Thursday, May 31, 2012

Kadalimatti Kashibai

रेल चक्र - अगं अगं म्हशी...
मी नॅरोगेजवर म्हणजे कुर्डुवाडी , मिरज , लातूर सेक्शनमध्ये काम करत होतो. कुर्डुवाडी पंढरपूर व कुर्डुवाडी बाशीर्पर्यंत चार येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या असायच्या व कधीकधी एखादी मालगाडीही धावायची. परंतु बाशीर् ते लातूर व पंढरपूर ते मिरज यात मात्र प्रत्येक स्टेशनमास्तरच्या ड्युटीत दोनच गाड्या धावायच्या. त्यामुळे आमची ड्युटी बारा तासाची होती. वाफेच्या इंजिनावर गाडी चालायची. सांगली स्टेशनवर मी काम करत असताना एका निवृत्त व वयस्कर कर्मचाऱ्यानं नॅरोगेजवर गाडी सोडली. तेव्हाच्या गाडीच्या वेगाचा एक किस्सा सांगितला.

या छोट्या लाइनच्या रेल्वेला तेव्हा ' बाशीर् लाइट ' रेल्वे म्हणत. या रेल्वेची पाहणी करण्यासाठी एक गोऱ्या साहेबाचं पथक लंडनमधून आलं. गाडी कुर्डुवाडीहून निघाली आणि थोडं अंतर पार केल्यावर थांबली. पुन्हा थोड्या वेळात निघाली. पुन्हा थोडं अंतर कापल्यानंतर थांबली व थोड्या वेळानं निघाली. असं दोन-चारदा झालं. मुख्य गोरासाहेब चिडला व म्हणाला ,

' काय भानगड आहे ? गाडी चालते थांबते. चालते थांबते. असं का होतंय ? काय कारण आहे ? चौकशी करा. '

इन्स्पेक्टर गाडी का रेंगाळत चालली आहे , याची चौकशी करून आला व साहेबाला म्हणाला , ' साहेब , म्हैस गाडीच्या समोरून रस्त्यातून पळतेय. ती गाडीच्या पुढे जाऊन रुळांवर आडवी उभी राहतेय. मग ड्रायव्हर खाली उतरतो. म्हशीला हाकलतो व गाडी सुरू करतो. '

यावर साहेब चित्कारला , ' असं आश्चर्य आहे का ? परंतु अशा किती म्हशी गाडीपुढे धावत आहेत ? गाडी चार वेळा थांबली व सुरू झाली. '

' एकच म्हैस आहे , साहेब. ती गाडीपुढे थांबते व रुळात आडवी उभी राहते. '

' वंडर फुल! ' म्हणून साहेबाने कपाळाला हात लावला.

' म्हणजे म्हशीचा पळण्याचा वेग गाडीच्या वेगापेक्षा जास्त आहे तर. ' यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी गाडीचा वेग कमी होता. हे सत्य नाकारता येत नाही. सुरुवातीला कमी वेगानं धावणाऱ्या रेल्वेने 150 वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. आज भोपाळ ते दिल्ली ही शताब्दी एक्सप्रेस ताशी 140 किलोमीटर वेगाने धावत आहे आणि आता कोकण रेल्वेवर जपानमध्ये धावणारी बुलेट ट्रेन सुरू करण्याविषयी प्रयत्न चालू आहेत. भारतीय रेल्वेची आधुनिकतेकडे होणारी ही वाटचाल खरोखरच स्तुत्य म्हणावी लागेल.


' कडलीमट्टी काशीबाई '

दक्षिण रेल्वेवरील ' कडलीमट्टी ' स्टेशनवर घडलेली एक सत्य घटना फार गाजली होती. त्यावर कन्नड भाषेत ' कडलीमट्टी काशीबाई ' नावाचं नाटक लिहिलं गेलं व सिनेमाही काढला गेला. या घटनेचा तपशील असा...

कडलीमट्टी या छोट्या स्टेशनवर एक सुरेख बाई आपल्या तान्ह्या मुलासह गावी जाण्यासाठी आली. गाडी यायला बराच अवकाश होता. स्टेशन मास्तरची नजर तिच्याकडे गेली. तिच्या रूपावर तो मोहित झाला. बाहेर थंडी होती म्हणून तो तिला स्टेशनावर बोलवू लागला. तिच्याशी गोडगोड बोलून तिचा विश्वास संपादन करण्याचा उद्योग त्यानं आरंभला. त्याची कामुक नजर तिच्यावर पडली. स्त्रियांना पुरुषांची कामुक नजर पटकन जाणवते. ती मुलाला घेऊन ऑफिसच्या बाहेर जायला निघाली. त्याक्षणी त्यानं दार बंद करून घेतलं आणि मुलाला तिच्या हातातून हिसकावून घेतलं. बाजूच्या खोलीत कोंडून ठेवून तिला तो म्हणाला ,' तू जर माझं समाधान केलं नाहीस , मी सांगेन तसं ऐकलं नाहीस , तर मी तुझ्या मुलाचा गळा दाबेन. '

' तू मुलाचा गळा दाब किंवा काहीही कर ,' तिनं ठणकावून सांगितलं ,' परंतु मी तुझं समाधान करणार नाही आणि ऐकणारही नाही. '

' अस्सं ' म्हणून मास्तर बाजूच्या खोलीतून मुलाला आणण्यासाठी गेला. ती स्त्री ऑफिसचं दार उघडून सरळ बाहेर निघून आली. ती बाहेर गेलेली पाहून मास्तर ओरडला , ' हे बघ मुकाट्यानं आत ये. मी तुझ्या मुलाचा गळा दाबेन. ' परंतु तिनं ऐकलं नाही. मुलाचा गळा दाबायला लागल्यावर ती आपलं म्हणणं झक्कत ऐकेल व आत येईल असं मास्तरला वाटलं. त्यानं त्या पोराचा गळा आवळला. ते पाहूनही ती आत आली नाहीच , उलट ऑफिसचं दार बंद करून तिनं बाहेरून कडी घालते. यात ते मूल दगावलं. एवढं होऊन तिनं काही त्याच्या म्हणण्याला होकार दिला नाही कारण स्त्रीला स्वत:चं शील अत्यंत प्रिय असतं. ' कडलीमट्टी काशीबाई ' या नावानंच ही घटना त्या भागात प्रसिद्ध आहे.

- व्यंकटेश बोर्गीकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive