Thursday, May 31, 2012

रेल चक्र - ...आणि डिलिव्हरी झाली ! child delivery in railway

रेल चक्र - ...आणि डिलिव्हरी झाली !

जवळा स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरची निवृत्ती जवळ आली होती. शेवटचे पंधरा दिवस राहिले होते. एक वीस वर्षाची खेडूत तरुणी त्यांच्या घरी भांडी घासत होती. मास्तरांची तिच्यावर नजर होती. त्या मुलीचा बाप मास्तरांच्या घरी भाजी , दूध , दही , हुरडा इत्यादी देण्याच्या निमित्तानं येत असे. एक दिवस चारच्या गाडीनं मास्तरांनी बायकोला पंढरपूरला पाठवून दिलं. आता पंधरा दिवस ते एकटेच घरात राहणार होते. ती खेडूत तरुणी भांडी घासायला आली की तिच्यावर झडप घालायचं मास्तरांनी आज ठरवलं होतं. भांडी घासून झाल्यानंतर ती म्हणाली , ' मी येते मास्तर साहेब. '

' अगं , थांब चहा घेऊन जा. अगं , जादा झालाय ', मास्तरांचा प्रेमळ आग्रह.

गरमागरम चहा बरोबर त्यांनी तिला बशीत बिस्किटंही दिली.

' बिस्किट मी बारक्याला नेते. ' असं म्हणून तिनं बिस्किटं कागदात गुंडाळली व गरम चहा पटकन पिऊन टाकला. रिटायर झाल्यावर तर ही आपल्या दृष्टीस ही पडणार नाही , असा मास्तरांच्या मनात विचार आला. त्यांनी बिस्किटाचा पुडा तिला दिला व म्हणाले , हा पुडाही तुझ्या बारक्यासाठी घेऊन जा. '

' येवढी बस मला , मास्तरसाहेब. '

' अग घे . '

ती पुडा घेऊ लागली , तसं मास्तरांनी तिला जवळ ओढलं व आवळून धरलं.

' अवं मास्तर , तुमची बायकू गाडीनं पंढरपूरला गेली न्हाय , तर माझ्या बा संगं आमच्या शेतात गेलीया. आता पत्तूर तुमची बायकू आमच्या शेतात लई येळा आलीया. तुम्हाला खोटं वाटत असलं तर चला , आता माज्यासंगं. '

मास्तरांची पकड ढिली पडली.

त्यांना बायकोचं वाक्य आठवलं , ' तुम्ही बाहेर शेण खायचं बंद करा , नाहीतर फार वाईट परिणाम होतील. हे लक्षात ठेवा. '

मास्तरांचा चेहरा पडला. ती तरुणी मास्तरांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली , ' आता जे तुमच्या बायकुसंबंधात सांगितलं ते खोटं हाय. तुमची बायकू पंढरपूरलाच गेलीया. तुमची बायकू देवी हाय , पर तुमी मातर राक्षस हाय , सैतान हाय. '

आणि बिस्किटाचा पुडा फेकून ती रागाने निघून गेली. या छोट्या लाइनवरच्या म्हणजे नॅरोगेजवर असे किस्से वारंवार घडत. त्याला कारण म्हणजे दोनच गाड्या तिथे धावत असल्यामुळे मास्तरांना फारसं काम नसायचं. म्हणून इतर उद्योग करायला भरपूर वेळ! फक्त मोठ्या लाइनवरच्या म्हणजे ब्रॉडगेजच्या मास्तरांना भरपूर काम असल्यामुळे अशा गोष्टीकडे त्यांचं क्वचितच लक्ष जात असे. तेवढी फुरसत त्यांच्याकडे नव्हती.

एकदा सॅण्डर्हस्ट रोड स्टेशनवर लोकल आली तेव्हा पहाटेचे साडेचार झाले होते. एक अवघडलेली आई व तिचा मुलगा लोकलमधून उतरले. ती बाई कण्हत होती. ' अग आई गं ' असा आक्रोश करत होती. असिस्टण्ट स्टेशन मास्तर गुलाटी तिकिटं घेण्यासाठी ऑफिस बाहेर आले. त्याचं लक्ष त्या बाईच्या विव्हळण्याकडे गेलं. त्या मुलाला त्यांनी विचारलं.

' क्या तकलीफ है बहनजी को ?'

' माँ के पेट मे दर्द हो रहा है. '

त्या बाईला प्रसूती वेदना होत असल्याचं गुलाटींच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच झाडूवालीला मदतीला बोलावलं. त्या बाईला वेटिंग रूमच्या कोपऱ्यात निजवलं. चादरीचा आडोसा केला. गुलाटीनं त्या मुलाला आपल्या थर्मासमधला चहा दिला. तो मुलगा घाबरला होता. गुलाटीनं त्याला बिस्किटं दिली.

थोडा वेळ गेला आणि नवजात अर्भकाचा टँहा टँहा असा रडण्याचा आवाज आला. गुलाटी हात जोडून म्हणाले , ' भगवान , तेरा शुक्र है. '

आतापर्यंत स्टेशन मास्तर लगेज , पार्सल व गुड्सची डिलिव्हरी करत होते. परंतु चाइल्ड डिलिव्हरी करणारे गुलाटी हे भारतीय रेल्वेतले पहिलेच व एकमेव स्टेशनमास्तर ठरले.

- व्यंकटेश बोर्गीकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive