Friday, March 23, 2012

होळकरी थाट - Marathi People in Indore

अटकेपार झेंडा रोवल्यानंतर जिंकलेल्या मुलुखात राज्य कारभार सुव्यवस्थित रीतीने चालावा यासाठी पेशव्यांनी ठिकठिकाणी जे सुभेदार व सरदार नेमले होते, तीच मंडळी पुढे स्वत: राजे, महाराजे बनून संस्थानिक म्हणून आपले बस्तान जमवून बसले. अशा मंडळीत इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे व बडोद्याचे गायकवाड यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

या संस्थानिकांनी आपला राज्यकारभार सुचारू रुपाने चालावा म्हणून महाराष्ट्रातील अनेक धुरंधर व्यक्तींना आपापल्या राज्यात नेमणुका दिल्या. या मंडळींबरोबरच त्यांचे अनेक सहकारी व आश्रित मोठ्या संख्येने या संस्थानांत आले व तिथेच स्थायिक होऊन स्थानिक लोकांत मिसळून गेले. तरीसुद्घा त्यांनी मराठी संस्कृतीच्या संबंधात आपली अस्मिता जागृत ठेवून अनेक रुपाने मराठी संस्कृती व सभ्यता आपापल्या क्षेत्रात रोवली व रुजवली. इंदूर संस्थान त्यातीलच एक. पण या संस्थानाला देवी अहिल्याबाईंसारख्या धर्मपरायण आणि कुशल प्रशासकीय गुण असलेल्या महिलेचे नेतत्त्व लाभल्यामुळे येथे मराठी संस्कृती अधिक जोमाने फुलली आणि फळली. त्यामुळे महाराष्ट्रातील सणवार वगैरे तितक्यात श्रद्घेने अन दणक्यात साजरे करण्याची परंपरा येथे सुरू झाली, ती आजतागायत सुरू आहे.

सामान्य जनतेप्रमाणेच होळकर राजघराण्यातही गुढी पाडवा हा सण विधीपूर्वक साजरा केला जाई व अद्यापही त्या घराण्याच्या वंशजांमार्फत साजरा होत असतो. पूर्वी होळकर राजे किंवा त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रतिनिधींद्वारा व सध्या राजपुरोहितामार्फत त्या परंपरेची पूर्तता होत असते.

या दिवशी ब्रह्माध्वज म्हणून प्रथम गुढीची पूजा केली जाते. त्यानंतर होळकरांच्या लाल आणि धवल वर्णांकित राजध्वजाची पूजा विधीवत केली जाते. या प्रसंगी सोन्याच्या सूर्ययंत्राची पूजा केली जाऊन सूयोर्दयाच्या सुमुहूर्तावर त्या यंत्रावर अर्घ्यदान करुन नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. त्यानंतर पंचांग, घटिकायंत्र, राजगादी, नगारखान्यातील वाद्य आदींची पूजा झाल्यानंतर राजज्योतिषी वर्षफलाचे वाचन करतात.

आज नव्या पिढीने या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप देऊन जुन्या राजवाड्यासमोरील उद्यानात व इतरत्रही नव्या वस्त्रालंकाराने सजलेले स्त्री-पुरुष सूर्योदयाच्या वेळी सूर्याला सामूहिक अर्घ्यदान करून नव्या वर्षाचे स्वागत करतात. हा सोहळा खरोखरीच प्रेक्षणीय असतो, कारण त्यात मराठी भाषिकांबरोबरच स्थानिक हिंदी भाषिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात.

सानंद न्यास या इंदूरच्या लोकप्रिय संस्थेच्या वतीने प्रात:कालीन संगीत सभेच्या माध्यमातून सुमधूर संगीत लहरींत नव्या वर्षाचे स्वागत करण्याची उत्कृष्ट परंपरा काही वर्षांपासून सुरू झाली आहे. त्यानुसार यावषीर् पंडित जितेंद अभिषेकी व गान सरस्वती किशोरी आमोणकर यांची सुशिष्या देवकी पंडित यांच्या सुश्राव्य गायनाने नव्या वर्षाचे स्वागत व अभिनंदन होणरा आहे. खाद्य रसिकही मोठ्या आतुरतेने गुढीपाडव्याची वाट पाहत असतात. दह्या-दुधाच्या दुकानांसमोर टांगलेल्या झोळ्यांमध्ये तयार होणाऱ्या शेकडो किलो चक्क्याचा विक्रमी खप होत असतो. जवळ जवळ घरोघरी केशर, इलायची, जायफळादीने सुगंधीत झालेले व बदाम पिस्त्यांच्या कापांनी सजलेले श्रीखंड केव्हा जिभेवर विरघळते यासाठी खाद्य रसिक अगदी हातघाईवर आलेले असतात. संध्याकाळी मंत्राक्षता वाहून गुढी उतरवली जाते. परंतु गुढीच्या आगमनाची खुमारी मात्र बराच काळ टिकून राहते हे खरे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive