Thursday, November 8, 2012

AbhyangSnan on Diwali

शरीराबरोबर मनालाही सतेज करणारा‘अभ्यंग’ हा दिवाळीतला महत्त्वाचा आचार. पण तो फक्त दिवाळीपुरताच र्मयादित ठेवू नये. ‘अभ्यंग’ हा दिनचर्येचा भाग बनावा इतकं त्याला महत्त्व आहे.

अभ्यंग आणि दिवाळी यांचं अतूट नातं आहे. पहाटे पहाटे अंगणात सडा टाकून, रांगोळी रेखून दारी पणत्या आणि आकाशकंदील लावले जातात. आसमंतात शहनाई, भक्तिसंगीताचे सूर निनादत असतात. धूप- उदबत्त्यांचा दरवळ आणि फराळाचा खमंग वास संपूर्ण घरात पसरलेला असतो. अशा वातावरणात सुगंधी तेलानं अभ्यंग स्नान केलं आणि औक्षण झालं म्हणजे दिवाळी सुरू झाल्याची जाणीव होते.
दिवाळी आली की दुकानांमधून सुगंधी, रंगीत तेलं, उटणे, साबण दिसू लागतात आणि केवळ दिवाळीच्या दोम-तीन दिवसांपुरतेच अभ्यंग स्नान केले जाते. तर काहींना अभ्यंगातील तेलाचा तेलकटपणाच आवडत नाही म्हणून केवळ नावापुरते २-४ थेंब तेल लावले जाऊन अभ्यंगाचा उपचार उरकला जातो किंवा त्याऐवजी क्रीम्स वापरूनही काही लोक अभ्यंगाची वेळ निभावतात.


 
 अभ्यंग म्हणजे तेल लावणं. यामध्ये संपूर्ण शरीराला तेल लावणं व हलक्या हातानं ते जिरवणं अपेक्षित आहे. यात ‘शिरोभ्यंग’ म्हणजे डोक्याला तेल लावणं, ‘पादाभ्यंग’ म्हणजे पायांना तेल लावणं असे उपप्रकार आढळतात. अभ्यंगासाठी वेगवेगळी तेल वापरता येतात. प्रकृती विचार, त्वचा प्रकार, इतर व्याधी आणि ऋतू यांचा विचार यासाठी आवश्यक असतो.
नियमित वापरासाठी तीळतेल वापरावं. स्थूल, कृश कोणत्याही प्रकारातील आबालवृद्धांसाठी कोणत्याही ऋतूत तीळतेल सर्वश्रेष्ठच आहे. वातविकार असल्यास, अतिशय रूक्ष त्वचा असल्यास मोहरीचं तेल वापरावं. मोहरीचं तेल उष्ण स्निग्ध आहे. पित्तज व्याधी, पित्तप्रकृतीच्या व्यक्ती आणि अतिशय नाजूक त्वचा असल्यास अभ्यंगासाठी खोबरेल तेल वापरावं. पुष्टीसाठी किंवा त्वेचवर सुरकुत्या असल्यास ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल, अक्रोड तेल वापरावं. अनेक औषधी तेलांचा वापरही व्याधीनुसार केला जातो. उदा. नारायण तेल, महानारायण तेल, सहचर तेल, चंदनबलालाक्षादी तेल, धात्यंतर तेल इ.
अभ्यंग हा खरंतर दिनचर्येचाच भाग असावा. म्हणजे ज्याप्रमाणे रोज ब्रश, आंघोळ इ. नित्यकर्म केली जातात तसेच अभ्यंगही नित्य आवश्यक आहे. किमान आठवड्यातून एक वेळा तरी अभ्यंग करायलाच हवं. हिवाळ्यात शरीरातील रूक्षता वाढते, त्वचा कोरडी पडते किंवा फुटते म्हणून त्वचेची स्निग्धता कायम राखण्यासाठी नियमित तेल लावणं आवश्यक असतं. यासाठीच दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाची योजना आहे. पण हे केवळ दिवाळीच्या चार दिवसांपुरतं नसून संपूर्ण हिवाळ्यात करणं अपेक्षित आहे.
अभ्यंगानंतर अतिरिक्त तेलकटपणा जाण्यासाठी उटण्याचा वापर करावा उटण्यामुळात अधिकचा तेलकटपणा जाऊन त्वचेला कांती येते आणि त्वचा स्वच्छही होते.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive