Friday, March 23, 2012

संस्थानी रुबाब - Marathi people in Baroda

डोक्यावर फेटे... नऊवारी साड्या घातलेल्या महिला... तसं हे दृश्य गुढीपाडव्याच्या दिवशी काही विशेष नाही. परंतु हे दृश्य जर बडोद्यात असेल तर ते विशेषच म्हणावे लागेल. हजारो मराठी बडोदेकर दर गुढीपाडव्याची दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पारंपरिक पोषाखात एकत्र येतात आणि पाडव्याच्या सणाचा आनंद लुटतात.

पाडव्याचा दिवसाची सुरुवात येथील मंडळी बडोद्यातील गायकवाड यांच्या राजघराण्याची कुलदैवत रेणू माता यांच्या दर्शनाने करतात. या मंदिरात उभारलेल्या गुढीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर प्रत्येकाच्या घराघरात गुढी उभारण्यात येते. गायकवाडांच्या राजवाड्यात गुढी उभारण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यानिमित्ताने विविध ठिकाणी स्थायिक झालेली गायकवाडमंडळी एकत्र येतात आणि उत्सवाचा आनंद लुटताता. गुढी उभारण्याची पद्धत महाराष्ट्रीयच असली तरी येथील गुढीला दागिन्यांनी सजविण्याची प्रथा इथं आहे. सजवलेल्या गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य करण्यात येतो. यामध्ये पुरोणपोळी आणि जिलेबीची विशेष मेजवानी असते. या निमित्ताने एकमेकांच्या घरी नाश्ता करण्याची अनोखी पद्धत येथील सोसायट्यांमध्ये आहे. नाश्त्यामध्ये मात्र गुजराती खाद्यसंस्कृतीला धरून खास मठीये आणि चोळाफळीचा बेत असतो.

बडोद्यातील विविध मराठी मंडळांच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये रांगोळी स्पर्धेपासून ते खाद्यमेळाव्यांचाही समावेश असतो. यानिमित्ताने बडोद्यातील नामवंत मराठी व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. काही मंडळे गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करतात तर काही मंडळे नाटकाचे प्रयोगही ठेवतात. इथं सर्वात मोठा कार्यक्रम असतो तो म्हणजे स्नेहभोजनाचा. या कार्यक्रमाला मराठमोळ्या कार्यक्रमांचा आणि भोजनाचा आनंद लुटण्यासाठी येथील सुमारे दोन हजार कुटुंबीय सहभागी होतात. बडोदा महानगरपालिकेतफेर्ही या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये महापौर आणि आयुक्त मराठी नगरसेवकांना शुभेच्छा देतात आणि त्यांच्यासोबत चहापानाचा कार्यक्रम करतात. यापूर्वी केवळ दुरूनच या कार्यक्रमांची मजा लुटणारी गुजराती मंडळी आता एसएमएस शुभेच्छांच्या रूपाने यात थेट सहभागी होऊ लागले आहेत.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive