Thursday, May 3, 2012

Skill to improve self-confidence आत्मविश्वास विकसित करण्याचे कौशल्य

गीता कॅस्टेलिनो, सोमवार, ३० एप्रिल २०१२
(अनुवाद - सुचित्रा प्रभुणे)

क्षेत्र कुठलंही असो, त्यात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे आत्मविश्वास! याच्याच जोरावर यशाची एकेक शिडी चढता येते...
आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे, जी तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारकरीत्या बदल घडवून आणते. लोकांच्या नजरेने स्वत:कडे बघण्यापेक्षा स्वत:च्या नजरेत स्वत: कसे दिसतो, हे समजणे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणूनच जितका तुमचा स्वत:वर विश्वास असेल तितक्या तुम्ही आयुष्यात अधिकाधिक यशाच्या पायऱ्या चढाल. आत्मविश्वास काही बाजारात विकत मिळत नाही तर तो कमवावा लागतो. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता. जर पुढे मांडलेल्या गोष्टींचा तुम्ही योग्य प्रकारे विचार करून त्या अमलात आणल्या तर तुमच्या विचारसरणीत नक्कीच बदल घडून येईल आणि तुम्ही तुमचे इच्छित ध्येय गाठू शकाल. 
आत्मविश्वास विकसित करा  
योग्य पेहराव- अनेक प्रसंगी साध्या साध्या गोष्टीनेदेखील अपेक्षित परिणाम घडून येतो. स्वच्छ कपडे घातल्याने, योग्यप्रकारे आंघोळ व नियमितपणे दाढी केल्याने किंवा लेटेस्ट स्टाईल लक्षात घेऊन त्यानुसार पेहराव करणे वगरे. याचा अर्थ असा मुळीच नाही की, जास्तीत जास्त पसे पेहरावावर खर्च करावेत. ढीगभर स्वस्तात मिळणारे कपडे खरेदी करण्यापेक्षा, निवडक परंतु चांगल्या दर्जाचे कपडे घ्यावेत. यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि ऐन मोक्याच्या क्षणी कोणता पेहराव निवडावा, यात वेळ मुळीच खर्च होत नाही.
आत्मविश्वासाने पावले टाका- एखाद्या व्यक्तीला स्वत:विषयी नेमके काय वाटते, हे त्याच्या चालण्याच्या,  वावरण्याच्या शैलीवरून समजते. ती व्यक्ती हळू चालते, थकून चालते, उदासपणे, उत्साहाने की हेतुपूर्वक हे त्याच्या चालीवरून जोखले जाते. ज्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास असतो, त्यांच्या चालण्यात एकप्रकारचा उत्साह असतो. त्यांना अनेक ठिकाणी जायचं असतं, कित्येक लोकांना भेटायचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामं आटपायची असतात. जलद गतीनं चालून तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता.
आकर्षक देहबोली- एखादी व्यक्ती स्वत:ला कशा रीतीनं सादर करते, यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेता येतो. जे लोक खांदे झुकवून आणि काहीशा निरुत्साहाने हालचाली करीत असतात, त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. ते जे काम करतात, त्याविषयी त्यांना उत्साह वाटत नसतो आणि त्यांच्यात आत्मसन्मानाची वानवा असते. स्वत:ची चालण्या- वावरण्याची योग्य अशी देहबोली विकसित केल्यास एकप्रकारचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल. उभे राहताना सरळ उठा, डोके वर असू द्या नि समोरच्या व्यक्तीच्या नजरेला भिडून बोला. यामुळे तुमच्याविषयी समोरच्या व्यक्तीच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल.
कृतज्ञता- जेव्हा तुम्ही एकाहून अधिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा अमुक एक गोष्ट मिळाली नाही, म्हणून वैतागत असता. परिणामी, एक प्रकारची नकारात्मक भावना तुमच्या मनात निर्माण होत असते. तेव्हा हे जर टाळायचे असेल तर आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत, त्याबद्दल सातत्याने कृतज्ञता व्यक्त करा. उदा. एखादे यश, वैशिष्टय़पूर्ण गुण, प्रेमळ नातेसंबंध यामुळे सकारात्मक वृत्ती वाढते.
इतरांचे कौतुक करा- जेव्हा आपण स्वत:बाबत नकारात्मक विचार करतो, तेव्हा आपण इतरांमध्ये दोष शोधत राहतो. हे नकारात्मकतेचं विचारचक्र तोडणं आवश्यक असते. त्यासाठी लोकांचं कौतुक करायला शिका. गॉसिप करणं सोडून द्या. भोवतालच्या व्यक्तींमधील चांगल्या गुणांकडे लक्ष द्या.
पुढच्या रांगेत बसा- शाळा, ऑफिस किंवा एखाद्या महत्त्वाच्या परिषदेत बऱ्याचदा असं आढळून येतं की, समोरच्या रांगेत बसण्यापेक्षा लोक मागच्या रांगेत बसण्यास अधिक प्राधान्य देतात. कारण समोरच्या रांगेत बसल्यास आपल्याकडे साऱ्यांचं लक्ष जाईल, अशी भीती त्यांना वाटत असते. त्यामुळेच ही गोष्ट टाळण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो. पण या साध्याशा गोष्टीवरूनही तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे, हे जाणवतं. तेव्हा नेहमी पुढच्या रांगेत बसण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाच्या लोकांच्या नजरेत असण्याचा लाभही असतोच.
बोला- चर्चा किंवा बैठकांमध्ये काहीजण शांत बसणं पसंत करतात. कारण आपण काही बोललो तर ते चुकीचं ठरेल, इतरांच्या नजरेत आपण मूर्ख ठरू, अशी भीती त्यांना वाटत असते. पण ही भीती वाटते, तितकी खरी नसते. उलट आपण काही बोललो तर लोक अधिक लक्षपूर्वक तुमचं बोलणं ऐकतात. तेव्हा जेव्हा कधी चच्रेत किंवा इतर ठिकाणी बोलायची वेळ येईल, तेव्हा बोलायच्या तयारीत राहा. मात्र भाष्य करताना संबंधित विषयाची सविस्तर माहिती असू द्या.
स्वत:च्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करा- नेहमी आपण स्वतच्याच इच्छांचा विचार करीत असतो. तेव्हा स्वत:वरून थोडं लक्ष कमी करून इतरांच्या इच्छेचादेखील विचार करा. जर तुम्ही स्वत:चा विचार टाळून इतरांनी काय योगदान दिलं आहे, हे ध्यानात घेतल्याने सकारात्मक फरक पडतो. इतकंच नव्हे तर यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढतो. तसेच इतरांच्या कामात योगदान देण्याची सवयदेखील तुम्हाला लागेल. जितके तुम्ही योगदान द्याल, त्याहून अधिकच तुमच्या पदरात पडेल. एकदा का एखाद्या गोष्टीत तुम्ही यशस्वी झालात, तर तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागतो. भीतीवर मात करता येते.
अपयशाने निराश होऊ नका- आतापर्यंत तुम्ही ज्या योग्य गोष्टी केल्या आहेत, त्या नजरेसमोर आणा. पूर्वायुष्यात केलेल्या चुका आठवत बसू नका.
सकारात्मक गोष्टींचा सराव करा - एखादा महत्त्वाचा प्रसंग मग तो भाषण वा मुलाखत असो वा आणखी काही.. डोळे मिटून या गोष्टी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात होत आहेत, अशी कल्पना केल्याने त्याबाबत सकारात्मकता वाढते.
एखादी गोष्ट लांबणीवर टाकू नका - एखादी गोष्ट लांबणीवर टाकणं म्हणजे भीतीला आमंत्रण देण्यासारखं आहे. घाबरून काहीही होत नसतं. अशावेळी प्रत्यक्ष कृती करणं महत्त्वाचं असतं. जर प्रत्यक्ष कृती करण्यास वेळ घेतला तर भीतीच्या छायेतून बाहेर पडण्यासदेखील वेळ लागतो. म्हणून एखादी गोष्ट चुकेल म्हणून ती टाळणं योग्य नव्हे. त्यावर उपाय शोधा.
आत्मविश्वासपूर्वक विचार आणि कृती करा - ‘पाण्यात पडल्यावर माणूस बरोबर पोहायला शिकतो,’ हे तुम्ही ऐकलेच असेल. जोपर्यंत एखाद्या परिस्थितीतून आपण स्वतहून जात नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न करीत नाही. योग्य प्रकारच्या देहबोलीतून आपण आपला आत्मविश्वास विकसित करू शकतो, असे मत श्वार्ट्झने मांडले आहे. त्याने त्यासाठी पुढे बसा, नजरेला नजर भिडवून बोला, जलद चाला, जेव्हा तुमचे मत विचारले जाईल, तेव्हा आवर्जून सांगा आणि हसत राहा, ही पंचसूत्री सांगितली आहे.
नेटका विचार करा- सर्व माणसं एकसारखी असतात. प्रत्येकाला वाटणारी भीती आणि इच्छा बहुतेक सारख्याच असतात. जेव्हा तुम्ही अडचणीच्या परिस्थितीत असता, तेव्हा स्वतला आदर्श माणसाच्या जागी ठेवून विचार करा.
सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा-  जेव्हा सभोवतालची परिस्थिती अनुकूल असते, तेव्हा ती व्यक्ती अपेक्षेपेक्षाही चांगलं काम करते. आपली भावनिक ऊर्जा कामाच्या यशापयशाविषयी विचार करण्यात खर्ची घालण्याऐवजी आणखी चांगल्या पद्धतीने कसे काम करता येईल, याचा ती व्यक्ती विचार करते. या प्रक्रियेमुळे व्यक्तीतील आत्मविश्वासाची पातळी परिणामकारकरीत्या वाढते आणि त्यातून तुमच्यातील सर्वोत्तम तेच बाहेर येतं.
तुमच्या मनातील ‘पण..’दूर करा - बऱ्याच वेळेला कामाला सुरुवात करण्याआधी ‘पण हे झालंच नाही तर..’ असं मनात येतो. परिणामी, कळत-नकळतपणे आपल्याकरवी पूर्ण प्रयत्नांनिशी काम होत नाही. म्हणूनच हा ‘पण..’ दूर करायचा प्रयत्न करा.
यशाची कल्पना करा -  कोणतेही काम अंत:प्रेरणेनं केलं तर ते हमखास यशस्वी होतं. म्हणूनच काम करताना स्वतला  शिस्त लावणं आवश्यक ठरते.
टापटीप राहा - योग्य पेहराव नि त्याला शोभून दिसतील अशा मोजक्याच अ‍ॅक्सेसरीजच्या सहाय्याने आपण स्वतला स्मार्ट बनवू शकतो. तेव्हा स्वतची योग्य नि आवश्यक ती काळजी घ्या.
योग्य वेळी योग्य गोष्ट करा -  योग्य गोष्ट, योग्य वेळी करणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. टीकाकारांच्या टीकेबाबत विचार करा किंवा सरळ त्याकडे दुर्लक्ष करा. पण त्यांना तुमच्यावर वरचढ होऊ देऊ नका. योग्य गोष्ट योग्य वेळी करा नि उत्तम आत्मविश्वासाचा परिणाम साधा.
‘स्वतचे डोके कधी खाली झुकवू नका . ते नेहमी वर असू द्या. जगाच्या चेहऱ्याला नजर भिडवून बोला. - हेलन केलर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive