Thursday, November 8, 2012

पाडव्यातल्या गोडव्यात रमलेले.. तो आणि ती Padva He and She

वेगवेगळ्या स्वभावाचे, भिन्न आवडी-निवडीचे, अगदी भिन्न टोकाचे ‘तो’ आणि ‘ती’ लग्नानंतर एकत्र येतात. मंत्रांनी, वचनांनी एकमेकांना एकमेकांशी बांधतात. पण कालांतराने एकमेकात दूध-साखरेसारखे विरघळतात. कधी पराकोटीची भांडणं होतात, दोघांमधले वाद विकोपाला जातात. कोणीतरी मुद्दाम हटून राहतं, तर कोणीतरी नेहमी पड खातं. पण दोघांमधल्या नात्यासाठी दोघंही हळवी असतात. ‘दिवाळी पाडवा’ दोघांमधल्या नात्याला अन् गोड संवेदनांना बळ देणारा दिवस. ‘ती’ त्याच्याकडून हक्कानं काहीतरी मिळण्याची अपेक्षा करते अन् ‘तो’ही जमेल ते देऊन त्याच्याप्रती असलेल्या तिच्या सर्मपणाला न्याय देतो. पाडव्याचं गिफ्ट मग ते ‘मिळो न मिळो’ पाडव्याच्या नावानं दोघांमधला गोडवा वाढला नाही तरच नवल. दरवर्षी पाडवा साजरा करायचा तो याचसाठी..!


 ती
पाडवा अगदी चार दिवसांवर आलाय. तरी याची खरेदीच्या दृष्टीनं काहीच हालचाल दिसत नाहीये. पहिल्या पाडव्याची काही खास गिफ्ट हा आपल्याला देणारे की नाही ? की ’लग्न झाल्यापासून काही ना काही निमित्तानं इतकं घेणं झालंय ना की आता हिला आणिक वेगळं काय द्यायचं हा प्रश्नच आहे’ हा आईंचा सूर हाही लावणार की काय? खरेदीचा काही विषय पण काढत नाही पठ्ठय़ा. पहिलाच पाडवा आहे म्हणून जरा जास्त उत्सुकता वाटतीये. ‘प्रियकर‘ होता तेव्हाही असाच होता म्हणा. प्रियकराचा नवरा झाला की पुरुष बदलतो असं काही आपल्या बाबतीत झालं नाही. म्हणजे लग्नाआधीही हा ’नवराच’ होता की काय ! आज गुरुवार. त्याला सुट्टीच आहे. पेपरमधल्या रंगीबेरंगी जाहिराती जरा दाखवूया आणि आपणच ‘पाडव्याच्या गिफ्ट’चा विषय काढूया ! काढून घेऊया त्याच्या मनातलं. खरं तर बायकांच्या मनाचा थांग लागत नाही म्हणतात. पण आपल्या बाबतीत सगळंच उलटं कसं ? आईनं परवाच पाडव्याचं निमंत्रण दिलं. त्या दिवशी तरी हा जरा ’हालेल’ असं वाटलं होतं. पण फुस्स ! ‘हो. आम्ही नक्की येतोय. ‘एवढय़ा‘ मोठय़ा‘ दोन वाक्यात पाडवा हा विषय संपवला ना त्यानं. ’हे हवं’ ’ते हवं’ असा हावरटपणा आपण कधी केला नाही लग्न झाल्यापासून. म्हणून याला आपल्याला काही हौसच नाही असं तर वाटत नसेल ना ! एवढय़ा मोठय़ा प्रशस्त आणि संपन्न घरात आपल्याला खरंच काही कमी नाहीये. सोन्यासारखी सासरची माणसं आहेत आणि सोने पे सुहागा असा नवराही आहे. मग तरी ‘पाडव्याच्या गिफ्ट’विषयी एवढं आकर्षण का ? त्यानं काय दिलं तर आपल्याला आवडेल हा विचारही आपण अजूनपर्यंंत केलेला नाही. सोन्याची फारशी आवड नसली तरी कपड्यांचे आपण शौकीन आहोत हे त्याला एव्हाना माहीत झालंय. दागिना नाही तर कपडे याव्यतिरिक्त काय द्यायचं असतं अशा खास सणांना ! आपल्या नकळत आपल्यासाठी काही आणून ठेवलंय म्हणावं तर तसंही काही दिसत नाहीये आपल्या खोलीत. छे ! आपण फारच विचार करतोय यावर. गिफ्ट दिलं म्हणजेच प्रेम आहे, अशातलाही भाग नाहीये. प्रेम हे ’आहेच’ आणि ते नवथर असलं तरी बालिश नाहीये. शिवाय दुतर्फी असल्यानं आपण त्याची गिफ्ट आधीच आणून ठेवलीये. मूव्ही कॅमेरा. फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे त्याला. छोटे-मोठे दोन-तीन कॅमेरे आहेत तसे त्याच्याजवळ; पण हे एकदम लेटेस्ट मॉडेल आहे. त्याचा चेहराच खुलेल माझी ही ‘पाडवा गिफ्ट’ पाहिल्यावर. भुवया उंचावून हसेल आणि हनुवटीला मस्त छोटासा खळगा (की खळगी?) पडेल. या खळगीनेच तर आपल्याला वेड लावलं ना..? त्याच्या आनंदानं आपणही आनंदित होऊ. पाडवा असाच तर साजरा करायचा असतो ना !!


तो
दिवाळीतल्या पाडव्याला ‘तिची‘ आठवण अजूनही एवढय़ा उत्कटतेनं का होते? ‘ती‘ आपलं पहिलं प्रेम होतं, आपण मनोमन तिला आपली बायको मानलं होतं म्हणून तर नसेल ? असं काय होतं तिच्यात की तिची आठवण इतक्या वर्षांंनंतरही पुसली जात नाही मनातून ! तसं बघायला गेलं तर किती साधी होती ती. खास रंगरूप असं काहीच नव्हतं तिच्याजवळ. वर्ण सावळाच. पण डोळे ! डोळे विलक्षण बोलके होते. कथा-कादंबर्‍यांतून बोलक्या डोळ्यांचं वर्णन नुसतं वाचलं होतं. पण तिचे डोळे पाहिल्यानंतर डोळे खरंच बोलतात हे पटलं. ती कवी कल्पना नाही हे प्रकर्षानं जाणवलं. एक प्रकारचं तेज होतं तिच्या डोळ्यात. आपल्याशी बोलताना तर असे चमकायचे तिचे डोळे !! वाटायचं, काही न बोलता तासन्तास नुसतं बघत बसावं तिच्या डोळ्यांकडे. सगळ्या सणावारांची शास्त्रीय माहिती सांगायची. हे का करायचं, ते का करायचं. अगदी कारणासहित पटवून द्यायची. मी म्हणायचो की, ‘तुला आजीबाई म्हणत असतील सगळे‘ ‘म्हणू देत. त्यानं काय फरक पडतो ?‘ माझ्या चिडवण्यावर तिचं हे सहज उत्तर ठरलेलं. पण तिच्या या सहजतेवरही आपला लोभ जडला होता. पाडवा हा साडेतीन मुहूर्तातला अर्धा मुहूर्त. आपल्या आयुष्यातही अर्धाच राहून गेला. जाती-भेदाच्या अदृश्य भिंतींनी दोघांना कठोरपणे विलग केलं . साम, दाम, दंड, भेद कशाचाच उपयोग झाला नाही. पळून जाऊन लग्न करण्याचं धैर्य त्यावेळी नव्हतं. ती कायमची दुरावल्यानंतर मनानं मग लग्न न करण्याचाच निर्णय घेतला. मित्रमंडळी, घरचे ’लग्न कर’ असं सांगून थकले; पण ’तू नही और सही’ हा माझ्या जगण्याचा ‘फॉम्र्युला’ कधीच झाला नाही. तिच्याशिवाय दुसर्‍या कुणाशीतरी संसार करणं कल्पनेतही शक्य नव्हतं. मला संसार करायचा नव्हता तर ’जगायचा’ होता. इतरांच्या लेखी वेड्या असलेल्या माझ्या मानानं मला आत्तापर्यंंत शहाण्यासारखं सावरून घेतलाय. पण पाडवा आला की, मात्र ते त्या दिवसापुरतं वेडं होतं. तिला काचेच्या बांगड्या खूप आवडायच्या. रंगीबेरंगी, प्लेन, वर्कच्या पण काचेच्याच. दरवर्षी माझी तिला काचेच्या बांगड्यांची ‘पाडवा गिफ्ट’ असते. तिच्यासाठी आणलेली पण तिच्यापर्यंंत पोचू न शकलेली.. मग ही गिफ्ट माझ्या कपाटात स्थिरावते. कपाटातले दोन-तीन कप्पे गच्च भरले या बांगड्यांनी. तरीही दरवर्षी काचेच्या बांगड्या खरेदी करण्याचा माझा नेम अजूनपर्यंंत चुकलेला नाही. तीस वर्षे झाली.. कपाटातल्या कप्प्यांमध्ये आणलेल्या बांगड्या ठेवत ठेवत माझा पाडव्याचा दिवस उगवतो आणि मावळतोही.. लग्न न करताही केवळ तिच्या आठवणीनं माझा पाडवा आमच्यातल्या प्रेमाच्या जुन्या आठवणी काढत मस्त साजरा होतो.


ती
घटस्फोटानंतरचा हा कितवा पाडवा ? नववा की दहावा ? कितवाही असला तरी आता काय फरक पडणारे ! पण पाडव्याच्या दिवशी येणारी त्याची आठवण आपल्याला हळवं करून जातं एवढं मात्र नक्की. काही सांगताच येत नाही काय वाटतं ते. किती हौसेनं आपण त्याच्या घरी त्याची बायको म्हणून आलो. तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं की पुढे असं काही होईल म्हणून. आणि असा अभद्र विचार कुणी करतं तरी का ? पण प्रत्यक्षात तसं झालं खरं. पहिली दोन-तीन वर्षंं छान आनंदात गेली. नि पुढे सगळं बिनसतच गेलं. त्याचं माझ्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं हे आधी काळजीचं लक्षण वाटायचं; पण नंतर ते काळजी करण्याइतकं गंभीर झालं. माझ्या काहीशा स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला ते छेद देऊ लागलं. वादावादी, अबोले, बहिष्कार, शारीरिक अडवणूक हे सारं दोघांकडूनही होऊ लागलं. ’लग्न म्हणजे जुगार’ हे पूर्वी न पटणारं वाक्य माझ्यासमोर आ वासून अक्राळविक्राळपणे उभं राहिलं आणि मग त्या वाक्याशी पटवून घ्यावंच लागलं. हरण्याचा एक नवाच अर्थ उमगत गेला. एक नवरा चांगला असला की बाकीच्या लोकांशी कसंपण पटवून घेता येतं. इथे चांगुलपणाच्या व्याख्याच निराळ्या होत्या. बाकीच्या माणसांशी जमणं, न जमणं या पुढच्या गोष्टी. आई म्हणते, ‘तुझ्या हेकेखोर स्वभावाला थोडीशी मुरड घातली असतीस तर.. स्वभाव म्हणजे काय घोटीव कागद आहे? पाहिजे तेव्हा, पाहिजे तशी, पाहिजे त्या कोपर्‍याला मुरड घालायला ! उलट या स्वतंत्र स्वभावामुळे त्याच्या त्या तशा वागणुकीनंतर स्वतंत्रपणे राहायचा विचार तरी करू शकले आणि अर्थातच अमलातही आणू शकले. इतर सणांचं काही वाटत नाही, मात्र पाडवा आला की त्याच्या सहवासातले हळुवार क्षण कितीही प्रयत्न केले तरी आठवतातच. नवर्‍यानं बायकोसाठी काहीतरी प्रेमानं आणण्यातली मजा मी माझ्या आयुष्यात काही वर्षांंसाठी तरी नक्कीच अनुभवली. त्या गोड आठवणीनेच दरवर्षीच्या दिवाळीचा माझा पाडवा गोड होतो. रूढार्थानं तो वाईट नव्हता आणि नाहीही. पण दोघांच्या आयुष्यानं दोन समांतर रेषा आखल्या. एकमेकांना भेटण्याच्या शक्यता नाकारणार्‍या त्या रेषा.. त्या रेषांना वळवण्याची, वाकवण्याची ताकद एखादा पाडवा नक्की देईल ही आशा मला अजूनही आहे.


तो
मागच्या वर्षीच्या पाडव्यालाच माझं आयुष्य कोरं करून भिंतीवरच्या फोटोत हसत हसत जाऊन बसलीस. अनिकेतच्या पहिल्या दिवाळ सणासाठी तरी थांबायचंस. पण त्या सर्वशक्तिमान काळापुढे आपली काय मात्रा चालणार? आपल्या श्‍वासांचा हिशेब अगदी काटेकोरपणे त्याच्याकडे मांडलेला असतो. तो चुकत नाही. जे अशाश्‍वत आहे ते जीवन, त्याला आपण शाश्‍वत मानतो आणि जो शाश्‍वत आहे तो मृत्यू त्याचं आपण अस्तित्वदेखील मानायला तयार होत नाही, नव्हे तो आपल्या खिजगणतीतही नसतो. एकरूप होणं म्हणजे काय ते यांच्याकडे बघून शिकावं, असं सोसायटीतले सगळे म्हणायचे. आठवतं ना ? तू खरच किती एकरूप झाली होतीस माझ्याशी ! तुझ्यावरच्या चांगल्या संस्कारांचा हा परिणाम होता की आपल्या पिढीला दिल्या गेलेल्या शिकवणुकीचा परिपाक होता? कारण काही असेल, पण तू माझ्या संसारात साखरेसारखी पूर्णपणे विरघळून गेली होतीस. स्वतंत्र अस्तित्व, आजच्या नव्या युगाप्रमाणे हवी असणारी स्पेस, चौथा कमरा की काय म्हणतात त्याची गरज या कशाकशाचीच आवश्यकता तुला कधीच वाटली नाही. पाडव्याची ओवाळणी म्हणजे भारीपैकी सिल्कची साडी हे समीकरण अगदी ठरलेलं असायचं. साडीची घडी मोडल्यानंतर प्रसन्न चेहर्‍यानं माझ्यासमोर उभी राहायचीस, मी कौतुकाचे दोन शब्द बोलावेत या अपेक्षेनं.. माझ्या नजरेत तुला ते कौतुक दिसायचं. तू हसून पाठमोरी व्हायचीस. न बोलताच एकमेकांना सारं काही कळायचं. मी आणलेल्या साडीला कधी नावं ठेवली नाहीस की रंगाबद्दल कधी तक्रार केली नाहीस. किमतीचं लेबल तर चुकूनसुद्धा कधी पाहिलं नाहीस. आजच्या जगात बाद ठरलेल्या तुझ्या या भोळ्या स्वभावाचं मला अप्रूप वाटायचं. पन्नाशी पार केल्यानंतरही एखाद्याला इतकं निरागस, भाबडं राहता येतं ? आजच्या पिढीला ही समरसता म्हणजे वेडगळपणाच वाटण्याची शक्यता जास्त. स्त्रीने व पुरुषाने दोघांनी आपापली स्वाभाविकता जपली तर किती मृदू आणि तरल नातं तयार होतं हे मला माझ्या नशिबामुळेच अनुभवायला मिळालं. या पाडव्याला तू नाहीस. पण इतक्या वर्षांंंच्या आपल्या सहजीवनातल्या आपल्या सोबतीच्या आठवणी तर आहे.. यातली एक एक आठवण रोज वेचली तरी उरलेलं आयुष्य अगदी आनंदात पार पडेल बघ. या वर्षी आपल्या अनिकेतचा आणि रूचाचा पहिला पाडवा आहे. त्यांचा प्रत्येक पाडवा गोड व्हावा हाच माझा आणि तुझा त्यांना गोड आशीर्वाद..!


ती
‘पाडव्याला काय हवं ते घे. कोरा चेक देऊ का ?‘
‘कोरा द्या. पण सही करून द्या.‘
हा दरवर्षीचा संवाद याही वर्षी झाला. अगदी कालच झाला. पाडव्याची ओवाळणी म्हणजे काहीतरी सरप्राईज वगैरे असं काही नसतं आमच्याकडे. मीच जायचं, काय हवं ते घेऊन यायचं. आधी मला हे फार विचित्र वाटायचं. पाडव्याच्या ओवाळणीबद्दलच्या अगदी रोमँटिक कल्पना होत्या आधी माझ्या. पण आता या वास्तवातच मी रोमान्स शोधायला शिकले आहे. आपणच आपलं गिफ्ट आणणं श्रेयस्कर वाटायला लागलं आहे. आवडलं नाही म्हणून बदलून आणण्याची मुख्य भानगड नसते या प्रकारात. औक्षणाचं तबक तयार करायच्या आधीच यांच्या हातात मीच खरेदी करून आणलेलं पुडकं देते आणि ओवाळून झालं की यांच्याकडून तेच पुडकं ’ओवाळणी’ म्हणून हातात घेते. पोरं जाम फिरकी घेतात यांची. ‘डॅड, कधीतरी सरप्राइज गिफ्ट द्या की आईला.‘ ‘अरे, मलाच दरवर्षी चेकवरच्या आकड्यावरचं सरप्राइज असतं. त्यात मी परत तिला कशाला सरप्राइज देऊ ?‘ अशा सुखद संवादांनी पाडव्याच्या ओवाळणी महोत्सवाची सांगता होते. आपल्या आयुष्याबद्दलच्या सगळ्या अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत. काहीच न देण्यापेक्षा, विसरण्यापेक्षा ही अशी समजून उमजून दिलेली ओवाळणीच मला आता जास्त आवडते. सवयीचा परिणाम. दुसरं काय ! एकदा सवय झाली की तेच बरं वाटू लागतं. कोणत्याही रकमेचा आकडा घालण्याचं स्वातंत्र्य मला आहे. नंतर त्या आकड्याबद्दल कधी कटकटही नसते. मग अजून काय हवं ? उगाच नसत्या रोमँटिक कल्पना उराशी बाळगून दु:खी कशाला व्ह्ययचं ? जे आहे त्यात आनंद मानायचा. आणि ’मानायचा’ असं कशाला ? आनंद आहेच. खूप आनंद आहे.

तर असा हा आनंदच आनंद घेऊन येणारा दिवाळी पाडवा. सगळ्या सणांचा राजा. तिला आणि त्याला दोघांनाही खूश करणारा. नात्यातला गोडवा वाढवणारा आणि टिकवणारा. जुन्या आठवणीत रमवणारा, कधी हसवणारा तर कधी व्याकुळ करणारा. नातं नवरा बायकोचं असो नाहीतर प्रियकर प्रेयसीचं. शेवटी ते असतात ‘तो‘ आणि ‘ती‘च. वेगवेगळ्या घरातून आलेले, वेगवेगळ्या संस्कारांमध्ये वाढलेले, आयुष्याबद्दलच्या, सणावारांच्या वेगवेगळ्या कल्पना उराशी बाळगणारे. तो आणि ती हे ‘कॉम्बिनेशन’च असं भारी आहे ना की प्रत्येक घरात त्याचे रंग वेगळे असतात. बरोबर आहे, कारण प्रत्येक घरातले ‘तो‘ आणि ‘ती‘ हे वेगळेच ना !! तुमच्यातल्या ‘ती‘ किंवा तुमच्यातल्या ‘तो‘ चं वेगळेपण असंच जपा आणि पाडव्याच्या सणाची रंगत वाढवा.

मनाने तरुण असणार्‍या आजी-आजोबांनो
- जुन्या आनंददायी आठवणींना उजाळा द्या. त्या लखलखणार्‍या आठवणी म्हणजेच अखंड प्रकाशणार्‍या पणत्याच नाही का !
- मुला, नातवंडासमवेत पाडव्याचा आनंद घ्या. त्यांच्या आनंदात सहभागी व्हा.
- काही देण्या-घेण्याच्या पलीकडे पोहोचलेलं हे वय. तुमच्या समवयस्कांमध्ये चांगले विचार, चांगल्या आठवणी वाटा.
- पाडव्याच्या सुमुहूर्तावर तब्येत चांगली राखण्याचा व पथ्यपाणी सांभाळण्याचा निश्‍चय करा.
- तुमची खासियत असलेला फराळाचा एखादा पदार्थ आवर्जून करा. नातवंडांना आजीच्या हातचा तो पदार्थ जास्त आवडतो.
- तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप मोलाचे आहात आणि सर्वांंना हवे आहात, हा सकारात्मक विचार तुमचा हा एकच पाडवा नव्हे तर इथून पुढे येणारा प्रत्येक पाडवा गोड करणार आहे याची मनाशी पक्की खूणगाठ बांधा.


स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या  

तुम्ही तुमच्या मेंदूला हॅक कसे कराल?

आधुनिक भारतातील अदभुत प्राचीन मंदिरे  

तुम्ही लकी असण्याची लक्षणे कोणती?

मां दुर्गा के 108 नाम: पांच मिनट की साधना दिखाएगी कमाल 

40 Most Powerful Military Nations of 2016

मृत्यु से 6 महीने पहले ये 7 काम नहीं कर पाते हैं लोग

नरेंद्र मोदी यांच्या सहीचे विश्लेषण  

तुमची सही बोलते तुमचा स्वभाव 

आयुर्वेद के ये 10 चमत्कार आपको कभी बीमार नहीं पड़ने देंगे

 


 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive