुलून गेली आहे. चीनमधील सेंजन , गोंजाव , इयू ही तीन प्रमुख शहरे मुंबईतल्या चायना आयटमचे उगमस्थान आहे. मुंबईतल्या व्यापाऱ्यांची होलसेल मालाच्या खरेदीसाठी या मार्केटमध्ये झुंबड उडते.

दिवाळीच्या काळात मुंबईसह देशभरातल्या बाजारपेठा सर्व प्रकारच्या चिनी वस्तूंनी भरून जातात. दरवर्षी चिनी वस्तूंची मागणी वाढतच आहे. दरवर्षी नवनवे चिनी आयटम दिवाळीच्या काळात मुंबईत येतात. मुंबईच्या मनीष मार्केट , मुसाफिर खाना भागातली व्यापारी मंडळी गणपती उत्सवानंतर चीनच्या वारीवर रवाना होतात. सेंजन , गोंजाव , इयू , निगवो शहरातील भव्य बाजारपेठा डोळे दिपवणाऱ्या आहेत. एक बाजारपेठ फिरण्यासाठी पाच दिवसही कामी पडतील. कोणत्याही प्रकारची वस्तू मागा तत्काळ उपलब्ध होते. दिवाळीच्या काळात प्रामुख्याने कंदील , दिव्यांची रंगबिरंगी तोरणे , दिवे , इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व गिफ्ट आयटमना प्रचंड मागणी असते. येथील चार-पाच मजल्यांच्या इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर साधारणपणे एकाच वस्तूंची दुकाने आहेत. एखाद्या मजल्यावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीच सर्व दुकाने असतील तर एखाद्या मजल्यावर दिव्यांची तोरणांचीच , दिव्यांची दुकाने आहेत.

* भारतीयांची घासाघीस
चीनमध्ये हव्या तशा दर्जाच्या वस्तू मिळतात. बाजारात गेल्यावर घासाघीस करण्याची भारतीयांची सवय चिनी लोकांनाही माहिती झाली आहे. भारतीय व्यापारी बार्गेनिंग करण्यात पटाईत असल्याचे चिनी व्यापाऱ्यांनीही ओळखले आहे. एखाद्या कंदिलाचा किंवा दिव्यांच्या रंगीत तोरणाचा दर चीन व्यापाऱ्याने सांगितला तर भारतीय व्यापारी दरामध्ये घासाघीस करण्यास सुरुवात करतो. इतके कंदील घेतो...काय भावाने देणार अशी विचारणी करतो. मग घासाघीस करून कमीत कमी दरात वस्तू घेतो.

* स्वस्त माल , कमी दर्जा
भाव केल्यामुळे चिनी व्यापारीही कमी दर्जाचा माल देतो. दिव्यांच्या तोरणातील वायर कमी जाडीची असेल तर दर कमी. तांब्याची वायर असेल तर दर अधिक. पण चिनी बनावटीच्या तोरणांच्या वायर अत्यंत बारीक असतात. आतमध्ये तांब्याची अत्यंत पातळ वायर असते. जेवढा स्वस्त माल तेवढा दर्जा कमी असतो. त्यामुळे दिवाळीच्या काळात लाखो दिव्यांची तोरणे आयात होतात. ही तोरणे स्वस्तातली असल्याने पुढच्या दिवाळीपर्यंत तोरणे बिघडलेली असतात.

* स्वस्त कामगार-मुबलक वीज
चीनमध्ये कर कमी आहेत. कामगार स्वस्त आहेत. बँकांच्या कर्जावर व्याज दरही कमी आहे. वीज मुबलक आणि अत्यंत कमी दरात मिळते आणि प्रचंड संख्येने मालाचे उत्पादन होते. त्यामुळे चिनी वस्तू स्वस्तात मिळतात. दिवाळीपूर्वी भारतीय बाजारपेठांमधील मागणी लक्षात घेऊन उत्पादन होते.

* कंटनेर भरभरून माल
दिवाळीच्या काळात चीनहून मुंबईत सरासरी एक ते दोन हजार कंटनेर भरून माल येतो. न्हावा शेवा व मुंबई बंदरात कंटनेर येतात. यातील बहुतांश कंटनेरमध्ये कंदील , पणत्या , दिव्यांची तोरणे , एलईडी दिवे आणि लहानलहान इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी भरलेले असतात. चिनी बनावटीच्या दिव्यांची तोरणे तर काही लाखांमध्ये येतात.

* दोन महिने आधी बुकिंग
दिवाळीच्या काळात चीनवरून माल निर्यात करण्यासाठी गणपतीच्या काळातच कंटेनर बुक करावे लागतात. चाळीस फुटांच्या एका कंटेनरचे भाडे सरासरी दोन हजार अमेरिकन डॉलर असते. दिवाळीच्या काळात कंटनेरचे भाडे शंभर ते दोनशे डॉलरने वाढते.

* भारतीय मागे
चीनमधील उत्पादक कंपन्यांचे लक्ष केवळ मुंबई नाही. युरोप , अमेरिका , आफ्रिका , मध्य आशिया अशा सर्वच खंडांमधील देशांवर असते. संपूर्ण जगाची बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून वस्तूंचे उत्पादन केले जाते. प्रचंड प्रमाणात उत्पादन होत असल्याने त्याची किंमत स्वस्त होते. दिवाळीच्या काळात भारतीय बाजारपेठ तर डिसेंबरमध्ये ख्रिसमसची मोठी बाजारपेठ चीन लोकांनी डोळ्यासमोर ठेवली आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive