Thursday, November 8, 2012

ओबामांच्या फेरनिवडीमुळे सोन्याचा भाव वर्षभरात दुप्पट होणार

अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा दुस-यांदा विराजमान होत असून त्याचा परिणाम कुठल्या क्षेत्रावर काय होईल याचे अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली आहे. इतिहासाचा दाखला देत काही तज्ज्ञांनी ओबामा दुस-यांदा अध्यक्ष झाल्याने सोन्याचा भाव २०१३च्या अखेरीपर्यंत दुप्पट होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस (१ औंस म्हणजे ३१.१ ग्रॅम) १,७२३.२ डॉलर आहे. हा भाव २०१३च्या अखेरीपर्यंत ३,५०० डॉलर प्रति औंस इतका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 
मुख्य कारण म्हणजे दुसरी टर्म:
अमेरिकेचा इतिहास असे सांगतो की फेरनिवड झालेला अध्यक्ष दुस-या फेरीमध्ये प्रचंड प्रमाणावर खर्च करतो. सरकारी खर्च भरमसाठ वाढतो, पण त्यामानाने महसूल वाढत नाही परिणामी मोठ्या प्रमाणावर नोटा छापल्या जातात, ज्यामुळे चलनाचे अवमूल्यन होते. डॉलरचे अवमूल्यन झाले की साहजिकच सोन्याचा भाव डॉलरमध्ये वधारतो. दी रियल असेट कंपनी या इंग्लडस्थित सोन्याच्या उलाढालीतील कंपनीचे प्रमुख जान स्कॉयल्स सांगतात, आमचे संशोधन असे सांगते की दुस-यांदा अध्यक्षपदी विराजमान झालेली व्यक्ती खर्च करण्यात हिरीरीने पुढाकार घेते, ज्यामुळे चलनाचे अवमूल्यन होते व सोने महागते.
अध्यक्षपदाच्या पहिल्या कालावधीत काटकसर करणारे अमेरिकी अध्यक्ष दुस-या व शेवटच्या कालावधीत मात्र नको तेवढे उदार होतात आणि त्याची फळे त्यानंतर येणा-या अध्यक्षांना भोगावी लागतात.


आकडे काय सांगतात?
जॉर्ज बुश (ज्युनियर) यांच्या अध्यक्षपदाच्या दुस-या कालखंडात सोन्याचा भाव ८८.८ टक्क्यांनी वधारला. त्यांच्याच अध्यक्षपदाच्या पहिल्या कालखंडातील चार वर्षांत मात्र सोने अवघे २४.६ टक्क्याने वधारले होते. त्याआधी बिल क्लिंटन यांच्या काळातला विचार केला तर त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या चार वर्षांमध्ये सोने ५.६ टक्क्यांनी तर दुस-या टर्ममध्ये मात्र १६.९ टक्क्यांनी वधारले होते.
तज्ज्ञ पुढे जाऊन असेही सांगतात की डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराच्या काळापेक्षा जास्त गतीने डॉलरचे अवमूल्यन होते आणि ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे असल्याने डॉलरचे मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन होण्याची शक्यता आहे. गेल्या चार दशकातल्या अमेरिकी सरकारांचा विचार केला तर असे आढळते की रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष असतानाच्या काळात सोन्याचा भाव १२१.२७ टक्क्यांनी वधारला. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराचा सत्ताकाळ या चार दशकातला बघितला तर सोन्याचा भाव तब्बल ३५८.६८ टक्क्यांनी वधारला आहे.


अमेरिकी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बर्नान्केच राहणार
आपण अध्यक्ष झालो तर बेन बर्नान्के यांना काढून टाकू असे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोमनी यांनी जाहीर केले होते. डॉलर हा पुन्हा सशक्त व्हायला हवा, त्याला त्याचे जुने वैभवाचे दिवस दिसायला हवे, अशी रोमनी यांची भूमिका होती. परंतु ओबामा पुन्हा अध्यक्ष झाल्याने बर्नान्के अध्यक्ष राहतील आणि सध्याचे धोरण सुरू राहील. जवळपास शून्याच्या आसपास असलेले व्याजदर येत्या काळातही तसेच राहण्याची त्यामुळे शक्यता आहे, ज्यामुळे सोन्याचा भाव चढाच राहण्यास मदत होईल. सध्याचे बर्नान्के यांचे धोरण पैशाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर करून देण्याचे आहे. अर्थव्यवस्थेत पैसा असला की बँका तो लोकांना देतील, लोक तो खर्च करतील व त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल अशी ही नीती आहे. अर्थात यामुळे डॉलरचे अवमूल्यन झाले व सोनेही महागले हा इतिहास आहे.


भारतातील सोन्याच्या भावावर काय परिणाम होईल
सोन्याचे भाव डॉलरमध्ये फुगतील असा अंदाज असला तरी त्याचा भारतीयांसाठी विचार करताना रुपयांमध्ये करायला हवा. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा सध्या असलेला भाव कायम राहिला किंवा रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झाले तर भारतामध्येही सोन्याचे भाव दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच दुप्पट होतील असा हा अंदाज सांगतो. सध्या डॉलरचा भाव सुमारे ५४ रुपये आहे. हा भाव आहे एवढाच राहिला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ज्या प्रमाणात फुगेल त्याच प्रमाणात भारतात रुपयामध्येही फुगेल. आणि रुपयाचे आणखी अवमूल्यन झाले व समजा डॉलरचा भाव ५६ रुपये झाला तर भारतामध्ये सोने त्या पटीत महागेल. समजा रुपया डॉलरच्या तुलनेत सशक्त झाला, वधारला तर मात्र भारतात सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढेल तितक्या प्रमाणात वाढणार नाही. पण एकूणात तज्ज्ञांच्यामते येत्या दोन वर्षांमध्ये सोन्याचा भाव आत्तापेक्षा खूप जास्ती असेल हे नक्की.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive