Thursday, May 31, 2012

रेल चक्र - थोर तुझे उपकार! - Railway Gratefulness

रेल चक्र - थोर तुझे उपकार!
ट्रॅफिक अप्रॅण्टिसच्या ट्रेनिंगदरम्यान आम्हाला सहा महिन्यासाठी गाडीचं काम करावं लागत असे. एकदा आमची मालगाडी सावळगी स्टेशहून थ्रू गेली म्हणजे न थांबता गेली. पुढे बबलाद स्टेशन होतं व बबलाद स्टेशनच्या सायडिंगमध्ये गाडी घ्यायचं कंट्रोलरनं ठरवलं असावं कारण मागे एक्स्प्रेस गाडी होती. परंतु सावळगी व बबलादच्या मध्येच गाडी थांबल्यामुळे मी खाली उतरलो कारण मागून एक्स्प्रेस गाडी येणार होती. रात्रीची वेळ होती. इंजिनाचा आवाज ही येत नव्हता व उजेडही दिसत नव्हता. मी बत्ती घेऊन इंजिन आहे का नाही हे पाहण्यासाठी भरभर निघलो. मालगाडीला एकूण चाळीस डबे होते , त्यापैकी बावीस डबे घेऊन ड्रायव्हर पुढे निघून गेला होता. गाडी अलग कशी झाली याची जाणीव मला किंवा ड्रायव्हरला कशी झाली नाही याचं आश्चर्य वाटलं. मी परत धावत मागे आलो फटाके घेतले कारण तोपर्यंत मागून एक्स्प्रेस येण्याची वेळ झाली होती. मी रुळावर फटाके ठेवले व लालबत्ती तिथे ठेवली उरलेल्या गाडीकडे येण्यासाठी निघालो. मला आश्चर्याचा धक्काच बसला. उरलेले 18 डबेही ड्रायव्हर येऊन घेऊन गेला. मी ब्रेकमध्ये आहे का नाही याचीही त्याने दखल घेतली नाही. मी हातबत्ती घेतली व रुळावर ठेवलेले फटाकेही काढले व बबलाद स्टेशनच्या दिशेने निघालो. थोड्या वेळातच एक्स्प्रेस गेली व मी बबलाद स्टेशनवर आलो व ड्रायव्हवर मनसोक्त ओरडलो. ड्रायव्हर शांतपणे म्हणाला , ' अरे माझ्यावर ओरडतोस कशाला माझं अभिनंदन कर कारण सेक्शनमध्ये राहिलेले 18 डबे मी , एक्स्प्रेस सावळगी पास व्हायच्या आत बबलादच्या सायडिंगमध्ये आणले समजलं. '

स्टेशन मास्तर म्हणाले , ' त्यानी मलाही वाचवलं. कारण हा बावीस डबे घेऊन गाडी सायडिंगमध्ये येताच मी घाईघाईनं सेक्शन क्लियर केलं व एक्स्प्रेसला लाइन क्लियर दिली. केवढी मोठी चूक केली होती मी! '

हे देवा! म्हणून मी कपाळाला हात लावला व ड्रायव्हरवरची चीड कुठल्याकुठे पळून गेली. एकदा एक मेलगाडी सिग्नल न दिल्यामुळे एका छोट्या स्टेशनमध्ये उभी होती. सिग्नल देताच गाडी निघाली. एक बाई गार्डाकडे आरडत आली. ' गार्डसाहेब गाडी थांबवा वं माझ्या मुलाला दवाखान्यात न्यायचं हाय. लई शिरीयश हाय बघा. '

तिच्या मागे चार माणसे मुलाला एका फळफुटावर निजवून घेऊन येत होती. ती बाई गाडी मागे धावत गयावया करत होती. गार्डनं ब्रेक लावला थोड्या अंतरावर जाऊन गाडी थांबली. गार्डनं पाहिलं तो मुलगा अत्यवस्थ होता. ते सगळे मुलाला त्या फळकुटासह घेऊन चढले. यात दहा मिनिटं गेली. स्टेशन मास्तर ' काय झालं ' म्हणून गार्डला विचारायला आले.

' मुलगा सिरियस आहे त्याला घेण्यासाठी गाडी थांबवली. ' गार्ड म्हणाला.

' कंट्रोलरला काय सांगायचं ?' स्टेशन मास्तरनं विचारलं.

' सिग्नल मिळाल्यावर गाडी निघताना साखळी ओढल्याचं सांगा. त्यावर दहा मिनिटं दाखवू. '

' ठीक आहे. '

गाडी निघाली. स्टेशन मास्तरांनी कंट्रोलला गाडी प्रथम सिग्नल व नंतर साखळी ओढल्या मुळे थांबल्याचं सांगितलं.

पुढच्या मोठ्या स्टेशनला ती मेल थांबली त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

एक महिन्यानंतर त्या गार्ड साहेबांना एक पत्र आलं. त्यातल्या महत्त्वाच्या मजकुरावरून गार्डची नजर वारंवार फिरू लागली...

.... त्या दिवशी तुम्ही गाडी थांबवल्यामुळे माझ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकले व त्या मुळेच तो वाचला. कारण दाखल करताना डॉक्टर म्हणाले होते. ' बाई बरं झालं मुलाला लवकर आणलंत अजून अर्ध्यातासात आणलं असतं तर मुलगा हातचा गेला असता... '

गार्डसाहेब तुमचे उपकार मी जन्मभर विसरू शकत नाही. मला लिहिता वाचता येत नाही आमच्या गावच्या मास्तरांकडून लिहून हे पाठवत आहे. एकदा आमच्या शेतात तुम्ही सगळी मंडळी हुरडा खायला जरूर या नुसतं हो म्हणू नका...

घरच्या अडचणी , मुलांच्या शाळा परीक्षा , कामाचा ताण इत्यादीमुळे त्या गार्डला सहकुटुंब काही हुरडा खायला जाणं जमलं नाही. एके दिवशी ती बाईच आपल्या मुला , नवऱ्यासह गार्डच्या घरी हुरडा घेऊन आली. गार्ड साहेब आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहतच राहिले.


- व्यंकटेश बोर्गीकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive