Monday, May 21, 2012

History writer Sanjay kshirsagar - Panipat ase ghadale.

History writer Sanjay kshirsagar - Panipat ase ghadale. 


इतिहास संशोधकांच्या आजवरच्या प्रस्थापित मतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नवे अन्वयार्थ मांडणा-या 'पनिपत असे घडले' या पुस्तकाचा संजय क्षीरसागर हा लेखक. वय २९ वर्षे. एट्रोपी या दुर्धर आजाराने दोन्ही पाय निकामी केलेले. पण प्रतिकुलतेने खचून न जाता संजयने आपली संशोधकीवृत्ती जोपासली, वाढवली. त्याच्याशी बोलताना त्याची वेगळी 'नजर' जाणवते...

इतिहासकाराने भावनेत न गुरफटता निरपेक्षपणे आपले कार्य सिद्धीस न्यायला हवे. कुणाच्या टिकेची वा प्रशंसेची पर्वा करू नये. सखोल अभ्यासाअंती ज्याचे माप त्याच्या पदरात टाकणे हे इतिहासकाराचे कर्तव्य. मात्र, पानिपत किंवा एकूणच इतिहासाचा अभ्यास केला तर इतिहासकारांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले आहे का, अशी शंका मनात निर्माण होते. आपण इतिहासाला अक्षरश: कवटाळून+ बसलोय. त्यामुळे दुसरी बाजू समजून घेण्याचा कधी प्रयत्नच होत नाही. तसा प्रयत्न कुणी केला तर तो खपवूनही घेतला जात नाही.

काही वर्षांपूवीर् छत्रपती शिवरायांच्या कालखंडातील काही ऐतिहासिक संदर्भ आणि त्यावरचे वेगळ्या वाटेने जाणारे निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न संजय क्षीरसागर या २९ वर्षांच्या तरुणाने आपल्या ब्लॉगवरून केला होता. मात्र, खवळलेल्या इतिहासप्रेमींनी ब्लॉगवर शिवीगाळ करण्यापासून ते ब्लॉग हॅक करण्यापर्यंत अनेक प्रकार केले. त्यामुळे त्या इतिहासाच्या वाट्याला न जाता संजयने आपला मोर्चा पेशवेकालीन इतिहासावर विशेषत: पानिपत लढाईकडे वळवला.

मराठी साम्राज्याचा कणा मोडणारी लढाई असा पानिपत युद्धाचा उल्लेख होतो. मात्र, या महासंग्रामाविषयी मराठीत फारसे लेखन झाले नाही. पानिपतच्या रणसंग्रामाला १९६१ साली २०० वषेर् पूर्ण झाली. त्यावेळी त्र्यं. शं. शेजवलकर यांनी लिहिलेला 'पानिपत : १७६१' हा ऐतिहासिक संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाला होता. तेव्हापासून पानिपतच्या लढाईबाबत शेजवलकरांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यापूवीर् आणि नंतर ना. वि. बापटांचे 'पानिपतची मोहीम', भारताचार्य चिं. वि. वैद्य यांचे 'दुदैर्वी रंगू' आणि रियासतकार गो. स. सरदेसाई, वि. गो. दिघे, रा. वा नाडकणीर् या लेखकांचे मोजके लेख वगळता या संग्रामाचे विवेचन कुणीही केलेले नाही. विश्वास पाटलांची 'पानिपत' ही कादंबरी तुफान लोकप्रिय ठरली. मात्र, ती शेजवलकरांच्याच मांडणीचा कादंबरीमय विस्तार होती.

त्यामुळे हे युद्ध, त्यावेळचे ऐतिहासिक संदर्भ, त्यांची कारणमीमांसा करण्यासाठी संजय गेल्या दहा वर्षांपासून संशोधन करतोय. तत्कालीन सर्व पत्रे, बखरी, मराठी ते फारसी साधनांचा अभ्यास करून तर्कबुद्धीने निष्कर्ष काढण्यास त्याने सुरुवात केली. मात्र, आपले निष्कर्ष आणि आजवर नोंदविलेल्या मतांमध्ये तफावत असल्याचे लक्षात आल्यानंतर संजय अधिकच अस्वस्थ झाला. युद्धाचे वास्तव शोधून काढण्यासाठी त्याने आपला अभ्यास अधिक टोकदार केला.

हा अभ्यास सुरू असतानाच अचानक संजयला एट्रोपी या दुर्धर आजाराने गाठले. जेनेटिक दोषांमुळे हा आजार बळावतो. शरीरातला एक एक अवयव निकामी करणाऱ्या या दुमिर्ळ आजारावरील रामबाण औषध जगात कुठेही नाही हे समजल्यानंतर संजय आणि त्याचे कुटुंब हादरले. संजयचे दोन्ही पाय निकामी झाल्यानंतर तो व्हिलचेअरला खिळला. ऐन तारुण्यात परावलंबी आयुष्य पदरात पडल्याचे बघून कुणीही कोलमडून पडेल. परंतु, संजय नशिबाला कोसत रडत बसला नाही. अफाट आत्मविश्वास, अभ्यासाची आवड आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द या बळावर त्याने आपली पानिपत मोहीम सुरूच ठेवली. शारीरिक मर्यादांमुळे घराबाहेर पडता येत नव्हते. मग, संदर्भसाधनं घरी मागवून त्यावरील संशोधन सुरू झाले. संजयच्या मोहिमेसाठी लागणारी सारी रसद मित्रमंडळी त्याच्यापर्यंत पोहोचवत होती.

पानिपतच्या बाबतीत शेजवलकरांचाच शब्द अंतिम मानला जात असला तरी त्यांच्या ग्रंथातले अनेक मुद्दे संजयने आपल्या ग्रंथात संदर्भासह खोडून काढले आहेत. तो म्हणतो, 'या युद्धाबाबत आजवर उपलब्ध असलेली बरीच माहिती एकांगी आणि अपुरी आहे. शेजवलकर कऱ्हाडे ब्राह्माण असल्यामुळे त्यांचा कोकणस्थ ब्राह्माणांवर रोष होता की काय अशी शंका निर्माण करणारे संदर्भ त्यांच्या लेखनात दिसतात. पानिपतच्या मोहिमेवर रघुनाथरावांची नेमणूक का झाली नाही, सदाशिवराव भाऊंचे नाव अचानक कसे पुढे आले, मोगल बादशहाने सदाशिवरावांना पत्र का लिहिले होते यांसारख्या अनेक विषयांवरील निष्कर्ष चुकीच्या पद्धतीने काढल्याचे जाणवते. जातीय आणि धामिर्क पगड्यामुळे सैन्यातील गारद्यांविषयी लेखकांच्या मनातली ईर्ष्याही स्पष्ट जाणवते. पानिपतच्या मोहिमेवर भाऊने बाजारबुणगे सोबत बाळगून मोठी चूक केली, असे अनेक विद्वानांचे मत आहे. परंतु, मला तसे वाटत नाही. मुळात बुणगे म्हणजे काय आणि त्यांचे सैन्यातील स्थान याचा कुठेही विचार झालेला दिसत नाही. आजच्या आधुनिक सैन्यातील इंजिनीअर्स, ट्रक ड्रायव्हर हेही एक प्रकारचे बुणगेच असून, त्यांच्याशिवाय सैन्य पूर्णच होऊ शकत नाही. अब्दालीचा तळ दक्षिणेला होता. त्यामुळे मराठा सैन्याचा रोख आग्नेयला होता, हा शेजवलकरांचा निष्कर्ष अगम्य असून मराठी सैन्याचा रोख पूवेर्लाच होता याचे स्पष्टीकरणही मी नकाशांसह देण्याचा प्रयत्न केलाय.'

विंचुरकरांनी गोल फोडल्याने मराठी सैन्याचा घात झाला हा निष्कर्षही चुकीचा वाटतो. गोल फोडून शत्रूवर हल्ला करणं आणि सैन्याने पुन्हा गोलात येणं हा युद्धनीतीचा एक भाग असल्याचे दाखले इतिहासात आहेत. तोच प्रयत्न पानिपत युद्धातही झाला असावा, असे संजयचे मत आहे. सदाशिवराव भाऊच्या मृत्यूबाबतच्या दोन्ही मतप्रवाहांवर त्याने चर्चा घडवून आणली आहे. त्याबाबतचा थेट निष्कर्ष त्याने काढला नसला तरी दोन्ही बाजू तितक्याच ताकदीने मांडण्याचा प्रयत्न संजयने केलेला दिसतो.

तो म्हणतो, 'माझे लेखन वास्तवतेकडे जाणारे असावे यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. कुणाला मोठं करायचं किंवा कुणाला लहान दाखवायचं या फंदात मी पडलो नाही. उपलब्ध संदर्भ साधनांचा अभ्यास करून तर्कबुद्धीने आपले निष्कर्ष वाचकांसमोर ठेवले आहेत. हे निष्कर्ष पटले नाहीत तर मूळ संदर्भ साधनांतील उद्धृतेच दिली असल्याने वाचक आपापले निष्कर्षही काढू शकतात. माझ्या मतांशी असहमत राहण्याचा वाचकांचा अधिकार मी अबाधित ठेवला आहे.'

अर्थात आपल्या पहिल्या ग्रंथाचे प्रकाशन झाले असले तरी तो परिपूर्ण झाला आहे, असे त्याला बिलकूल वाटत नाही. कदाचित अनेक पदर उलगडायचे राहिलेत असतील. त्यामुळे या विषयावर माझा अभ्यास पुढेही सुरूच राहणार आहे, असे तो म्हणतो. 'गनिमीकावा' या युद्धप्रकाराविषयी त्याला प्रचंड कुतूहल आहे. त्यावर त्याला सखोल संशोधन करायचे आहे. तो म्हणतो, 'झाडाझुडपांच्या आडून आणि डोंगरदऱ्यांमधून लपत छपत येत शत्रूवर छापे टाकणे म्हणजे गनिमीकावा, असे आपण समजतो. मात्र, शत्रूवर सुनियोजीत आणि चोहोबाजूंनी हल्ला चढवून कोणत्याही एका फळीवर त्याला समर्थ मुकाबल्याची संधी न देणे हे गनिमी काव्याचे तंत्र आहे. शिवाजी महाराज, त्यानंतर संताजी-धनाजी, थोरले बाजीराव इतकेच काय नेपोलियननेही या युद्धतंत्राचा प्रभावी वापर केला होता. पहिल्या महायुद्धातही ही रणनीती वापरली गेली होती.'

आज इतिहासाचे अनेक पैलू, नवे पुरावे पुढे येत आहेत. त्यांची कठोर छाननी करून योग्य ते निष्कर्ष मांडणाऱ्या तरुण संशोधकांची आज गरज आहे. संजय क्षीरसागरचे काम त्यादृष्टीने मोलाचे ठरण्याची शक्यता आहे.

संजय क्षीरसागर
==========================

"पानिपत असे घडले..." संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर या इतिहास संशोधकाचा "पानिपत असे घडले..." हा अत्यंत मौलिक असा ग्रंथ १७ मे २०१२ रोजी ठाणे येथे प्रसिद्ध होत आहे. या ग्रंथाला संजय सोनवणी लिहिलेली ही प्रस्तावना.
================================================================

पानिपत युद्धाला यंदा २५१ वर्ष पुर्ण झालीत. हे युद्ध व त्यातील मराठ्यांचा पराजय हा मराठी मनाला लागलेला जिव्हारी घाव मानला जातो. या युद्धात महाराष्ट्रातील घरटी बांगडी फुटली असेही मानले जाते. या युद्धातील पराजयामुळे मराठी साम्राज्याला उतरती अवकळा लागली असेही मानले जाते. असे समजा असले तरी सन १९६१ मद्धे पानपतच्या २०० व्या स्म्रुतीदिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या त्र्यं.श. शेजवलकर यांच्या ऐतिहासिक संशोधनात्मक ग्रंथांव्यतिरिक्त किती ग्रंथ मराठीत प्रकाशित झाले याचा आढावा घेतला तर निराशाच पदरी पडेल. शेजवलकरांच्या ग्रंथापुर्वी ना. वि. बापटांची "पानिपतची मोहीम", भारताचार्य चिं. वि. वैद्य यांची "दुर्दैवी रंगु" आणि रियासतकार गो. स. सरदेसाई, वि. गो. दिघे, रा. वा नाडकर्णी इ. लेखकांचे काही मोजके लेख वगळता मराठीत या संग्रामाबाबत कसलेही सर्वांगीण विवेचन आढळत नाही, ही एक आश्चर्यकारक घटना आहे. वैद्यांची "दुर्दैवी रंगु" ही एका इंग्रज लेखकाच्या कादंबरीची मराठी आव्रुत्ती आहे व ती पुरेपुर रोम्यंटिसिझमने भरलेली आहे एवढेच. खरे तर पाश्चात्य देशात अशा दुर्दैवी युद्धाचे विविधांगांनी विचार करणारे लेखन झाले असते. वाटर्लू युद्धाबाबत असे शेकडो ग्रंथ फ्रांसिसी इतिहासकारांनी लिहिलेले आहेत.

कै. त्र्यं. शं. शेजवलकरानंतर १९८८ साली विश्वास पाटील यांनी आपल्या "पानिपत" या कादंबरीच्या माध्यमातुन पानिपतचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. या कादंबरीला वाचकांनी डोक्यावर घेतले. आजमितीस या कादंबरीच्या किमान ३३ आव्रुत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि हे कादंबरीकाराचे नि:संशय यश आहे. मराठी बांधवांना पानिपतच्या शोकांतिकेचे अद्भुत आकर्षण आजही आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले. "पानिपत" कादंबरीच्या अखेरीस विश्वासरावांनी ६१ मराठी, दोन हिंदी, ४७ इंग्रजी संदर्भसाधनांची यादी दिलेली आहे. ही साधने प्रत्यक्ष तपासली असता माझे मत असे बनले आहे कि विश्वास पाटील यांनी शेजवलकरांच्याच ग्रंथाचा (पानिपत:१७६१) मुख्य आधार घेतला असुन बाकी दिलेली संदर्भसाधने वाचायचेही फारसे कष्ट घेतलेले दिसत नाहीत. घेतले असते तर त्यांचे प्रतिबिंब पडुन कादंबरी कदाचित वेगळी बनली असती. थोडक्यात विश्वास पाटील यांची कादंबरी म्हणजे बव्हंशी शेजवलकरांच्याच मांडणीचा कादंबरीमय विस्तार आहे.

खुद्द इतिहासकारांचा शेजवलकरांवर त्यांच्या "पानिपत: १७६१" वर आक्षेप असा आहे कि ते क-हाडे ब्राह्मण असल्याने त्यांचा कोकणस्थ...विशेषत: चित्पावनी ब्राह्मणांवर रोष होता व त्याचा अंश त्यांच्या याही ग्रंथात डोकावतो. हे खरेच आहे. शेजवलकरांचा ग्रंथ हा पक्षपाताने भरलेला आहे. त्यामुळे पानिपतचा इतिहास सांगतांना त्यांनी शाब्दिक कोलांट-उड्या मारलेल्या स्पष्ट दिसतात. उदा. सुरुवातीला भाऊसाहेब पेशव्यावर व त्याच्या योग्यतेवर टीका करणारे शेजवलकर आपल्याच ग्रंथाच्या उत्तरार्धात भाऊच्या प्रत्येक क्रुतीचे समर्थन करतांना दिसतात. हीच री विश्वास पाटील यांनीही ओढली आहे.

इतिहास हा भावनिक नसतो. तो प्रसंगी क्रुर, काटेरी आणि घटनांचे व त्यामागील कारणपरंपरेचे यथार्थ दर्शन घडवणारा असतो...असायलाच हवा. मग कोणाच्या रुष्टतेची वा खुशीची पर्वा नको. परंतु आपले इतिहासकार हे प्राय: भावनिक असल्याने व त्याला जातीय संदर्भ असल्याने पानिपत युद्धाची कारणमिमांसा तटस्थने कोणी केल्याचे उदाहरण नाही. अलीकडेच "पानिपतचा रणसंग्राम" हा सच्चिनानंद शेवडे यांचा ग्रंथही प्रसिद्ध झाला. पण तो अत्यंत जातीविशिष्ट द्रुष्टीकोनातुन लिहिला गेल्याचे अभिप्राय महाराष्ट्र टाईम्स सारख्या व्रुत्तपत्रात आल्याने, दखल घ्यावी असे नाविण्य त्यात काहीच नाही. उलट इतिहासाची मोडतोड आहे.

जर पानिपत युद्धातील पराजयामुळे एवढा हाहा:कार उडाला असा इतिहासकारांचाच अभिप्राय आहे तर त्या युद्धाची विविधांगी सखोल मीमांसा किमान माहाराष्ट्री इतिहासकार, विचारवंत वा कादंबरीकारांनी का केली नाही हा प्रश्न निर्माण होतो. इन मीन चार कादंब-या, एक-दोन नाटके...दोन इतिहास सांगणारे म्हणवणारे ग्रंथ आणि फुटकळ लेख सोडले तर पानिपतची सर्वांगिण चिकित्सा आजवर झालेली नव्हती. याला आपण आपल्याच इतिहासाबद्दलची अनास्था म्हणावे काय? असो.

खरे तर पानिपतचे सर्वांगिण आकलन करुन घेण्यात शेजवलकरांसहित सर्वच इतिहासकार आणि त्यानुकुल कादंब-या लिहिणारे रंजक लेखक कमी पडले एवढेच येथे नमुद करतो.

संजय क्षीरसागरांच्या या प्रस्तुत ग्रंथात असे वेगळे काय आहे कि मी शेजवलकरांसारख्या श्रेष्ठ इतिहासकारावरही टीका करत आहे? याचे उत्तर स्पष्ट आहे. शेजवलकरांना जो जातीय अभिमान होता ज्यापोटी ते भाऊंवर तुटुन पडले आणि नंतर सावरुन घेण्याचा प्रयत्न केला तसे काही या इतिहासकाराने केलेले दिसुन येत नाही. या ग्रंथात अत्यंत तारतम्याने, शेकडो संदर्भ देत, पानिपत युद्धापर्यंतचा आणि नंतरचा प्रवास अत्यंत तटस्थतेने नोंदवत ज्याचे माप त्याच्या पदरी घातले आहे. भाऊवरील जेही आक्षेप इतिहासकारांनी घेतले आहेत, वा कादंबरीकारांनी ज्या आक्षेपांना रोम्यंटिक बनवले आहे, त्यांचा मुळातुन वेध घेत खरे आक्षेप कोणते आणि खोटे आक्षेप कोणते हेसुद्धा पुराव्यांनिशी स्पष्ट केले आहे.

पानिपत युद्धाबाबत अनुत्तरीत प्रश्न अनेक आहेत. त्याहीपेक्षा पानिपतपुर्व...अगदी भाऊ उत्तरेला जायला निघाला तेंव्हा उत्तरेत शिंदे-होळकर काय करत होते...? त्यांनी अब्दालीला कसे सळो कि पळो करुन सोडत तह करायला भाग कसे पाडले? खुद्द भाऊसाहेब पेशव्याला नानासाहेबांनी नेमके काय अधिकार दिले होते? पानिपतच्या पराजयाची नेमकी कारणे काय? पानिपत युद्धातील पराजयामुळे मराठ्यांचा उत्तरेतील प्रभाव खरेच नष्ट झाला काय? या व अशा असंख्य प्रश्नांवर ऐतिहासिक उपलब्ध साधनांच्या आधारे, माझ्या मते, आजतागायत कोणत्याही पानिपतविषयीच्या इतिहासकारांनी मांडणी केल्याचे दिसुन येत नाही. परंतु हा सर्व इतिहास व साधार विवेचन या ग्रंथात आलेले आहे. पानिपत येथील मुक्काम काळात आणि खुद्द पानिपत युद्ध ज्या १४ जानेवारी १७६१ रोजी घडले त्या दिवशीचा साद्यंत व्रुत्तांत ज्या पद्धतीने या तरुण इतिहासकाराने दिला आहे तो अत्यंत प्रशंसनीय असाच आहे. असा प्रयत्न अगदी शेजवलकरांनी वा अन्य कोणत्याही पानिपत इतिहासकाराने केलेला नाही. याबाबत प्रत्यक्ष पुरावे जवळपास अत्यल्प असले तरी त्या धामधुमीचे कालनिहाय वर्णन करत अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. उदाहरणार्थ. शिंदे व होळकर यांची गोलाचा लढाईत गोलाच्या पश्विम बाजुला, हुजुरातीपासुन किमान ३ किलोमीटर दूर नियुक्ती केली होती तर मग जनकोजी शिंदे आणि होळकरांचा महत्वाचा सरदार संताजी वाघ हे हुजुरातीत, एवढ्या धुमश्चक्क्रीतही एवढे अंतर ओलांडुन का आणि कसे आले? भाऊ आणि संताजी वाघ यांची प्रेते शेजारी सापडावी याचा नेमका अन्वयार्थ काय? होळकर खरेच आधीच निघुन गेले असते तर त्यांचाच सरदार संताजी वाघ भाऊसोबत कसा मेला?

प्रश्न एवढेच नाहीत. अनेक आहेत. संजय क्षीरसागर यांनी पानिपत युद्धाच्या संदर्भात जवळपास सर्वच प्रश्नांचा उपलब्ध पुराव्यांच्या प्रकाशात वेध घेतला आहे. तत्कालीन सर्वच पत्रे, बखरी, मराठी ते फारसी साधने यांतील ठिकठिकानी उद्घ्रुते देत, जरी अनेक साधनांत विसंगती असल्या तरी त्या टिपत त्याचेही विश्लेशन करत तर्कबुद्धीने आपले निष्कर्ष वाचकांसोबत ठेवले आहेत.

माझ्या मते आजवर पानिपतबाबत एवढा सखोल संशोधन मांडणारा ग्रंथ झालेला नाही. एकतर शेजवलकरंवर जसा जातीय द्रुष्टीकोणाचा आरोप झाला तसा प्रकार या ग्रंथात कोठेही आढळुन येत नाही. या संशोधकाने उपलब्ध साधनांतुन शक्य तेवढा प्रामाणिक अर्थच काढला आहे. आणि लेखकाचा नि:ष्कर्ष पटला नाही तरी त्यांनी ठाई-ठाई मुळ संदर्भासाधनांतील उद्घ्रुतेच दिली असल्याने प्रत्येक वाचक आपापले निष्कर्षही सहज काढु शकतो...इतिहासकाराच्या मतांशी असहमत राहण्याचा अधिकार राखु शकतो...

आणि यालाच इतिहासलेखन म्हणतात. मी या तरुण इतिहासकाराला शुभेच्छा देतो.
धन्यवाद.

-संजय सोनवणी

2 comments:

  1. हे पुस्तक कुठे उपलब्ध होईल.? हवे आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4900400902881415755?BookName=Panipat-Ase-Ghadle

      Delete


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive