Thursday, May 31, 2012

रेल चक्र - आयत्या सिग्नलवर नागोबा ! Snake on railway Signal

रेल चक्र - आयत्या सिग्नलवर नागोबा !

सिग्नलच्या लिव्हरवर नाग वेटोळं घालून फणा काढून बसला होता. लिव्हरमन लिव्हरला हात लावणार तेवढ्यात त्याचं लक्ष फणा काढलेल्या नागाकडे गेलं. तसं तो ओरडला , मास्तर लिव्हरवर नाग. ' मुंबई-मदास एक्सप्रेस 11 डाऊन बारा वाजून पाच मिनिटांनी छेंगुटा स्टेशन पास होणार होती , पण...


भारतीय रेल्वेमध्ये एकूण 16.5 लाख कर्मचारी आहेत. हे मुख्यत: चार भागांत (major 4 department of Indian railway) कार्यरत असतात. परिचलन विभाग(transport dept) , वाणिज्य विभाग(railway commerce dept) , इंजिनीअरिंग विभाग(railway engineering dept) व व्यवस्थापन विभाग(railway management). या मुख्य चार विभागांना अनेक उपविभागही असतात.

परिचलन विभाग म्हणजे रेल्वेचा मेंदू. माणसाच्या शरीरात मेंदूला जे महत्त्व आहे , तेच महत्त्व रेल्वेत परिचलन विभागाला आहे. रेल्वेचा संपूर्ण कारभार नियंत्रण कार्यालयातून चालवला जातो. या नियंत्रण कार्यालयात कालच्या कामाचा आढावा घेतला जातो व आजच्या कामाची रूपरेषा ठरवली जाते. त्याप्रमाणे काम पार पाडलं जातं. हे नियंत्रण कार्यालय चोवीस तास म्हणजे रात्रंदिवस सुरू असतं. अजिबात सुट्टी नसते. नियंत्रण कार्यालयाचं प्रमुख काम म्हणजे मेल -एक्सप्रेस गाड्या वेळापत्रकानुसार सुरक्षित चालवणं , उपनगरीय गाड्यांची वाहतूकही वेळापत्रकानुसार करणं , मालगाड्या चालवणं इत्यादी. अधिकारी मुख्यनियंत्रक , उपमुख्य नियंत्रक , नियंत्रक इत्यादी मंडळी या कार्यालयात कार्यरत असतात. मी मध्य रेल्वेतून मुख्य नियंत्रक म्हणून निवृत्त झालो.

कंट्रोल ऑफिसचे काही किस्से मी नमूद करू इच्छितो. मी नियंत्रक म्हणून काम करत असताना एका स्टेशनला कंट्रोल फोनवर महत्त्वाचा मेसेज दिला व मेसेज घेणाऱ्या मास्तरचं नाव विचारलं.

तो म्हणाला , ' फातरफेकर ,'
मी म्हणालो ' शॉर्टमध्ये सांगा ,'
' शॉर्टमध्ये म्हणजे ?'

' शॉर्टमध्ये म्हणजे असं. आर.के म्हणजे राजकपूर , डीडी म्हणजे दूरदर्शन. थोडक्यात म्हणजे तुझं इनिशियल सांग ,'

' पीपीपी ,'
' म्हणजे ,'
' प्रकाश पुरुषोत्तम फातरफेकर '
' ओके ,'
' ओके नाही तुमचं इनिशियल सांगा ,'

कंट्रोलला इनिशियल विचारणारा हा पहिलाच मास्तर निघाला. कदाचित त्याचा आज नोकरीचा पहिला दिवस असावा , असा माझ्या मनात विचार आला.

तो पुन्हा म्हणाला , ' तुमचं इनिशियल सांगा. '
' तुझा नोकरीचा आज पहिला दिवस आहे का ?'
' होय. इनशियल सांगा. '
' व्हीव्हीडी. ' मी म्हणालो.
' टीव्हीडी. ' तो.
' नाही व्हीव्हीडी. ' मी
' काय सीव्हीडी. ' तो
' अरे बाबा व्हीव्हीडी , व्हेरी व्हेरी डेंजरस. '
' अरे बापरे! ' तो उद्गारला.

रेल्वेखात्यात ठराविक कालावधीत सप्ताह साजरे केले जातात. उदाहरणार्थ सौजन्य सप्ताह , सुरक्षा सप्ताह , समय पालन सप्ताह इत्यादी. समयपालन सप्ताहाचा पहिला दिवस होता. रेल्वेचा दिवस , रात्री बारा वाजता म्हणजे 00 ते 24.00 असा असतो. मंुबई-मदास एक्सप्रेस 11 डाऊन व आताची 6511 डाऊन रात्री 00-05 ला म्हणजे रात्रीचे बारा वाजून पाच मिनिटांची छेंगुटा स्टेशनवरून पास व्हायला पाहिजे होती. परंतु रात्रीचे बारा वाजून वीस मिनिटं झाली तरी छेंगुटा स्टेशन पास झाली नाही. लिंगेरी स्टेशनला मी रिंग दिली व विचारलं 11 डाऊन कुठे आहे ? तो म्हणतोय की छेंगुटाने अजून मला डिपार्चर दिलं नाही. म्हणजे 11 डाऊन अजून छेंगुटा पास झाली नाही. इतकंच नाही तर छेंगुटाचा स्टेशन मास्तर फोनवरही येत नाही. मी छेंगुटा स्टेशनला कंट्रोल फोनवर येण्यासाठी रिंग देत होतो. शेवटी 00.45 म्हणजे रात्रीचे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छेंगुटाचा मास्तर कंट्रोल फोनवर आला.

' छेंगुटा '

' बोल , छेंगुटा काय झालं ?' समयपालन सप्ताहामधली पहिलीच गाडी वाजवली का ?

' साहेब ती नागा मुळे वाजली. '
' काय ?'
' होय साहेब ,'
' काय , होय साहेब ? झोपायचं आणि वर खोटं बोलायचं ?'

' झोपायचं! काय बोलाताय साहेब , कायमचं झोपायची पाळी आली होती आमच्या लिव्हरमनवर. '
' म्हणजे. '

' अहो , सिग्नलच्या लिव्हरवर नाग वेटोळे घालून फणा काढून बसला होता. लिव्हरमन लिव्हरला हात लावणार तेवढ्यात त्याचं लक्ष फणा काढलेल्या नागाकडे गेलं. तसं तो ओरडला मास्तर लिव्हरवर नाग. '

' अस्स मग तेव्हाच तुम्ही कंट्रोल फोन व ब्लॉकफोनवर का येऊन सांगितलं नाहीत. आता पंचेचाळीस मिनिटं झाल्यानंतर हे कुभांड रचून सांगताय होय. '

' हे कुभांड नाही साहेब ब्लॉक फोन व कंट्रोल फोन घ्यायला जायचं म्हणजे नाग बसलेल्या लिव्हर जवळूनच जावं लागतंय. '

' काय थापा मारताय. '

' अहो थापा काय म्हणताय. त्या नागाला मारण्यासाठी गावातून या मल्ल्या नावाच्या माणसाला बोलावून आणलं. तो नाग-साप मारण्यात पटाईत आहे. असं लिव्हरमन म्हणाला. '

' एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोट्या गोष्टी बोलाव्या लागतात. तुम्ही तेच करताय. सरळ कबूल करा की झोपलो होतो म्हणून. '

' नाही साहेब , मी झोपलो नाही. पाहिजे तर पुरावा म्हणून तो मारलेला साप फ्री सव्हिर्स वे बिल नंबर रेल्वेने तुमच्या कार्यालयात पाठवून देतो. मगच खात्री पटेल तुमची. '

मला हसूच आलं. मी कंट्रोल चार्टवर त्या मास्तरने सांगितलेला किस्सा लिहिला व कंट्रोल फोन व ब्लॉक फोन घेण्यासाठी लिव्हरच्या जवळून जावं लागतं का , याचीही खातरजमा करावी. असा शेराही मारला.


- व्यंकटेश बोर्गीकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive