Monday, May 7, 2012

वेदनादायक मासिक पाळीपासून मुक्तता

वेदनादायक मासिक पाळीपासून मुक्तता
डॉ. श्रीपाद खेडेकर, होमिओपॅथी तज्ज्ञ

मासिक पाळीच्या वेळी वेदना होणे हे 13 ते 18 वयोगटातील मुलींसाठी व तरुण महिलांसाठी सर्रास झाले आहे. जसे वय वाढत जाते, तशा वेदना कमी होत जातात. वेदना शमवणाऱ्या औषधांमुळे थोडा आराम मिळतो, पण मासिक पाळीच्या वेळी वेदना होण्याचे कारण काय, हे सांगणे कठीण आहे. साधारणपणे 30 ते 40 वयाच्या महिलांना गर्भाशय व ओटीपोटी यांच्या त्रासामुळे वेदना होतात.

बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी वेदना होतात, परंतु दहामधील एका स्त्रीला एवढ्या तीव्र वेदना होतात, की तिला तिची दैनंदिन कामे करणेही कठीण जाते- ज्यामुळे अशी मुली व स्त्रिया शाळेत किंवा ऑफिसला जाऊ शकत नाहीत. वैद्यकशास्त्रात मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या या वेदनांना डिसमेनहोरिया म्हणतात. "प्राथमिक स्वरूपाचा डिसमेनहोरिया' हा सर्वसाधारण प्रकारचा मासिक पाळीच्या वेळचा वेदनांचा प्रकार आहे. त्याच्या मुळाशी गर्भाशय व ओटीपोट यांच्या समस्या हे कारण नाही. हा प्रकार साधारणपणे विशीतील मुलींमध्ये दिसून येतो. "दुय्यम स्वरूपाचा डिसमेनहोरिया' हा प्रकार गर्भाशय व ओटीपोटाच्या समस्या असणाऱ्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. हा प्रकार जास्त करून तिशी-चाळिशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो.

लक्षणे :
  • पायाच्या वरील भागात, म्हणजेच मांड्यांमध्ये किंवा पाठीच्या खालील बाजूस, म्हणजेच कंबरेत दुखणे.
  • पाळीच्या आधी एक दिवस किंवा रक्तस्राव सुरू झाला, की वेदना सुरू होतात.
  • वेदना साधारण 12 ते 24 तास किंवा काही स्त्रियांना 2 ते 3 दिवस होतात.
  • प्रत्येक पाळीच्या स्वरूपात फरक असू शकतो. पण काही काही वेळा खूप त्रास व वेदना होतात.
  • बाळंतपणानंतर, तसेच वाढत्या वयानुसार वेदना कमी होत जातात.
  • तुम्हाला नेहमी ज्या प्रकारे वेदना होतात, त्याच्या स्वरूपातही बदल आढळतो. उदा.- मासिक पाळीच्या वेळी नेहमीपेक्षा खूप वेदना होणे वा नेहमीपेक्षा जास्त काळ दुखणे. काही महिला ज्यांना दुय्यम स्वरूपाच्या डिसमेनहोरियाचा त्रास असतो, त्यांना पाळी सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधीच वेदना सुरू होतात व पाळी संपेपर्यंत सुरूच राहतात.

तुम्हाला यापेक्षा काही वेगळी लक्षणे दिसत असतील.
उदा.-
  • अनियमित रक्तस्राव.
  • दोन पाळींच्या मधल्या काळात रक्तस्राव होणे.
  • दोन पाळींच्या मधल्या काळात वेदना होणे.
  • आधीच्या पाळीपेक्षा पुढच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे.
  • अंगावरून पांढरा स्राव जाणे.
  • शरीरसंबंधाच्या वेळी दुखणे.

    अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

तुम्हाला पाळीच्या वेळी वेदना होत असेल तर काही उपचार :
उष्णता : गरम पाण्याने अंघोळ करणे वा गरम पाण्याच्या बाटलीने ओटीपोटाकडे शेकणे. यामुळे वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते.

रसायनविरहित वेदनाशामक औषधे : रसायनविरहित वेदनाशामक औषधांमुळे वेदना कमी होण्यास मदत होते. ही औषधे डॉक्‍टरांच्या लेखी स्वरूपातील सूचनेशिवाय  (prescription) मिळत नाहीत. वेदना निर्माण करणाऱ्या प्रोस्टॅग्लॅंडीन रसायनांना रोखण्याचे काम ही औषधे करतात. यामुळे रक्तस्राव कमी होण्यासही मदत होते.

पोषक आहार : पोषक आहारामुळे वेदनामुक्त पाळीचा त्रास कमी होऊ शकतो. दुग्धयुक्त पदार्थ, लाल मांस, व्हेजिटेबल ऑइल्स यांचे सेवन करावे. चरबीयुक्त पदार्थ खाऊ नयेत. खाताना अन्न व्यवस्थित चावून खावे, त्यामुळे गॅसेसचा त्रास होत नाही. फायबर्सयुक्त फळे, भाज्या, ओटमिल, राई, होल ग्रेन्स, लेंटिल्स, चिकपीज यांचे सेवन करावे.

योग : योग पद्धतीतील अर्ध शलभासन, पूर्ण शलभासन, वज्रासन, पश्‍चिमोत्तानासन, अर्धमत्स्येंद्रासन आणि त्रिलोकासन, या आसनांमुळे पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनांपासून होणारा त्रास कमी होऊ शकतो. याबरोबर श्‍वासाचे व्यायाम, प्राणायाम यामुळेही वेदनांपासून आराम मिळू शकतो. नियमितपणे वा पाळी येण्यापूर्वी एक आठवडा ही आसने करण्याची सवय स्वत:ला लावून घ्या.

सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वांनी युक्त औषधे : चांगल्या प्रकारची सर्व जीवनसत्त्वांनी युक्त औषधे व खनिज द्रव्ये घेतल्याने तुम्ही वेदनांचा त्रास कमी करू शकता. बी 6 हे जीवनसत्त्व चांगल्या प्रोस्टॅग्लॅंडिन्स तयार करते. त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होण्यास व आराम मिळण्यास मदत होते. बी 1 व बी 6 ही जीवनसत्त्वे पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी उपयुक्त आहेत. पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना संपविण्यासाठी खनिज द्रव्ये उपयुक्त ठरतात. कारण ती आवश्‍यक अशा फॅटी ऍसिड्‌सचे योग्य रूपांतर करण्यासाठी आवश्‍यक असतात.

लक्षात ठेवा, मासिक पाळी हा शाप नाही. निरोगी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी रोजचा व्यायाम, व्यवस्थित झोप, आराम व उत्तम, सकस आहार यांचा समतोल असणे आवश्‍यक आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive