‘ओढ’
आधी हवाहवासा वाटणारा एकटेपणा नंतर खायला उठतो. किमान भांडण्यासाठी तरी घरात माणसं हवीशी वाटतात. भूतकाळात पालक म्हणून केलेल्या चुका मन खात राहतात. रुसलेली मुलं शेवटी आपलीच असतात. आपल्याला त्यांची आणि त्यांना आपली गरज ही असणारंच. मायेपुढं, प्रेमापुढं चुका, शिक्षा, रुसवा, फुगवा सर्व काही विसरलं जातं..
जिन्याच्या बावन्न पायर्या चढून फ्लॅटपाशी येईपर्यंत विजयाबाई दमून गेल्या. हातातली पिशवी भिंतीला टेकवून ठेवत दार उघडून त्या घरात शिरल्या. चांगलाच दम लागला होता. पण घोटभर पाणी आणून देणारंही कुणी नाही. त्या खंतावल्या. चपला जागेवर ठेवून हात-पाय धुवून पाणी पिताना त्यांना उगाचच उदास वाटलं. खरं तर असा उगाचच उदास, निराश, हतबल होण्याचा आपला स्वभाव नाही. पण आता होतं खरं असं. विशेषत: बाहेरून आल्यावर ही एकटेपणाची जाणीव जास्तच बोचते. आता तर एकटीसाठी भाजी आणण्याचा आणि ती करण्याचाही कंटाळा येतो. मग कुठे दही पोहेच कर, बाहेरून इडल्याच आणून खा, असं काहीतरी केलं जातं. मध्येच कधीतरी आपण पौष्टिक खायला हवं याची जाणीव होते. पण ती तेवढय़ापुरतीच. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. आपण आळशी तर नाही ना होत चाललोत? की आपल्या म्हातारपणाची ही सुरुवात आहे? पांढर्या केसांची तमा कधी नाही बाळगली, पण हे हलक्या पावलांनी येणारं म्हातारपण मात्र आपल्याला अगतिक करणार की काय? पाण्याचं भांडं ओट्यावरच ठेवून विजयाबाई बाहेर दिवाणखान्यात येऊन सोफ्यावर डोळे मिटून शांतपणे बसून राहिल्या.
ऽऽऽऽऽऽ
‘आई, पंकजला क्वार्टर्स मिळतायत. पुढच्या गुरुवारी आम्ही तिकडे राहायला जातोय.‘ अर्पितानं शांतपणं सांगितलं. ‘अगं, पण इथे काय अडचण आहे?‘ विजयाबाई नाही म्हटलं तरी थोड्याशा चिडल्याच. ‘इथे सगळीच अडचण आहे आई!‘ ‘म्हणजे?‘ ‘आई, कशाला बोलायला लावतेस ? मी आतापर्यंत नेहमीच बोलून वाईटपणा घेतलाय. ताईसारखं न बोलून सगळं साधून घेणं मला कधीच जमलं नाही.‘ ‘आता ताई कशाला हवीये मध्ये?‘ अर्पिता गप्प बसली. पण विजयाबाईंना राहावेना. ‘सुख दुखतंय का तुम्हा दोघांचं इथे राहून?‘ ‘आई, उगाच काहीतरी बोलू नकोस. ताईने त्या जपान्याबरोबर लग्न करून थाटलाय ना तिकडेच संसार ! बघितलं ना स्वत:चं सुख? तेव्हा नाही तू तिला काही बोललीस ! उलट अगदी ती जाईपर्यंत कौतुकच चाललं होतं तिचं.‘ ‘ती आहेच कौतुक करण्यासारखी.‘ ‘हेच ते. हेच तू अखंडपणे करत आलीस. तिचं कायम कौतुक अन् मला सतत टोमणे. नसेन मी तिच्यासारखी हुशार, नसेन मी तिच्याइतकी कर्तबगार, पण आई, मलाही मन आहे. भावना आहेत. आणि ते जपणारा ’आपल्यातलाच’ प्रेमळ नवराही आहे.‘ ‘मग काय ताईचा नवरा प्रेमळ नाही असं म्हणायचंय का?‘ ‘आई, उगाच विषयाला फाटे फोडू नकोस. आम्ही येत्या गुरुवारी तिकडे राहायला जातोय. जाताना इथलं काहीही घेऊन जात नाहीयेत, काळजी क नकोस. तिकडे आम्हाला जमेल तसं, जमेल तेवढं आम्ही घेऊ नि राहू. आठवड्यातून एकदा तुला हवं असेल तर मारीन चक्कर.‘ ‘मला हवं असेल तर? अर्पिता..‘ ‘आम्ही इथे राहत होतो ते तुला तितकंसं पसंत नव्हतं हे आम्ही दोघांनीही कधीच ओळखलं होतं आई, पण आमचा हात दगडाखाली होता. नवीन फ्लॅट घेणं सध्या तरी आमच्या आवाक्याबाहेरचं आहे. म्हणून पंकज क्वार्टर्स मिळवण्याची खटपट करत होता. नशिबाने मिळाली.‘ क्षण दोन क्षण कुणीच काही बोललं नाही. ‘मी तुझ्याशी फटकून वागले, तुझं कौतुक केलं नाही म्हणून ही शिक्षा आहे का मला?‘ ‘शिक्षा देणारी मी कोण आई? एवढं मात्र खरं की, आई म्हणजे वात्सल्यमूर्ती, आई म्हणजे त्याग हे माझ्या बाबतीत तरी पुस्तकापुरतंच राहिलं.‘ ‘बस अर्पिता. फार बोललीस.‘ विजयाबाई जोरात ओरडल्या. अन् जाग्या झाल्या.
ऽऽऽऽऽऽ
आपण तिच्याशी अनवधानाने का होईना पण खरंच तसंच वागलो. ताईचं पहिली बेटी धनाची पेटी म्हणून कोडकौतुक केलं. पुढं तिनं तिच्या रूपागुणांनी अजूनच जिंकून घेतलं. अर्पिताच्या वेळी मुलगा हवा असं सगळ्यांना वाटत होतं. पण परत मुलगीच झाली. नाही म्हटलं तरी सगळेच हिरमुसले. दोघींमध्ये सर्वच बाबतीत जमीन अस्मानाचं अंतर. आणि हे अंतर आपणच नंतर वाढवत नेलं. मग आता ती आपल्याला सोडून क्वार्टर्समध्ये राहायला गेली तर तिचं काय चुकलं? त्या दिवशी ती जे काही बोलली ते सत्यच आहे की. पंकज खरंच खूप चांगला आहे. पण आपल्यालाच अशा चांगल्या जावयाला धरून ठेवता आलं नाही. अजून आपण हिंडत्या-फिरत्या आहोत म्हणून ठीक आहे. पण अजून दहा वर्षांंनी काय ! त्यांना क्वार्टर्समध्ये राहायला जाऊनही तीन वर्षं होऊन गेली. आपण तसा आपला जीव रमवतो. अमकं मंडळ, तमक्या कट्ट्यावर जातो. गप्पा मारतो. पण ते सारं तकलुपी वाटतं. भांडायला का होईना पण आपलीच माणसं हवीत, दोन का असेनात ! पहिल्यांदा एकटं, स्वतंत्र छान वाटलं. पण आता नको वाटतं. अर्पिताजवळ चूक कबूल करावी अन् बोलवावं परत तिला इकडे.
ऽऽऽऽऽऽ
बेल वाजली तशा त्या उठल्या. सेफ्टी होलमधून पाहिलं तर पंकज उभा होता. त्यांनी दार उघडलं. ‘तुम्ही? आत्ता? ...आणि एकटेच आलात?‘
‘हो हो आई, जरा बसू तर द्या.‘ विजयाबाई किंचित ओशाळल्या. ‘आता आम्ही दोघं एकटे नसणारोत.‘ ‘म्हणजे?‘ ‘अर्पिताला दुसरा महिना आहे. तुम्हाला आमच्याकडे येणं शक्य असेल तर तिनं तुम्हाला बोलावलंय.‘ विजयाबाई एकदम उल्हासित झाल्या. पण लगेच त्यांना वाटलं की अर्पिताने फोन करून कळवायचं तरी, इतक्या दिवसांनी दिवस राहिलेत ते. ‘बघा, शक्य असेल तर...‘ ‘अहो, शक्य काय असायचंय? होणार्या नातवंडांसाठी आजीनं यायलाच हवं. सांगा अर्पूला मी येतीये म्हणून.’ विजयाबाई कित्येक वर्षांंनी अर्पिताला ‘अर्पू’ म्हणाल्या. पंकजलाही ते ठळकपणे जाणवलं.
- अर्चना बापट

No comments:
Post a Comment