' देऊळ ' च्या सुरुवातीला पडद्यावर झुळझुळणा - या सँड आर्टने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. पुढे बोटांची हीच जादू टीव्हीवरच्या काही रिअॅलिटी शोमध्येही दिसली. ही जादू होती नितीश भारतीची. त्याच्या कलेची दखल घेत , त्याच्यासाठी चक्क हॉलिवूडने रेड कार्पेट अंथरलंय.
कुतूहल माणसाला कधीच शांत बसू देत नाही. याच कुतूहलापोटी अनेक शोध लागले. अनेकांचं आयुष्य घडलं. तर काहींचं करिअरनेही याच शोधकवृत्तीने घडवलं. नितीश भारती हे असंच एक नाव. मुंबई सेंट्रल इथे राहणाऱ्या नितीशलाही वेडं केलं होतं ते सँड आर्टने. या आर्टबद्दल त्याला कल्पना होती. पण , ही कला कुठे शिकवली जाते , नेमकी ती काय असते याची काहीच कल्पना त्याल नव्हती. पण , यू ट्यूबवर त्याला या कलेबद्दल पाहायला मिळालं आणि एकलव्याप्रमाणे त्याने शिकायला सुरुवात केली. त्याच्या या कलेची दखल महाराष्ट्राने घेतलीच. पण , आता तो सज्ज झालाय हॉलिवुडमध्ये जाण्यासाठी.
' सनमायका आणि गिरगाव चौपाटीवरची वाळू घेऊन मी शिकायला सुरुवात केली. बघता बघता ही वाळू चित्रांचा आकार घेऊ लागली. या चित्रांवर सतत सराव करून हुकूमत मिळवली. त्यानंतर छोटे छोटे कार्यक्रम मी करू लागलो ', नितीशने सांगितलं. पण सँड आर्टिस्ट म्हणून त्याला मान्यता मिळाली ती ' देऊळ ' मुळे. दरम्यान त्याने ' मराठी पाऊल पडते पुढे ' मध्ये ' थकलेल्या बाबाची कहाणी ' या गाण्यावर सँड आर्ट करून दाखवली. यामुळे तो लोकांच्या मनामनांत पोहोचला. त्यामागोमाग ' अनोळखी दिशा ' या रहस्यमय कथेमध्येही त्याने आपली ही कला दाखवली.
सध्या ' इंडियाज गॉट टॅलेंट ' मध्ये तो आहे. संपूर्ण देश त्याची कला पाहातोय. आपल्या हिमतीच्या जोरावर तो सध्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलाय. यानिमित्ताने सँड आर्टिस्ट म्हणून तो परदेशांतही ओळखला जाऊ लागलाय. याच दरम्यान हॉलिवूडमधल्या काही लोकांनी त्याची ही कला पाहिलीय. अमेरिकेतल्या ' मॉडर्न प्रोडक्शन आयएनसी ' या संस्थेकडून नितीशला एका हॉलिवूडच्या सिनेमासाठी सँड आर्टिस्ट या नात्याने बोलावले आहे. ' इंडियाज गॉट टॅलेंट ' ची अंतिम फेरी संपल्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तो अमेरिकेला जाणार असल्याची माहितीही त्याने दिली.
आणि युवराज रडला... ' इंडियाज गॉट टॅलेंट ' च्या मंचावर युवराजसिंग येणार असल्याची बातमी आली आणि त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायचा ध्यास नितीशने घेतला. ' तो नुकताच कॅन्सरमधून बाहेर आला होता. त्याने आजाराशी दिलेला लढा खरोखर कौतुकास्पद होता. म्हणूनच त्याची कहाणी सँड आर्टमधूून मांडावी असं मी ठरवलं. त्यानंतर मी ती कहाणी सँड आर्टमधून मांडली. त्यावेळी युवराजलाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्याने मला उत्स्फूर्त मिठी मारली. माझ्यासाठी ती माझ्या कामाची पावती होती.
No comments:
Post a Comment