Thursday, November 8, 2012

भेट - आपल्या प्रियजनांच्या हृदयाला भिडणारी

दिवाळी जवळ आली की नातेवाइकांना, मित्र-मैत्रिणींना कोणती भेटवस्तू द्यावी या विचारानं गोंधळून जायला होतं.. आकर्षक पॅकिंगमधल्या दुकानातल्या भेटवस्तूंनी आपल्या प्रियजनांना आनंद मिळतो हे नक्की, पण त्यापेक्षाही आपल्याच हातांनी तयार केलेलं, ‘पर्सनल टच‘ असलेलं ‘गिफ्ट’ त्यांना सगळ्यात जास्त सुखावून जाईल..!

 
 दिवाळी जवळ यायला लागली की डोक्यात किती गोष्टींची व्यवधानं सुरू होतात. घराची साफसफाई, फराळाची तयारी, कुठे ट्रिपला जायचं असेल तर ते कुठे जायचं याची ठरवाठरवी, शॉपिंग आणि बरंच काही. याच सगळ्या धामधुमीत आपल्या नातलगांना, मित्रमैत्रिणींना, ऑफिसमधल्या सहकार्‍यांना कुठल्या भेटवस्तू द्याव्या, याचेही विचार मनात घोळायला लागतात. सध्या महागाईचा बोलबाला आहे. त्यात आधीच दिवाळी म्हटलं की खिशाला नुसतं भोक नाही खिंडार पडतं. त्यात अजून भेटवस्तूंवर पैसा खर्च करणं म्हणजे महाकठीण; पण भेटवस्तू देण्याची इच्छा तर असते. मग अशावेळी घरच्या घरी किंवा काही गोष्टी बाहेरच्या आणून त्यांचा घरच्या घरी इतर वस्तूंशी मेळ घालून झक्कास भेटवस्तू सहज बनवता येऊ शकतात. नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या भेटवस्तू बनवता येऊ शकतात यासाठीच्या या काही युक्त्या
ड्रायफ्रूट परडी : दिवाळीत ड्रायफ्रूटस् देण्याची प्रथा आहे. आपण एरवी ड्रायफ्रूट परडी बाजारातून विकत आणतो आणि भेटवस्तू म्हणून देऊन टाकतो. हल्ली तर ड्रायफ्रूट इतकीच किंमत त्याच्या पॅकेजिंगची असते. हे पॅकेजिंग तुम्ही घरच्या घरी करू शकता. होलसेल बाजारात गेला की विविध आकाराच्या परड्या, त्यावर चिटकवण्याचं सजावटीचं सामान आणि रंगीत गुळगुळीत कागद असं सगळं तुम्हाला अत्यंत स्वस्तात मिळू शकतं. बाजारातून फक्त ड्रायफ्रूटस् आणून घरच्या घरी तुम्ही परड्या सजवू शकता.
परड्यांवरही खर्च करायचा नसेल तर अजून एक सोपी युक्ती आहे. मोठय़ांचे, लहानांचे कपडे शिवताना अनेकदा कापड, बॉर्डर्स उरतात. कपडे आणायला गेल्यानंतर शिंपी या उरलेल्या गोष्टी आपल्याला देऊन टाकतो. या कापडापासून घरच्या घरी तुम्ही लहानसे बटवे शिवू शकता. या बटव्यांमधून तुम्ही ड्रायफ्रूटस्, चॉकलेटस् किंवा इतर खाण्याचे पदार्थ भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
घरातल्या मुलांना दिवाळीच्या सुट्टीत नादावून ठेवणं हे मोठं कामच असतं. अशावेळी कार्डशिटचे तुकडे ग्रिटिंगच्या आकाराचे कापून मुलांना चित्र काढायला द्यावं. त्यांच्या चित्रकलेवर कसलंही लक्ष न ठेवता त्यांना त्यांच्या पद्धतीनं काढू द्यावं. त्यानंतर ही चित्रं छान लॅमिनेट करून ग्रिटिंग कार्ड म्हणून वापरता येऊ शकतात. यात मुलांचा वेळ छान जातो. आपण काहीतरी केलंय याचा आनंद त्यांना मिळतो आणि तुमच्या स्नेहींनादेखील अनोखी भेट मिळू शकते.
लाडू, वड्या करण्यात तुमचा हातखंडा असेल तर तुम्हाला जो पदार्थ छान जमतो तो मोठय़ा प्रमाणावर बनवून भेट म्हणून तुम्ही सुरेखशा डब्यांमधून, पिशव्यांमधून देऊ शकता. असा ‘पर्सनलाईज टच’ हल्ली लोकांना आवडतो.
पुरेसा वेळ असेल तर भेटवस्तू म्हणून तुम्ही सुरेखशी पत्रं लिहू शकता. जवळच्या नातलगांना, इतकंच नाही तर ऑफिसमधल्या सहकार्‍यांनाही पत्रातून तुमच्या भावना तुम्ही सांगितल्या तर त्यांच्यासाठी तो एक अनमोल ठेवा असेल. हल्ली इंटरनेटमुळे तसंही पत्र लिहिणंच कमी झालेलं आहे. अशात आपल्या नावाचं पत्र आलेलं पाहून लहानांनाच काय; पण मोठय़ांनाही आनंद झाल्याशिवाय राहाणार नाही.
भेट म्हणून दरवेळी वस्तूच दिली पाहिजे असं कुठे आहे? तुमच्या शाळेतल्या किंवा महाविद्यालयातल्या मित्रमैत्रिणींना बोलावून केलेलं स्नेहभोजनाचं आयोजन हे सगळ्यांसाठी भन्नाट गिफ्टच आहे. असं स्नेहभोजन तुम्ही नातलगांचं, मित्रमैत्रिणींचं, सहकार्‍यांचं, शेजार-पाजारच्यांचं करू शकता. दिवाळी ही आनंद वाटण्याचा सण आहे. आणि आनंद वाटण्यासाठी पैसे कुठे लागतात बरोबर ना..? पत्र लिहिणार असाल तर सुरेखसा कागद वापरायला हरकत नाही. पॅडला लावलेल्या कागदांवर हे पत्र लिहू नका. पत्र वाचून जितका आनंद होईल तितकाच आनंद ते पत्र पाहूनही झाला पाहिजे.
बाजारातल्या भेटवस्तू आणणार असाल तर चार ठिकाणी आधी बघून या. उगाच अवाजवी दर असलेल्या वस्तू घेण्यात काहीच हाशील असत नाही.
तुम्ही जी भेटवस्तू द्याल ती निराळी असली पाहिजे. बाजारात स्वस्तात मिळतंय म्हणून काहीही घेऊन येऊ नका.
आपण ज्या व्यक्तींना भेटवस्तू देत असतो, त्यांच्या आवडीनिवडींची आपल्याला कल्पना असते. ती लक्षात घेऊन भेटवस्तूची निवड करा. जर आवड माहीत नसेल तर ड्रायफ्रूट इतके सेफ गिफ्ट दुसरे कुठलेही नाही.
उगीच एसेमेसचा भडिमार करू नका. हल्ली कुणालाही ते वाचायला वेळ नसतो. त्याऐवजी जवळच्या माणसांना फोन करा. त्यांच्याशी पाच-दहा मिनिटं बोला, हेही एक चांगलं गिफ्टच आहे.
झाडांची रोप, फुलांच्या ऐवजी फळं भेटवस्तू म्हणून द्यायला हरकत नाही.
माझ्या एका मैत्रिणीनं आम्हा सगळ्या मैत्रिणींना विविध आकाराच्या सहा कापडी पिशव्यांचा सेट भेट म्हणून दिला होता. आणि या पिशव्याही तिनं तिच्या जुन्या साड्या आणि ओढण्यांपासून बनवल्या होता. तुम्हीही असा काही विचार अंमलात आणू शकता.
माझी सगळ्यात आवडती भेटवस्तू आहे पुस्तक. यावर्षी मी सगळ्यांना भेट म्हणून पुस्तकं देणार आहे. तुम्ही जर नेटवर गेला तर स्वस्त दरात घरपोच पुस्तकांची सेवा पुरवणार्‍या बर्‍याच वेबसाइटस् तुम्हाला सापडतील. त्यांच्या आधारे तुम्ही भेटवस्तू म्हणून पुस्तकं स्वत:च्या घरी मागवू शकता किंवा ज्या व्यक्तीला पुस्तकं भेट द्यायची आहे त्यांच्या घरीही अगदी सुंदरशा कागदात पॅक करून पाठवू शकता. मी यावर्षी पुस्तकच देणार आहे. तुम्ही काय ठरवताय?

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive