Thursday, November 8, 2012

ऑस्ट्रेलियाचा सन्मान बहुमोल- सचिन (व्हिडिओ) Sachin tendulkar got Order of Australia

मंत्री सायमन क्रिन यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार प्रदान

मुंबई - लहान वयात ऑस्ट्रेलियातील क्रिकेट दूरदर्शनवर पहात असताना या देशात खेळण्याचे स्वप्न मी बाळगले होते, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले पण जो देश मला मनापासून आवडला त्याच देशाकडून मला सन्मानित करण्यात आले. त्यांनी दिलेला "ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा पुरस्कार माझ्यासाठी बहुमोल आहे, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ऑस्ट्रेलियाचे रिजनल डेव्हलपमेंट मंत्री सायमन क्रिन यांनी सचिनला हा पुरस्कार दिला. त्या वेळी सचिनची पत्नी अंजलीसह सचिनला क्रिकेटपटू घडविण्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका असलेला त्याचा भाऊ अजितही उपस्थित होता.

क्रिकेटच्या मैदानावर किती विक्रम केले किंवा किती धावा केल्या यासाठी नाही, तर सचिनचे सामाजिक कार्य, दोन देशांमधील नाते घट्ट करण्यात जे योगदान दिले आहे त्यामुळे हा पुरस्कार दिला आहे, असे सायमन क्रिन यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आलेला सचिन हा तिसरा क्रिकेटपटू आहे. या अगोदर क्‍लाइव्ह लॉईड आणि ब्रायन लारा यांना हा सन्मान मिळाला आहे.

पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर सचिन काहीसा भावूक झाला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सर्व आठवणींना त्याने उजाळा दिला. परदेशाचा विचार करता ऑस्ट्रेलिया हा मला सर्वांत आवडणारा देश आहे. त्यात सिडनी क्रिकेट मैदान अतिशय आवडते. ऑस्ट्रेलियात जेवढे दौरे मी केले आहेत त्या प्रत्येक दौऱ्यात मला त्यांच्या क्रिकेटप्रेमींकडून सन्मान मिळालेला आहे, असे सांगणाऱ्या सचिनने क्रिकेटचे सम्राट डॉन ब्रॅडमन यांच्या भेटीचाही प्रसंग सांगितला. ब्रॅडमन यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला जाताना मी नर्व्हस होतो, एवढ्या मोठ्या व्यक्तीशी काय बोलावे, हे कळत नव्हते म्हणून मी शेन वॉर्नला तू बोलण्यास सुरवात कर असे सांगितले, जेव्हा मी ब्रॅडमन यांना आत्ताच्या क्रिकेटमध्ये कोणती सरासरी सर्वोत्तम आहे, असे विचारले तेव्हा त्यांनी 70 असे उत्तर दिले, 90.94 (ब्रॅडमन यांची कसोटीतील सरासरी) का नाही, असा प्रश्‍न मी त्यांना केला, तेव्हा त्यांनी मला, आता मी वयाच्या नव्वदीत 70 च्याच सरासरीने खेळणार ना? असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने माझी "विकेट' गेली, अशी आठवण सचिनने या वेळी सांगितली.

ऑस्ट्रेलियात वारंवार जायला आवडेल
2007 हा माझा सर्वांत चांगला ऑस्ट्रेलिया दौरा होता. या दौऱ्यात मी प्रत्येक वेळी मैदानात जायचो त्या वेळी मला सर्व प्रेक्षक उभे राहून मानवंदना देत होते. संघातील एका सहकाऱ्याने मला याबाबत विचारले, मलाही नेमके कारण समजत नव्हते. कदाचित हा माझा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल असे वाटत असल्यामुळे ते मला ही मानवंदना देत असतील, असा समज मी करून घेतला, ही आठवण सांगताना सचिनला हसू आवरत नव्हते.

ऑस्ट्रेलियातील क्रिकेटने "टफ' बनविले
ऑस्ट्रेलियात खेळल्यामुळे मी अधिक सक्षम झालो. येथील क्रिकेट फारच "टफ' असते. येथे तुम्ही यशस्वी ठरलात तर जगात कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध यशस्वी होऊ शकता, असे सचिन म्हणाला.

सचिन आमच्यासाठी आयकॉन
भारतात जसे क्रिकेट लोकप्रिय आहे, तसेच ऑस्ट्रेलियातही हा खेळ प्रसिद्ध आहे. हे दोन देश या खेळामुळे एकत्र आहेत. क्रिकेट ही दोन देशांमधली समान असलेली भाषा आहे, असे सांगून सायमन क्रिन म्हणाले, ब्रॅडमन यांनी सचिनमध्ये स्वतःला पाहिले तेव्हाच सचिन आमच्यासाठी ऑयकॉन झाला होता.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive