Saturday, March 24, 2012

गौतमीपुत्राचा विजयोत्सव



शालिवाहन मुळचा शब्द तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहनांनी शकांचे हनन केले. ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
..........

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. पुराणकारांनी प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. परंतु या सणामागे गौतमीपुत्र सातकणीर्च्या नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयामध्ये आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. गुढीपाडव्याचा व शालिवाहन शकाच्या सुरुवातीचा इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा.

शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. संस्कृतीकरणाच्या नादात इतिहास कसा हरवतो याचे हे एक उदाहरण आहे.

सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवीसन पूर्व २२० ते २३० अशी जवळपास साडेचारशे वर्ष सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक. छिमुक सातवाहन हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक. साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.

परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' खरे तर गनिमी काव्याचा आद्य जनक गौतमीपुत्र सातकर्णी होय! शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. पुढे हाल सातवाहनाने (तोच हाल ज्याची गाथासत्तसई (गाथा सप्तशति) आजही जगभर अमोलिक काव्यभांडार म्हणून प्रसिद्ध आहे!) तर श्रीलंकेवर विजय मिळवून तेथील राजकन्येशी विवाहही केला. त्यावर लीलावती हे महाकाव्यही लिहिले गेले.

अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही. (याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते) अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. प्राकृत भाषांना भ्रष्ट करत इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले.

सत्य हे आहे की शालिवाहन हा मुळचा शब्द नसून तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहन हे माहाराष्ट्री प्राकृताचे भोक्ते होते. संकृत अजून जन्मालाच यायची होती. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.

आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही जरूर ठेवायला हवी.

संजय सोनवणी

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive