स्पर्धा परीक्षांचा अभ्यास म्हणजे काहीतरी अवघड काम असल्याची भीती परीक्षार्थींमध्ये दिसून येते. परंतु , शालेय पुस्तकांचा अभ्यास , रोजच्या घडामोडी , व्यक्तिमत्त्व विकास या गोष्टींकडे लक्ष दिलं तर ,परीक्षा फारच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता येतात. ' महाराष्ट्र टाइम्स ' ने मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये तज्ज्ञांनी एमपीएससी , युपीएससी आणि बँकेच्या परीक्षांविषयी माहिती दिली. यामध्ये परीक्षांचं स्वरूप , अभ्यास कसा करायचा , पुस्तकांची माहिती अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता.
युपीएससी ही परीक्षा नसून परीक्षा घेणारं एक मंडळ आहे. ज्यांच्यामार्फत नागरी सेवेच्या परीक्षा घेतल्या जातात.
पूर्वपरीक्षा , मुख्यपरीक्षा अणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जात असून त्यामध्ये अनुक्रमे उत्तीर्ण होणं भाग असतं.
पूर्वपरीक्षा ही ४०० गुणांची असून , त्यात दोन पेपर्स असतात. पहिल्या जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान तपासलं जातं. पर्यावरण , इंडोलॉजी , चालू घडामोडी यांसारख्या नवीन विषयांचा यात समावेश केलेला आहे. दुसऱ्या पेपरमध्ये लॉजिकल थिंकिंग , संभाषण कौशल्य , कॉम्प्रिहेन्शन सारखे विषय असून त्यात ८० प्रश्न असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात १/३ निगेटिव्ह मार्किंग पद्धत्ती लागू केलेली आहे.
मुख्य परीक्षा २००० गुणांची असते. त्यात नऊ पेपर असून एक भारतीय भाषा ,इंग्रजी आणि निबंध असे तीन पेपर बंधनकारक आहेत. त्यापैकी भाषांचे गुण एकूण गुणांच्या संख्येत धरले जात नसले तरीही त्यांत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अन्यथा इतर पेपर तपासले जात नाहीत.
निबंधाच्या पेपरला २०० गुण आहेत. सामान्य ज्ञानाचे दोन पेपर असून ते प्रत्येकी ३०० गुणांचे असतात. तसंच , २७ विषयांच्या यादीतून तुम्हाला दोन विषय निवडायचे असतात. त्यांचे प्रत्येकी २ पेपर ३०० गुणांचे असतात. म्हणजे भाषा वगळता एकूण परीक्षा २००० गुणांची होते.
मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर उरते ती मुलाखत ! ३०० गुणांच्या मुलाखतीत तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी घेतली जाते. निकाल लावताना मुख्य परीक्षेचे २००० आणि मुलाखतीचे ३०० अशा २३०० गुणांमधून क्रमांक काढला जातो. तुमच्या मेरीट वरील क्रमांकानुसार तुम्ही नियुक्ती केली जाते.
आयएएस , आयपीएस , आयएफएस रेल्वे आणि ट्राफिक अशा अनेक सेवांमध्ये जाण्याची संधी मिळते.
नागरी सेवांमध्ये काम करताना समाज सेवा करण्याची उत्तम संधी मिळते तसेच लोकांशी थेट संपर्क साधता येतो.
या परीक्षेत यश मिळवायचं असेल तर त्याची तयारी मात्र जिद्द आणि चिकाटीने करावी लागते. कोचिंग घेऊन तसेच स्वतः अभ्यास करून याची तयारी करता येते.
या परीक्षेला वयोमर्यादा असून ओपन कॅटगरीत २१ ते ३० वर्षांपर्यंत ४ वेळा , ओबीसी कॅटगरीत २१ ते ३३ वर्षांपर्यंत ७ वेळा तर एससीएसटी कॅटगरीत ३५ वर्षांपर्यंत ११ वेळा ही परीक्षा देता येते.
मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी ही परीक्षा आणि मुलाखत मराठीत देऊ शकतात.
व्यक्तिमत्व पडताळा
महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये युपीएससीबद्दल जागृती निर्माण व्हायला हवी. तीन भागांमध्ये घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. अभ्यासाचं नियोजन , संधी आणि अभ्यासक्रमाची योग्य आखणी या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणं महत्त्वाचं आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची पडताळणी करून ,नक्की काय करायचंय हे ठरवून मगच या परीक्षेला बसा.
रौनक भगवते , युपीएससी परीक्षार्थी
दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तकं अभ्यासा
एमपीएससीची म्हणजे डोंगर पार करायला लागणार अशी भीतीयुक्त भावना परीक्षार्थींच्या मनात असते. परंतु , योग्य आणि नेटका अभ्यास केला तर विद्यार्थी चांगल्या गुणांनी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. या परीक्षेसाठी चौथी ते दहावीची पाठ्यपुस्तकं अभ्यासायला हवीत. याच माहितीवर आधारित प्रश्न या परीक्षेत विचारले जातात. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही एसएससी बोर्डाची ही शालेय पुस्तकंच उपयोगी पडतात. कारण , इंग्रजीत कुठल्याच प्रकाशनांची पुस्तकं उपलब्ध नाहीत. म्हणूनच महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तकं एमपीएससीसाठी फारच उपयुक्त ठरतात. या परीक्षेसाठी सीट्स कमी असल्याने जास्तीत जास्त मार्क मिळवणं गरजेचं असतं. असं असलं तरीही , विद्यार्थ्यांनी प्लॅनिंग करून अभ्यास केला तर निकाल नक्कीच चांगला लागेल.
आनंद मापुस्कर , करिअर कौन्सिलर
एमपीएससीचा पॅटर्न
एमपीएससीत दोन श्रेणीत एकूण १९ पोस्ट आहेत. यापैकी पहिल्या श्रेणीत एसीपी ,उपजिल्हाधिकारी , तहसीलदार सेल्स टॅक्स ऑफिसर यांचा समावेश असतो. तर ,दुसऱ्या श्रेणीत पीएसआय , मंत्रालय सहाय्यक , एसटीआय अशा पदांचा समावेश होतो. २०११ पासून पीएसआय , एसटीआय , मंत्रालय सहाय्यक या पदासाठी वेगळी परीक्षा घेतली जाते.
राज्यसेवा परीक्षा SSC
l पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा आणि मुलाखत असं या परीक्षेचं स्वरूप असतं. यामध्ये १०० प्रश्नांसाठी दोन तासांचा अवधी दिला जातो. म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी ३६ सेकंदांचा वेळ मिळतो.
या २०० प्रश्नांमध्ये कला शाखा , वाणिज्य व अर्थ घटक , विज्ञान आणि तंत्रज्ञान , कृषी आणि करन्ट अफेअर्स , बुध्दिमत्ता चाचणी असे सहा विषय समाविष्ट असतात.
एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत निगेटीव्ह मार्किंगमध्ये एक चतुर्थांश पद्धत असते. म्हणजेच चार चुकीच्या प्रश्नांसाठी एक मार्क कापला जातो.
यानंतर येणारी मुख्य परीक्षा एकूण ८०० मार्कांची असून १०० मार्क मुलाखातीसाठी असतात. मुख्य परीक्षेत दोन पेपर भाषेवर आधारित तर उर्वरित प्रश्न सामान्य अध्ययन म्हणजे इतिहास , भूगोल , राज्य घटना , मनुष्यबळ विकास , अर्थशास्त्र , कृषी यावर आधारित असतात. या परिक्षेत निगेटीव्ह मार्किगसाठी एक तृतीयांश पद्धत असते. म्हणजेच तीन प्रश्न चुकल्यास तुमचा एक मार्क वजा होतो.
राज्य सेवेच्या मुख्य परीक्षेत सहा पेपरपैकी मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रत्येकी १०० गुणांच्या प्रश्नपत्रिका असतील. तर , उर्वरित चार पेपर सामान्य अध्ययन-१ , इतिहास व भूगोल , सामान्य अध्ययन-२ , भारतीय राज्यघटना व भारतीय राजकरण यात प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न असतात. तिसरा पेपर सामान्य अध्ययन-३ ,मनुष्यबळ विकास व मानवी हक्क आणि सामान्य अध्ययन-४ मध्ये अर्थशास्त्र व नियोजन , विकासाचे अर्थशास्त्र , विज्ञान व तंत्रज्ञान विकासावर आधारित प्रश्न असतील.
l सामान्य अध्ययन १ ते ४च्या पेपर प्रत्येकी १५० मार्कांचा असून प्रत्येक पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या गटातील उमेदवाराला ४५ तर राखीव गटातील उमेदवाराला ४० टक्के गुण मिळणं आवश्यक आहे.
पीएसआय , सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी परीक्षा
या पदांसाठीच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच असला तरी मुख्य परीक्षा ४०० मार्कांची असते. तर , मुलाखातीसाठी ५० गुण असतात. पीएसआय पदाच्या मुलाखातीसाठी ७५ आणि शारिरीक क्षमता चाचणीसाठी २०० गुण असतात.
पूर्व परीक्षेत अंकगणित , भूगोल (प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधीत) , भारताचा सामान्य इतिहास , नागरिकशास्त्र व अर्थव्यवस्था , सामान्य विज्ञान , महाराष्ट्रातील समाजसुधारक , आणि चालू घडामोडी या विषयांवर प्रश्न असतात.
मुख्य परीक्षा ४०० मार्कांची असून , यात मराठी आणि इंग्रजीसाठी २०० मार्क तर उर्वरित २०० मार्क सामान्य ज्ञान , बुध्दिमापन व विषयाचे ज्ञान यासाठी २०० गुण असतात.
तयारी एमपीएससीची MPSC
एमपीएससीमध्ये मराठी आणि इंग्रजी व्याकरणावर आधारित प्रश्न येत असल्याने भाषेचं सखोल ज्ञान हवं.
विज्ञान या विषयासाठी आठवी ते १० वी , इतिहासासाठी ८ वी , भूगोलासाठी चौथी ,नागरिकशास्त्रासाठी सहावी ते १० वी आणि बुध्दिमापनासाठी चौथी आणि सातवीतील स्कॉलरशिपची पुस्तकांची उजळणी करावी.
जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. कारण , यामुळे परीक्षेचं स्वरूप या प्रश्नपत्रिका वेबसाइटवर उपलब्ध आहेत. त्यासाठी एमपीएससीच्या साइट पाहू शकता.
रोजच्या घडामोडींसाठी रोजचं वर्तमानपत्र वाचायला हवं. तसंच , महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणं काढून त्यांची वही बनवल्यास , परीक्षेच्या काळात ती नक्कीच उपयोगी पडतील.
पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यावर दोनच महिन्यांत मुख्य परीक्षा असते. यामुळे पूर्व परीक्षेबरोबरच मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला हवा.
मुलाखतीमध्ये विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं तर थापा मारू नका.
परीक्षेचं तंत्र समजून घ्या
कॉमर्स , आर्ट्स आणि विज्ञान या तीनही शाखांचे विद्यार्थी बँकेत नोकरी करू शकतात. यासाठी फक्त स्पर्धा परीक्षांचं तंत्र समजून घ्यायला हवं. कारण , बँकिंग क्षेत्र विस्तारत असून , प्रत्येक बँकेत दोन कस्टमर रिलेशन एक्झिक्युटीव्हची भरती होणार आहे. यामुळे सुमारे दीड लाख नोकरीच्या संधी निर्माण होतील. यावरुनच बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी दिसून येतात. इंडियन बॅंकिंग पर्सनल सिलेक्शनतर्फे (आयबीपीएस) वर्षातून दोनदा देशभरातील १९ बॅंकांसाठी ऑफिसर आणि क्लेरीकल पदांसाठी परीक्षा घेतली जाते.
- प्रा. संजय मोरे
सिलॅबस आयबीपीएसचा Syllabus
आयबीपीएसचा पेपर २०० मार्कांचा असून यामध्ये गणित , बुध्दिमत्ता चाचणी ,इंग्लिश आणि सामान्य ज्ञान असे चार विषय असतात. दोन तासांच्या वेळेत तुम्हाला पेपर सोडवावे लागतात.
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही १९ बँकांच्या भरतीसाठी पात्र ठरता. प्रत्येक बॅंकेच्या कटऑफनुसार तुम्हाला अप्लाय करता येतं.
क्लार्कपदासाठी १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येतो. मात्र ,यासाठी त्यांना १० वीत ६० किंवा १२ वीत ५० टक्के अपेक्षित आहेत. ऑफिसरपदासाठी अर्ज करताना मात्र पदवीधर असणं बंधनकारक असतं.
आयबीपीएसमधील यशासाठी IBPS
आयबीपीएसमधील गणित आणि इंजिनीअरिंगच्या तयारीसाठी १० वी पर्यंतचा अभ्यास करावा.
बुद्धिमत्ता चाचणीसाठी चौथी आणि सातवीतील स्कॉलरशिपच्या पुस्तकांची उजळणी करा. तसंच , सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला प्रामुख्याने बँकिंग आणि इकॉनॉमिक्स क्षेत्रातील वर्तमानपत्रातील घडामोडींचं वाचन करायला हवं.
आमचेही प्रश्न
मी एमबीए मार्केटिंचा विद्यार्थी असून मी बँकेत काम करु शकतो का ?
मार्केंटिंग आणि फायनान्स हे दोन्ही वेगळी क्षेत्र असली तरी बँकांनाही मार्केटिंगची गरज भासते. तुमच्या मार्केटिंग्ज स्कील्सचा वापर बँकेच्या फायद्यासाठी कसा होऊ शकतो हे तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेस पटवून देऊ शकता.
एमपीएससीत लेखी आणि मुलाखातीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणं शक्य असतं का ? ते कसे मिळवता येतील ?
एमपीएससीत लेखी परिक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवणं शक्य आहे. यासाठी तुमचा अभ्यास पक्का असावा. मात्र , मुलाखातीमध्ये तुमची रिअॅक्शन , वावर ,आत्मविश्वास अशा गोष्टी पाहिल्या जात असल्याने तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील की नाही याची शाश्वती देता येत नाही.
यूपीएससीतील जनरल स्टडीजची तयारी कशी करावी ? सिलॅबस बदलल्याने अभ्यास कसा करावा ?
यूपीएससीतील जनरल स्टडीजची तयारी करताना स्पेक्ट्रम पब्लिकेशन्सची पुस्तक वाचता येतील. आतंरराष्ट्रीय संबंधांविषयीच्या माहिती , विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी वृत्तपत्रवाचन फायदेशीर ठरेल. सिलॅबस बदलला असला तरी जनरल स्टडीज १ आणि २मध्ये बदल कमी आहेत. फक्त लेव्हल ऑफ डिफिकल्टी वाढलीय.
मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. मला आयएएस करायचंय. मी कशी तयारी करू ?
वृत्तपत्रवाचन आणि इंटरनेटचा आधार घेऊन तुम्ही अभ्यासाची सुरुवात करु शकता. युनिक , स्पेक्ट्रम यासारख्या पब्लिकेशनची पुस्तक चाळून बघा. जुन्या प्रश्नपत्रिकेवर नजर टाका. यामुळे तुम्हाला प्रश्न आणि सिलॅबस कसा आहे याचा अंदाज येईल.
मी सध्या १० वीत असून मला आयएएस करायचंय ? यासाठी अकरावीत मी कोणती फॅकल्टी निवडू ?
पोस्टिंगच्या वेळी फॅकल्टीचा विचार होतो का ? मराठीत मुलाखत दिल्यास पोस्टिंगमध्ये अडचणी येतात का ?
यूपीएससी UPSC , एमपीएससीसाठी कोणत्याही फॅकल्टीचा विद्यार्थी अप्लाय करु शकतो. पोस्टिंग देताना भाषा आणि फॅकल्टीचा विचार केला जात नाही.
No comments:
Post a Comment