कोलकात्याला मराठी माणसे शे-सव्वाशे वर्षांपूर्वी आली. त्यांनी १९२४ सालामध्ये महाराष्ट्र मंडळ स्थापन केले. नंतर १० वर्षांनी 'महाराष्ट्र निवास' नावाची इमारत उभी केली. त्यामुळे मराठी संस्कृती जपणे सोयीचे झाले. त्यामुळे आपले सण व उत्सव सामूहिकरीत्या साजरे होतात; तर घरोघरी कुळाचार पाळून कौटुंबिक संस्कृती जपली जाते.
कोलकात्यात बरीच मराठी माणसे आपल्या घरी गुढी उभारून नव्या वर्षाची सुरुवात करतात. महाराष्ट्र मंडळात सामूहिकरीत्या गुढीवंदनाचा कार्यक्रम होतो. लाठीवर रेशमी वस्त्र, त्यावर कलश व हार घातलेल्या गुढीचे विधिवत पूजन, प्रसाद, नैवैद्य व आरती होते. सर्वजण गुढीवर फुले वाहतात व वडील मंडळींना नमस्कार करतात. त्यानंतर प्रथम कडुलिंबाच्या पानाचे सर्वजण सेवन करतात. प्रसाद वाटला जातो आणि चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता होते.
मराठी समाज घरोघरी तोरण लावून गुढी उभारतो. घरोघरी श्रीखंड, पुरणपोळीचे विशेष भोजन असतेच. शिवाय महाराष्ट्र निवासमध्ये श्रीखंड, पुरणपोळ्या विकत मिळण्याची सोय आहे. बंगाली लोकांत गुढीपाडव्याला महत्त्व नसते; कारण त्यांचे नवे वर्ष 'पोयला वैशाख' १४ एप्रिलला सुरू होते. १०० वर्षांपूर्वी बनारस, अलाहाबादकडून भट्ट, पोहरे, शुक्ल, झारखंडी, जोशी इत्यादी कुटुंबे हावडा-कालकात्यात स्थायिक झाली. या कुटुंबांत आजही मराठी सण, उत्सव, कुळाचार पारंपरिकरीत्या पाळले जातात. नव्याने येणाऱ्या आधुनिक कुटुंबांत अशा गोष्टींत काटछाट होते. पंडित नागेशशास्त्री जोशी व विनायक साठे यांच्या पौरोहित्यामुळे अशा उपक्रमांत बरीच मदत होते.
मंडळात गुढीपाडव्याला सायंकाळी प्रीतीभोजनाला हजर राहून सर्व सभासद एकमेकांना नवसंवत्सराच्या शुभेच्छा देतात.
No comments:
Post a Comment