Thursday, May 31, 2012

Relchakara - Experiences in mumbai railway job

रेल चक्र - रूळ ओलांडला आणि...
ऑटोमॅटिक सेक्शनमध्ये सिग्नल लाल असला तर दिवसा एक मिनिट व रात्री दोन मिनिटे थांबून गाडी सुरू होत असल्याचं लोकांना माहीत झालं होतं. एकदा एक लोकल लाल सिग्नलजवळ थांबली व पाच ते दहा मिनिटे झाली तरी लोकल का सुरू होत नाही हे पहायला उतारू खाली उतरले. मोटरमनच्या केबिनभोवती सगळे जमले व म्हणू लागले.

' अबे ओ मोटरमन गाडी चला. '

' गाडी शुरू कर लालबत्ती रहा तो क्या हुआ. दस मिनिट हो गये. '

मोटरमन सिग्नलकडे पाहात गप्प बसून राहिला व त्याने कॅबच्या काचा ओढून घेतल्या. ते पाहून उतारू चिडले , ' अब , े खिडकी बंद मत कर. अगर हम काँच पर पत्थर मारेंगे तो तेरा थोबडा फूट जायेगा. '

' गाडी क्यूँ नही चला रहा है. औरतसे झगडा करके आया क्या ?'

' घर का गुस्सा बाहर मत निकाल. ' गाडी चलाच्या आरडाओरड्यात चार-पाचजणांनी खिडकीवर मारण्यासाठी दगड हातात घेतले. मोटरमननं खिडकी उघडली व ओरडून म्हणाला ' हे पहा , मी गाडी मुद्दाम थांबवली नाही. तसा मला अधिकारही नाही. सिग्नल लाल आहे म्हणून मी थांबलोय. '

' सिग्नल लाल असला तर काय झालं ?' ( एकानं ओरडून विचारलं.)

' हे पहा तुम्हाला सिग्नल लाल असताना , केव्हा पुढे जायचं व केव्हा थांबायचं या संबंधी काही नियम आहेत. ते नियम तुम्हाला संपूर्णपणे माहीत नाहीत. तसं माहीत असणंही शक्य नाही. लाल सिग्नल असताना दिवसा एक मिनिट व रात्री दोन मिनिटे थांबून गाडी पुढे गेल्याचं तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळे तुम्ही मला पुढे जायला सांगत आहात. ज्या सिग्नलवर ' ए ' मार्कर असेल व तो सिग्नल लाल असेल तरच वरील नियमाप्रमाणे पुढं जाता येतं. परंतु या सिग्नलला ' ए ' मार्कर नाही. म्हणजेच हा ऑटोमॅटिक सिग्नल नाही. त्यामुळे हा सिग्नल हिरवा होत नाही तोपर्यंत मला गाडी सिग्नल ओलांडून पुढे जाता येत नाही. '

' ओ , आम्हाला काहीतरी फेकू नका. सकाळपासून कुणी भेटलं नाही का ?' एक ओरडला.

तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. मोटरमननं दीर्घ शिट्टी दिली व सगळे उतारू डब्यात चढल्याचं पाहताच लोकल सुरू केली. तेव्हा लोकलमध्ये चर्चा सुरू झाली. एक उतारू म्हणाला , ' मोटरमन म्हणत होता ते खरं आहे , ऑटोमॅटिक सिग्नल असला तरच तो लाल असतानाही सिग्नल पार करू शकतो परंतु तो जर नॉन ऑटोमॅटिक असेल तर सिग्नल हिरवा होईपर्यंत त्याला पुढे जाता येत नाही. '

पावसाळ्यात तर मोटरमनचे फारच हाल होतात. रुळावर पाणी साचलेलं असतं आणि रुळावर चार इंचापर्यंत पाणी असेल तरच गाडी पुढे घेऊन जाता येते. नाहीतर त्या मर्यादेपर्यंत पाणी ओसरण्याची वाट पाहात थांबावं लागतं. तेव्हा उतारूंच्या प्रक्षोभाला ड्रायव्हरला तोंड द्यावं लागतं.

धुक्याचं साम्राज्य जेव्हा पसरतं त्या वेळेसही ड्रायव्हर व मोटरमनला गाडी फार सावधानतेने व सुरक्षितेने चालवावी लागते.

लोकांनी रुळ ओलांडून जाऊ नये तर पूलाचा उपयोग करावा म्हणजे आपल्या जीविताला हानी होणार नाही , असं उदघोषक नेहमी सांगत असतो. ज्या ठिकाणी उद्घोषक नसतो तिथे या संबंधीच्या मजकुराच्या पाट्या लावलेल्या असतात. परंतु लोक या उद्घोषणाकडे व पाट्यांकडे दुर्लक्ष करतात व रुळ ओलांडत राहतात. रुळ ओलांडताना एक शाळकरी मुलगा व मुलगी लोकलखाली चिरडली गेली व मेली. गाडी वेगात असल्यानं मोटरमनला गाडी ताबडतोब थांबवणं व त्यांचा जीव वाचणं अशक्यच होतं. त्याला लोकांच्या क्षोभाला , रागाला सामोरं जावं लागलं.

' साला , याची मुलं असती तर यानं ताबडतोब गाडी थांबवली असती ?'

' परदु:ख शितळ म्हणतात तसं या मुलांच्या चिरडण्याचं याला काय दु:ख होणार ?'

परंतु प्रत्यक्ष घटना पाहिलेले उतारू मात्र म्हणतात , ' नाही , यात मोटरमनची काही चूक नव्हती. त्या रूळ ओलांडणाऱ्या मुलांचीच चूक होती. तरीही मोटरमनने शिट्टी वाजवून त्यांना सावधान करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही उपयोग झाला नाही. '

बहुतांशी ड्रायव्हर व मोटरमनच्या नोकरी दरम्यान असे अपघात घडतच असतात. अशा घटनांचे त्यांच्या मनावर ही आघात होत असतात. एक प्रकारची अपराधी भावना त्यांची चूक नसतानाही त्यांना कुरतडत राहते. एका मोटरमनच्या आठ तासाच्या ड्युटीत असे चार अपघात घडले. त्याचं मन त्याला खात होतं... अरेरे , चार जण आपल्या गाडी खाली चिरडले गेले...

तो ड्युटी संपवून घरी गेला. हातपाय धुवून खुचीर्वर बसला. बायकोनं विचारलं , ' जेवायला वाढू. '

' नको , आज जेवायची इच्छाच नाही. ' आणि त्याने घडलेल्या अपघातांचा बायको समोर पाढाच वाचला , ते ऐकून बायकोही शहारली.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive