Friday, November 9, 2012

एफडीए सुस्त; भेसळ विक्री मस्त FDA not working against Bhesal

दीपोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्याने सर्वत्रच धामधूमीचे वातावरण आहे . घराघरांमध्ये फराळ आणि गोडधोड पदार्थ बनविण्याची लगबग सुरू आहे . मात्र ज्यांना फराळ किंवा गोड पदार्थ करण्यासाठी वेळ नाही , त्यांची सारी मदार रेडिमेडवरच आहे . आकर्षक पॅकिंग , अल्प भाव , उत्कृष्ट मार्केटिंगच्या जोरावर रेडिमेड पदार्थांची विक्री सुरू असली तरी आरोग्याला पोषक असे खाद्यपदार्थ विकणे आवश्यक आहे . हे सारे जोखण्याची जबाबदारी ग्राहकांबरोबरच अन्न औषध प्रशासनाची ( एफडीए ) आहे . दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम उघडून राज्याच्या अनेक विभागांमध्ये एफडीएने कारवाईचा पाश ओढला असला तरी नाशिक विभागात मात्र निरव शांतता आहे . त्यामुळेच भेसळयुक्त पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने विभागातील कोट्यवधी जनतेचे आरोग्य दिवाळीच्या सणात रामभरोसे बनले आहे .

दिवाळीत चिंता गुटख्याची

ठाणे , पुणे , कोल्हापूर अशा राज्याच्या अनेक भागांमध्ये एफडीएच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ , खवा , मिठाई आदींच्या विक्री केंद्रांवर जावून तेथील नमुने तपासण्याचे काम सुरू आहे . जिथे भेसळ किंवा हलक्या दर्जाचे अन्नपदार्थ आढळून येत आहेत तेथे कारवाई केली जात आहे . नाशिक विभागातील नाशिक , जळगाव , धुळे , नंदुरबार आणि अहमदनगर अशा पाच जिल्ह्यांतील कारवाई मात्र अत्यंत संथ आहे . नाशिकच्या एफडीएने एकूण किती ठिकाणांवर तपासणी केली , किती ठिकाणांना एफडीएच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या , रस्त्यावरील फराळ विक्री करणाऱ्या किती अन्नपदार्थ विक्रेत्यांनी एफडीएकडून परवाना घेतला आहे याबाबत माहिती देण्यात नाशिक एफडीएने असमर्थता दर्शविली आहे . विशेष म्हणजे , नागरिकांनी सहकार्य करून काही तक्रार असल्यास तत्काळ संपर्क साधावा , असे आवाहन एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आवर्जून केले आहे . त्यामुळे तुमच्या आरोग्याची जबाबदारी आणि खबरदारी तुम्हीच बाळगा , असा संदेशच एफडीएने दिला आहे . दरम्यान , दिवाळीच्या काळातही केवळ गुटख्याची मोहीम राबविण्यातच एफडीएने धन्यता मानल्याचे दिसून येत आहे . शहराच्या अनेक भागात तसेच ग्रामीण भागात भेसळयुक्त आणि विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे . यामुळे ऐन दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांतून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही . दुर्दैवाने अशा प्रकारची घटना घडल्यास त्याची जबाबदारी एफडीएवरच राहणार आहे . याचाही सोयीस्कर विसर एफडीएला पडल्याचे दिसत आहे .

हे लक्षात ठेवा

खव्याचे पदार्थ खरेदी केल्यापासून २४ तासांत ; तर बंगाली मिठाई आठ ते दहा तासांत खावी , असे मिठाईच्या बॉक्सवर नमूद करणे बंधनकारक आहे .

मिठाई हाताळण्यासाठी प्लास्टिकचे हातमोजे आणि डोक्यावर प्लास्टिकची पिशवी वापरणे बंधनकारक आहे .

दुकानाची नोंदणी किंवा परवाना घेतल्याचा फलक नऊ बाय सहा फूट या आकारात लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे . त्यामुळे हा फलक असलेल्या विक्रेत्याकडूनच खरेदी करावी .

याची आहे आवश्यकता

विविध खाद्यपदार्थांच्या कच्च्या मालाचे उत्पादक , साठा वितरक किरकोळ विक्रेत्यांकडील साठ्याची तपासणी करून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे आवश्यक आहे .

दिवाळीसाठी आवश्यक अन्नपदार्थ भेसळमुक्त आणि चांगल्या दर्जाचे उपलब्ध होणे आवश्यक आहे .

रवा , मैदा , बेसन , तेल , वनस्पती तूप , खवा अशा विविध पदार्थांची तपासणी करून त्यांची विक्रीच बंधनकारक आहे .

गुजरात , मध्य प्रदेश तसेच अन्य राज्यांमधून मावा , खवा आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो . त्याची तपासणी करणे गरजेचे आहे .

फराळासाठी आवश्यक असलेले रवा , मैदा , तेल अशा अन्नपदार्थांची तपासणी होणे आवश्यक आहे .

मिठाई तयार करण्याच्या ठिकाणांची आकस्मिक पाहणी करून त्यांचा दर्जा तपासणी व्हायला हवी .

मेहंदीतही भेसळ

दिवाळीच्या सणात विविध प्रकारच्या मेहंदीचा वापर केला जातो . मात्र या मेहंदीमध्ये भेसळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे . काही महिन्यांपूर्वी राज्यात आठ ठिकाणी ' काली मेहंदी ' किंवा ' हेअर कलर ' नावाच्या बनावट मेहंदीचा साठा जप्त करण्यात आला होता . पांढरे केस काळे करण्यासाठी , केसांना आकर्षक रंग देण्यासाठी नैसर्गिक आयुर्वेदिक तत्त्वांनी बनलेली मेहंदी , अशी जाहिरात करून ही मेहंदी विकली जात होती . या मेहंदीचे उत्पादक उत्तरांचल , राजस्थान , मध्य प्रदेश , हिमाचल प्रदेश आदी राज्यातील आहेत . ' हेअर कलर ' मध्ये ' बेरियम पेरॉक्साइड ' किंवा ' - नायट्रो फिनेलामाइन ', ' डायमिन ' यासारखी आरोग्यास बाधक असलेली द्रव्ये वापरणे , लेबलवर त्यांचा उल्लेख करणे , तसेच उत्पादनस्थळ अन्यत्र असताना मुंबई दाखवून ग्राहकांची दिशाभूल करणे , उत्पादनासोबतची माहिती अपूर्ण स्थानिक भाषेत नसणे अशा कारणांमुळे हा साठा जप्त करण्यात आला .

मिठाईची भेसळ , त्वरीत कारवाई

मिठाई विक्रेत्यांकडील मिठाईतील स्टार्चची भेसळ ओळखण्यासाठी टिंचर आयोडिन सल्फिरिक अॅसिडचा वापर करण्यात येईल . तपासणीसाठी जाणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना हे द्रव्य देण्यात येईल . खव्यामध्ये स्टारची भेसळ असल्यास टिंचर आयोडिनमुळे तेथे निळसर रंग येईल . तर , खव्यात साखर असल्यास सल्फ्युरिक अॅसिडमुळे त्याचा रंग गुलाबी होईल . या रासायनिक चाचण्यांमुळे खव्यातील भेसळ उघड होईल . त्यामुळे विक्रेत्याच्या दुकानात मिठाईची तपासणी करतानाच या द्रव्याच्या मदतीने भेसळ ओळखण्यात येईल . भेसळ आढळल्यास मिठाई नष्ट करण्याचे आदेश विक्रेत्यांना देण्यात येतील , असे एफडीएच्या वतीने सांगण्यात आले . पण , अद्याप कारवाई सुरू करण्यात आलेली नाही .

खसखसमध्ये रवा

दिवाळीत अनारसे करण्यासाठी खसखस विकत घ्यायला जाल तेव्हा सावधान ! चुकून रवा घरी घेऊन याल . खसखसमध्ये सर्रास रवा मिसळण्यात येतो . दोन्ही पदार्थ दिसायला कमालीचे सारखे असल्यामुळे साध्या डोळ्यांनी चटकन फरक कळत नाही . त्यामुळे फसगत होण्याची शक्यता दाट असते .

भेसळीचा गोरखधंदा


शहाजिरे महाग असल्यामुळे त्यात शेपूच्या बिया मिसळल्या जातात .

खराब झालेले सुंठ खपवण्यासाठी त्याला निळेचा रंग दिला जातो .

चीनमधून आयात केलेली हलक्या दर्जाची चॉकलेट्स कोणत्याही लेबलविना किंवा युरोप - अमेरिकेतली लेबल्स लावून विकली जातात .

खाद्यतेलात पामतेल किंवा सोयाबीन तेल मिसळून अधिक दराने त्याची विक्री केली जाते .

जुनी मिठाई आकर्षक दिसण्यासाठी त्यात घातक रंग टाकले जातात .

परफ्युम्सचा सुगंध बनावटी

भारतीयांचा इम्पोर्टेड वस्तूंचा सोस लक्षात घेऊन काहींनी परफ्युमलाही भेसळीचे लक्ष्य बनविले आहे . त्यामुळे भारतातच बनलेला हलक्या प्रतीचा माल परदेशात पाठवून तिथून तो पुन्हा आयात करून चढ्या किमतीत ग्राहकांच्या गळ्यात मारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत . स्थानिक बाजारातून हलक्या दर्जाचे , बिननावाचे परफ्युम्स , टाल्कम पावडर आदी कॉस्मेटिक्सच्या वस्तू खरेदी करून त्या दुबई किंवा इतर देशांमध्ये पाठविल्या जातात . तेथील कंपन्यांची लेबल्स तिथे लावून त्या पुन्हा भारतात ' इम्पोर्ट ' केल्या जातात आणि इम्पोर्टेड म्हणून चढ्या भावाने महाराष्ट्राच्या अनेक भागात विक्री केल्या जातात . भिवंडीत याचे मोठे केंद्र असल्याचे सांगितले जाते . ' एफडीए ' ने काही महिन्यांपूर्वी छापा टाकून तेथील लाखो रुपयांचा माल जप्त केला होता .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive