वाघाचं काळीज
उत्तरा मोने ,
पशुप्राण्यांची काळजी घेणं, त्यांच्यावर उपचार करणं, त्यांची बाळंतपणं काढणं इथपासून वस्तीत घुसलेले बिथरलेले बिबटे, हत्ती जेरबंद करून आणणं, प्रसंगी त्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमीही होणं, असं समाधान देणारं पण जोखमीचं करिअर करणाऱ्या, त्यासाठी वाघासारखं काळीज बाळगणाऱ्या डॉ. विनया जंगले यांच्या थरारक करिअरविषयी.. ११ जानेवारी २००९. सावंतवाडीच्या हत्ती मोहिमेतला तिसराच दिवस. हत्तींच्या कळपातली प्रमुख हत्तीण पकडली गेली. ती शुध्दीवर आल्यावर सोंड गरगर फिरवून समोरच्या माणसांना मारायचा प्रयत्न करू लागली. जोरजोरात ओरडून बांधलेल्या दोर तोडायचा प्रयत्न करू लागली. या सगळया प्रयत्नात ती इतकी थकली की तिच्यावर मानसिक ताण आला.. तिला जुलाब सुरू झाले आणि त्याचं प्रमाण वाढतच गेलं. ती सलाईनही लावू देत नव्हती. आणि अखेर त्यातच तिचा अंत झाला. एवढा मोठा प्राणी मृत झालेला बघून मी बधिर झाले. पशुवैद्यकीच्या व्यवसायात भरपूर प्राण्यांचे मृत्यू बघितले होते पण मृत्यूचं हे अक्राळ विक्राळ दर्शन प्रथमच घडत होतं. आता पुढचं काम अधिक जिकिरीचं होतं.. पोस्टमार्टेम करणं. त्यासाठी मोठे सुरे व हाडे तोडण्यासाठी मोठी हत्यारं मागवली होती. आणखी चार पशुवैद्यांसोबत मी पोस्टमार्टेम चालू केलं. त्या हत्तिणीला एका कुशीवर झोपवलं. तिच्या कुशीतून खाली पोटाच्या दिशेने धारधार ब्लेडने चिर पाडली. खालचे लालभडक स्नायू बाजूला केले आणि पोट उघडलं. जठर, यकृत, किडनी, आतडे या अवयवांची तपासणी केली परंतु हृदयापर्यंत पोहोचता येत नव्हते. मग त्यासाठी छेद मोठा केला आणि हत्तिणीच्या पोटात चक्क उतरून तिथून वाकून हृदयापर्यंत हात घातला. स्कालपेलने छेद घेऊन हृदय बाहेर काढले. या पूर्ण पोस्टमार्टेमला आम्हा पाच डॉक्टर्सना सहा तास लागले. एव्हाना सगळीकडे अंधार पसरला होता. त्यावेळी ते जंगल जास्तच भीतीदायक वाटत होतं. अंधारात गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्या हत्तिणीचे अवयव सीलबंद केलेल्या बरण्यांवर त्यांची नावं लिहितानाही मनात घालमेल होत होती.’’ हे सांगणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैदयकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांचा हा थरारक अनुभव. त्यांना नेहमीच येणारा..
रोजच हरणं, वाघ, बिबटे, हत्ती, माकडं अशा प्राण्यांशी त्यांचा संबंध येतो आणि या प्राण्यांशी संबंधित असे थरारक प्रसंगही त्यांच्या वाटय़ाला येत असतात. वस्तीत बिबटय़ा शिरला की सामान्य माणूस घाबरून जातो, पण त्या बिबटय़ाला जेरबंद करून पुन्हा नॅशनल पार्कमधे घेऊन जाण्याचं अवघड काम विनयाताई आणि त्यांच्या टिमला करावं लागतं. नुकताच मुलुंडमध्ये बिबटय़ा शिरला होता तेव्हा दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं किंवा मागे एकदा मालाडमध्ये भर वस्तीत बिबटय़ा शिरला होता. पहाटे साडेपाच वाजता फोन आला. त्या दिवशी विनयाताईंच्या टीममधली काही मंडळी नसल्यामुळे बिबटय़ाला बेशुद्ध करण्याचे काम त्यांना एकटीलाच करायचं होतं. त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती. रस्त्यावर एका बाजूला पत्रे लावलेले होते आणि त्यापुढे रांगेत रिक्षा उभ्या होत्या, त्यातल्याच एका रिक्षामागे अंग चोरून बिबटय़ा बसलेला होता. अशा परिस्थितीत त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारताना काही गडबड झाली असती तर त्याने विनयाताईंवर उडीच मारली असती. बेसावध क्षणी हे प्राणी हल्ला करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण अत्यंत शांतपणे अशा प्रसंगातून बाहेर पडून मोहीम फत्ते केली. अशा मोहिमा यशस्वी करणे आणि प्राण्यांनाही वाचवणं ही त्यांची खासियतच आहे.
चार वर्षांपूर्वी जेव्हा नॅशनल पार्कच्या पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली तेव्हापासून अशा अनेक थरारक प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यापूर्वी या पदावर कधीच स्त्री नव्हती. त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांनाही विनयाताईंच्या कामाविषयी साशंकताच होती. ‘एक बाई वाघ-सिंहांना बेशुद्ध करण्याचं, त्यांच्यावर उपचार करण्याचं काम कसं करणार? त्याला एक वेगळंच धाडस लागतं. आता आपल्या विभागाचं काही खरं नाही’, असं अनेकांना वाटलं, पण जेव्हा बिबटय़ाला पकडण्याच्या पहिल्याच मोहिमेत विनयाताई स्वत: डार्टिगला उभ्या राहिल्या (डार्ट म्हणजे वन्य प्राण्यांसाठी असलेली सिरिंज. ज्याद्वारे प्राण्यांना बेशुद्ध केलं जातं. दहा मिनिटांनी प्राणी बेशुद्ध होतो. त्यानंतर रिकाम्या ब्लोपाइपने प्राण्याच्या कानात फुंकर मारून बेशुद्ध झाल्याची खात्री केली जाते) किंवा सावंतवाडीला जाऊन हत्तींच्या स्थलांतरणाची अवघड कामगिरी त्यांनी पार पाडली किंवा डहाणूला एक बिबटय़ा खड्डय़ात पडला तेव्हा डार्टिग झाल्यावर तो बिबटय़ा बेशुद्ध झालाय की नाही हे पाहण्यासाठी स्वत: पुढे होऊन खात्री केली, हे पाहून सगळ्या सहकाऱ्यांचा त्यांच्यावर खूपच विश्वास बसला. आता तर कोकण, कोल्हापूर, सांगली अशा भागांत प्राण्यांशी संबंधित कोणतीही मोहीम असली की विनयाताई आणि त्यांची टीम मोरे, झिरवे, भोईर, पगारे अशी मंडळी पुढे सरसावतात आणि कामगिरी फत्ते करून येतात.
लहानपणापासून पशुवैद्यकाच्या क्षेत्राचं आकर्षण असणाऱ्या विनयाताईंनी अत्यंत जिद्दीने, मेहनतीने आणि अभ्यास करून हे क्षेत्र स्वीकारलंय. कोकणातल्या खेडसारख्या छोटय़ा गावातून येऊन या क्षेत्रात यश संपादन केलंय. अर्थात, सहकाऱ्यांप्रमाणेच त्यांच्या घरातून असलेलं सहकार्य तर त्यांना खूपच मोलाचं वाटतं. त्यांचे पती ऋधील व्यवसायाने इंजिनीअर आहेत. स्वत:च्या शिफ्ट डय़ुटीज सांभाळून घरच्याही बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांनी आनंदाने उचलल्यात, कारण विनयाताईंच्या कामांच्या वेळा कधीच ठरलेल्या नसतात. कधीही फोन आला की रात्री अपरात्री त्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं. अशा वेळी अर्थातच त्यांचा आणखी एक मोठा आधार आहे त्यांची नणंद पुष्पा यांचा. अनेकदा विनयाताईंचा मुलगा नील याला सांभाळण्याचं काम त्या करतात, त्यामुळे एखाद्या प्राण्याच्या सुटकेसाठी गेलेल्या विनयाताई निश्चिंत मनाने आपल्या कामात लक्ष देऊ शकतात.
सुरुवातीला जेव्हा त्या इथे रुजू झाल्या तेव्हा १०/१५ दिवसांच्या अनेक ट्रेनिंग कॅम्पला त्यांना जावं लागे. अशा वेळी कोकणातून त्यांची आई येत असे. त्यांचे सासू-सासरेही जुहूलाच राहतात. आपल्या सुनेच्या कामाबद्दल त्यांनाही अभिमानच आहे. सासूबाईंचा पण प्रसंगी मदतीचा हात असतोच. नीलला वाढवताना या सपोर्ट सिस्टीमचा त्यांना नक्कीच उपयोग झाला. लग्नानंतर चार वर्षे त्यांनी गोरेगावला क्वालिटी कंट्रोलला काम केलं. त्यामुळे त्या दिवसांत कामाच्या ठरावीक वेळा असल्यामुळे संसाराची घडी बसेपर्यंत त्यांना वेळ मिळाला. नील चार वर्षांचा झाल्यावर मात्र आता काही वेगळं करावं या विचाराने पुन्हा उचल खाल्ली. तसंही वन्य प्राण्यांच्या उपचाराचं नवं आव्हानात्मक क्षेत्र त्यांना खुणावत होतंच. त्या म्हणाल्या, ‘‘या क्षेत्रात तुला जर तुझी प्रगती दिसत असेल तर तू अवश्य जा, असा ऋधीलकडूनही ग्रीन सिग्नल मिळाल्यावर मी २००८ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रुजू झाले. आपल्या या वेगळ्या क्षेत्रातल्या जबाबदाऱ्यांची जाणीव मला झाली. वन्य प्राण्यांची शरीररचना, त्यांचं मानसशास्त्र या सगळ्याचा पुन्हा अभ्यास सुरू केला आणि एका वेगळ्या विश्वात जाण्यासाठी मी तयार झाले.’’
माणूस बोलून व्यक्त होतो तरी अनेकदा अनाकलनीय असतो. इथे तर मुक्या प्राण्यांशी विनयाताईंनी सोयरिक जमवली होती. त्यामुळे प्रत्येक प्राण्याचा जीव वाचवताना त्यांच्यावर उपचार करताना एक नवं आव्हान त्यांच्यापुढं असतं. साधारणपणे २०/२२ वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश केला तेव्हा ७० विद्यार्थ्यांच्या वर्गात चारच मुली होत्या. विनयाताई म्हणतात, ‘‘खरं तर स्त्रियांची या क्षेत्रात गरज आहे आणि त्यांनी यायलाही हवं. फक्त या क्षेत्रात यायचं तर शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असायला हवं. म्हटलं तर २४ तास डय़ुटी असते. त्यामुळे न थकता तासन्तास काम करायची क्षमता हवी. अनेकदा या मोहिमांवर जाताना किती दिवस, किती वेळ जाईल सांगता येत नाही. शिवाय शांत मनाने अनेक आव्हानांना तोंड देत हे काम करावं लागतं.’’
विनयाताईंच्या या कामाची सुरुवात झाली अलिबागमधून. तिथे असताना प्राण्यांना तपासण्यासाठी ग्रामीण भागात सर्वदूर जावं लागायचं. त्यासाठी त्यांनी स्कूटर शिकून घेतली. एका दिवसात प्रसंगी ५०-६० किलोमीटर फिरावं लागे. डोंगर चढावे लागत, गुडघाभर पाण्यातून जावं लागे. खेडेगावात हे काम करणं अधिकच कठीण. पण विनयाताईंनी ते उत्तम रीतीने केलं आणि गरीब शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळवले. पुढे नॅशनल पार्कला आल्यावर कर्नाटकातून सावंतवाडीत आलेल्या हत्तींना स्थलांतरित करण्याचं मोठं जोखमीचं काम करण्यासाठी त्यांची टीम सावंतवाडीला गेली. या बाहेरून आलेल्या हत्तींनी केळीच्या बागा, भाताची शेतं, नारळाची झाडं यांचा नाश करायचा सपाटा लावला. एवढंच नाही तर त्यांच्यामुळे प्राणहानीही झाली. मुळात हत्तीसारख्या अजस्र प्राण्याला स्थलांतरित करायचं तर मोठं आव्हानच. त्यातून त्या म्हणाल्या, ‘‘हत्तीला बेशुद्ध करणं हे अगदी कौशल्याचं काम. कारण ते करताना त्याला खाली पडू द्यायचं नसतं. तो जर आडवा पडला तर त्याच्या शरीराचा भार हृदयावर पडतो आणि तात्काळ हृदय बंद पडून त्याचा मृत्यू होऊ शकतो. तो खूप वेगाने पुढे जात असल्याने त्याचा माग काढणंही कठीण असतं.’’ अनेक अडचणीतून मार्ग काढत केलेली महाराष्ट्रातली ही पहिली हत्ती मोहीम इतिहासात नमूद झाली.
अशाच प्रकारे हरणांच्या स्थलांतरणाची मोहीम किंवा तांब्यात डोकं अडकलेल्या माकडावर केलेले उपचार किंवा अगदी जखमी गिधाडाला वाचवण्याचा केलेला प्रयत्न. विनयाताईंचा हा प्रत्येक अनुभव मुळातून ऐकण्यासारखा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक प्रसंगात प्राण्यांचे स्वभाव, त्यांच्या सवयीनुसार आणि त्यांची शरीररचना यानुसार त्यांना उपचार करावे लागतात. भीती हा शब्दच त्यांच्या शब्दकोशातून त्यांनी काढून टाकल्याने या प्रत्येक प्रसंगातलं त्यांचं धारिष्टय़ खरंच कौतुकास्पद वाटतं. विशेषत: त्यांचा वाघ, सिंहांशी जेव्हा सामना होतो, तेव्हाचं त्यांचं कौशल्य अचंबित करून जातं. एकदा तिथली शोभा सिंहीण पिंजऱ्याबाहेर पडली आणि तिचा जोडीदार सिंह रवींद्र याने तर पहारेकऱ्याचं लक्ष नसताना त्याच्यावर हल्ला केला. पहारेकऱ्याला त्याचा जीव गमवावा लागला. त्या वेळी त्यांना दोघांना शोधून त्यांना बेशुद्ध करून परत पिंजऱ्यात आणणं मोठं कौशल्याचं काम होतं. कधीतरी हे हल्ले होतात, पण त्याला कारणंही तशीच असतात. त्या म्हणाल्या, ‘‘गेल्याच वर्षी उरणच्या करंजा गावात बिबटय़ा शिरला होता. आजपर्यंत अनेक बिबटे पकडले पण आमच्या पथकावर बिबटय़ाने कधीच हल्ला केला नव्हता. त्या दिवशी बिबटय़ाला बघायला अफाट गर्दी जमली होती. त्यामुळे तोही आक्रमक झाला होता. एका पडक्या घरात तो लपला होता. वरच्या मजल्यावर आम्ही तिघं शिरलो. तिथे एक मोठं भगदाड पडलं होतं. ते बंद केलं असतं तर तो खालच्या मजल्यावर अडकला असता, म्हणून आम्ही तिथूनच प्रयत्नशील होतो. पण तेवढय़ात खाली कुणीतरी कुलूप तोडायचा प्रयत्न केला आणि तो सावध झाला. लोकांना सांगूनही त्यांनी ऐकलं नाही, खाली कुलूप तुटलं आणि त्या क्षणी बिबटय़ाने खालून पंधरा फुटांवरून त्या भगदाडातून आमच्या अंगावर उडी मारली. आम्ही तिघंही दहा फुटांवर फेकले गेलो. माझ्या पाठीवर बिबटय़ाचे दात लागले. एक जखम खूपच खोल होती. पुढे महिनाभर मला ती जखम चांगलीच भोवली. म्हणूनच आमचं लोकांना हेच सांगणं असतं की, आमच्या सूचना पाळा. उत्साहाच्या भरात येऊन काही करू नका.’’
या अनुभवानंतर घरच्यांची काळजी साहजिकच वाढली. ऋधीलच्या मनातही चिंता होतीच, पण आपल्या बायकोच्या कामाचं वेगळेपण लक्षात घेऊन ते म्हणाले की, ‘‘असं तर आपण रस्त्यावरून चालतानाही अपघात होतात म्हणून आपण रस्त्यावरून चालणं सोडतो का? हा, यापुढे तिने अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.’’ सहजीवनातली अशी पक्की साथच कदाचित विनयाताईंना त्यांच्या क्षेत्रातल्या नवनवीन आव्हानांना तोंड देण्याचं बळ देत असेल.
मुळात या प्राण्यांवर त्यांचा इतका जीव जडतो की, एखाद्या माणसासारखी काळजी करणं हे त्यांच्या सवयीचं होऊन जातं. विनयाताई म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे कधी कधी बिबटय़ांची आईवेगळी पिल्लं सापडतात. एकदा दोन महिन्यांच्या बसप्पाला आम्ही लहान बाळासारखं सांभाळलं. माझ्या केबिनमध्ये खुर्चीखाली बसलेला असायचा. माझ्याकडे मीटिंगला येणारी माणसं त्याला बघून घाबरत आणि आमच्या मीटिंग केबिनबाहेरच होत असत. थोडा मोठा झाल्यावर मात्र बसप्पाला इतरांबरोबर जेव्हा पिंजऱ्यात ठेवावं लागलं तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटलं. त्यानेही त्या वेळी पिंजऱ्याच्या जाळीवर पाय ठेवले आणि घशातून एक वेगळीच गुरगुर काढली. अशा वेळी मला वाटतं, मला त्यांच्या भाषेत बोलता आलं असतं तर.. माझ्या नीलला जसं मी काही गोष्टी समजावून सांगते तसं त्यालाही समजावता आलं असतं.’’
या सगळ्यात नीललाही विनयाताईंनी स्वतंत्रपणे वागायचं शिकवलंय. आज तो फक्त सहा वर्षांचा आहे, पण तो अजिबात भित्रा नाही. त्याने आपली मित्रमंडळी जमवलेली आहेत. अर्थात, भरपूर मस्ती असल्याने अनेक उपद्व्यापही त्याने केले आहेतच. एकदा तर घरी कुणी नसताना गॅलरीत अडकला होता, पण तेव्हाही तो घाबरला नाही. त्याने शेजाऱ्यांना हाका मारल्या. मग शेजाऱ्यांनी विनयाताईंना फोन करून बोलावून घेतलं. कामाच्या वेळा आणि घर ही मोठी तारेवरची कसरत विनयाताईंना करावी लागते, पण त्या म्हणतात, ‘‘मला माणसंही चांगली भेटली. एकदा शहापूरला एक गवा आजारी होता म्हणून मी तिकडे गेले होते. मी पाच वाजेपर्यंत परत येणार म्हणून ऋधील साडेचारला ऑफिसला जायला निघाले. नील तेव्हा पाच वर्षांचा होता. मला यायला थोडा उशीर झाला. त्या मधल्या वेळात नील पडला, खूप लागलं, टाकेही पडले. आमचा दोघांचाही फोन लागत नव्हता, पण आमच्या शेजाऱ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं, उपचार सुरू केले. सगळं झाल्यावर मला फोन लागला. मी मुंबईजवळ पोहोचले होते. हे कळल्यावर त्याला बघेपर्यंत माझ्या अगदी जिवात जीव नव्हता, पण अशी चांगली माणसं मला नेहमीच भेटली.’’
स्त्री कोणत्याही क्षेत्रात काम करत असली तरी ‘तिचे लक्ष पिलापाशी’ असतंच. विनयाताईंना तर ते प्राण्यांमध्येही अनुभवता आलं. म्हणूनच संजय गांधी उद्यानाची शान असलेली बसंती वाघिणीचं बाळंतपण एखादी माहेरवाशीण घरी यावी अशा पद्धतीने त्यांनी केलं. मग अगदी पलाश या वाघाबरोबर त्यांनी तिची जमवलेली जोडी, त्यांचं ब्रिडिंग, नंतर तिच्या बाळंतपणाच्या काळातचा तिचा खुराक, वाघांची ‘डेन’ म्हणजे बाळंतिणीची खोली. अशा सगळ्या तयारीतून तिने दोन पिल्लांना दिलेला जन्म हे सगळं विनयाताईंकडून ऐकताना मोठं विलक्षण वाटतं. आपल्यासारखंच त्यांचं आरोग्य, त्यांचे आजार आणि त्यांची काळजीही घेतली जाते. म्हणूनच त्यांच्या १२ वर्षांच्या रेणुका वाघीण कॅन्सरने मरते तेव्हा विनयाताईंचं काळीज हेलावतं. वेदनेने अश्रू ढाळणारे तिचे डोळे त्यांना आजही अस्वस्थ करतात.
हे सगळेच अनुभव घेण्यासाठी वाघासारखं काळीज लागतं जे विनयाताईंकडे आहे. प्राण्यांची काळजी घेणं हे त्यांचं व्रतच आहे. पण एक मात्र खरं आता कोणत्याही नॅशनल पार्कमध्ये जाताना आपलाही दृष्टिकोन वेगळा असेल, एवढं निश्चित!

No comments:
Post a Comment