Monday, May 21, 2012

सुधाताईंच्या आनंदमय कथा- Goshta Zaryachi, Sudha Varde Autobiography

सुधाताईंच्या आनंदमय कथा


सुधाताईंच्या आनंदमय कथा

श्रीमती सुधा वर्दे यांनी 'गोष्ट झ-याची' या आत्मचरित्रात आपणास त्यांच्या 'सदा आनंदमय जीवनाती'ल अनेक कथा कथन केल्या आहेत. दुस-यासाठी जीवन जगताना मिळालेला आनंद त्यांनी या पुस्तकाच्या रूपानं आपल्याकडे व्यक्त केला आहे.

सुधाताई म्हणजे जनता पक्षाच्या राजवटीतील शिक्षणमंत्री प्रा. सदानंद वर्दे यांच्या पत्नी. परंतु, त्यांची ओळख प्रा. वर्दे यांच्या पत्नी म्हणून करून देणं म्हणजे त्यांच्यावर फार मोठा अन्याय केल्यासारखं होणार. कारण त्यांचं स्वत:चं कार्यही महान आहे. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आयुष्यभर सेवादल आणि सेवादलाशी जोडलेल्या कलापथकास वाहून घेतलं होतं. हे काम त्यांनी केवळ मुंबई आणि महाराष्ट्र पुरतं केलं नाही तर संपूर्ण देशभर त्यांची भटकंती होती. लगनआधी कॉलेज जीवनापासून त्या सेवादलाशी जोडल्या गेलेल्या होत्या आणि प्रा. वर्दे यांच्यांशी लग्न करण्याचं एकमेव कारण म्हणजे 'लगननंतरही सेवादलात काम करायला मिळणार हेच होतं!'

त्यामुळे मुळच्या कोतवाल कुटुंबातील अनुताईची जीगनगाठ सेवादलातच काम करणा-या सदानंद वर्देशी बसली. त्या म्हणतात, 'आज लग्न ठरलं की रोमान्स, हनीमून वगैरे वगैरे... तेव्हा हे असलं काही नव्हतं. लग्न करायचं तर सेवादलातल्याच माणसाशी. सेवादलाशिवाय दुसरा विचार नव्हता.'

सुधाताईचा कलापथकाच्या अनेक कार्यक्रमात सहभाग असे. स्वत: त्या नृत्य करीत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतर भागांतूनही कलाकर यावेत म्हणजे समाजवादी चळवळ फोफावेल, असा विचार करून त्यांनी मुंबईबाहेर जाऊन शिबिरं घेतली. कलापथकाचा आरंभीचा उद्देश लोकरंजनातून लोकशिक्षण हा होता. परंतु, त्याशिवाय एक दुस-यासाठी जगणं, आनंद, कष्ट, दु:ख सर्व सर्वांनी मिळून उपभोगणं या संस्कारांचाही प्रचार करण्याचा प्रयत्न केला.

' महाराष्ट्र दर्शन' कार्यक्रमात प्रा. वर्दे गात असत आणि सुधाताई नाचत असत. प्राध्यापक नवरा लावणी गातो आणि बायको त्यावर नाचते, याचा वेगळा परिणाम वेगवेगळ्या वयोगटांवर व्हायचा, पण तो सकारात्मक असायचा, असेही त्यांनी नमूद केले आहे.

कलापथकाच्या कार्यक्रमासाठी पन्नास तरुण मुला-मुलींचा गट घेऊन महिना दीड महिना एकत्र फिरायचं, रात्र रात्र प्रवास करायचा. हे सर्व करत असताना तीस वर्षांत कलापथकात कधी भांडणं झाली नाहीत, असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. सोबत प्रा. वसंत बापट, भाऊ रानडे, लीलाधर हेगडे प्रभृतीची साथ नेहमीच असे व त्यांची शिस्तही कडक असे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत दिल्लीत त्यांनी 'महाराष्ट्र दर्शन' कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम पाहून नेहरू भारावून गेले व त्यांनी प्रत्येक कलाकारांचे अभिनंदन केले.

' भारत दर्शन' कार्यक्रमात ओरिसातील लोकनृत्य बसविण्याचा निर्णय घेतला. त्या नृत्याचा अभ्यास करण्यासाठी सुधाताई ओरिसाला एकट्या जात असताना रेल्वे प्रवासात व इतरस्त्र आलेले अनुभव थरारक आहेत. असाच एक धडकी भरवणारा मुझफ्फरपूरचा प्रवास त्यांनी केलेला आहे.

श्रीमती इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या काळात तुरुंगात जावे लागेल म्हणून अनेक विरोधी पक्ष नेत्यांच्या व कार्यर्कत्यांच्या छातीत धडकी भरलेली असताना वर्दे पती-पत्नी दोघंही शांतपणे आपला जनजागृतीचा कार्यक्रम पार पाडत होते. अटक अटळ आहे. त्यामुळे या अटकेची भीती कशासाठी, असा त्यांचा प्रश्न असे. त्यांच्या या निर्भय जीवन पद्धतीमुळे प्रा. वर्दे यांच्या अटकेच्यावेळी घडलेला किस्सा त्यांनी नमूद केला आहे. ''संध्याकळी अनू (प्रा. वर्दे) घरी. मिटिंगा चालू होत्या. नाक्यावर, ऑफिसवर बसणं चालू होतं आणि आम्ही वाट बघत होतो, याला मिसा कधी लागणार याची. शुक्रवार होता. अनू ऑफिसवर होता. इन्स्पेक्टर वागळे चौकशीला आले. मी म्हटलं, 'न्यायला आलात?' 'छे, छे हो, नुसती चौकशी.' मी हसले मोठ्यानं. 'पकडायला आलात आणि सांगायला भिता?' नाही नाही करत ते ऑफिसवर गेले. अनूचा फोन आला, बॅग भरून ठेव. माझी कामं झाली की येतो. अनूची कामं झाली. घरी कोंबडीचा मस्त स्वयंपाक करून ठेवला होता. बाहेर गर्दी जमली होती. तेवढ्या वेळापुरती आणीबाणीची ऐशी की तैशी झाली होती. वर्दे घरात कोंबडी जेवताहेत. बाहेर शेकडोंचा जमाव आणीबाणीविरुद्ध घोषणा देतोय... शेवटी वर्देची वरात निघाली....

इन्स्पेक्टर वागळे वर्देना म्हणाले, 'तुमचं घर अजबच आहे. पकडलं म्हणून तुमच्या बायकोला सांगायला गेलो तर ती हसते. म्हणते वाटच पहात होतो, जरा उशीरच केलात... माझी बायको असती तर बेशुद्धच पडली असती.'

सुधाताईंचा बेडरपणा इतकाच नाही. प्रा. वर्दे यांना मिसाखाली स्थानबद्ध केल्यानंतर त्या घरी स्वस्थ न बसता, मुलगी झेलम आणि त्या स्वत: आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह करू लागल्या. शेवटी त्यांनाही अटक झाली. अनेक सत्याग्रही तुरुंगात एकत्र आले. गुन्हेगारी महिलासोबत राहिल्या व तेथे या महिलांना साक्षर बनविण्याची जबाबदारी अंगावर घेतली.

मुलीसमवेत तुरुंगात असताना मुलगा अभिजित मॅट्रिकला होता. पतीही मिसाखाली स्थानबद्धतेत. अशा अवस्थेत आपल्या मुलाच्या अभ्यासाचं काय होणार, याची चिंता त्या करीत बसल्या नाहीत. उलट वय कमी असल्यानं मुलाला सत्याग्रह करता आला नाही म्हणून त्यांनी खंतच व्यक्त केलेली आहे.

आणीबाणीनंतर प्रा. वर्दे विधानसभेवर निवडून गेले व राज्याचे शिक्षणमंत्नी(education minister) बनले. बंगला आला, गाडी आली, परंतु दोघांनीही सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी केला. प्रा. वर्दे यांनी शिक्षणमंत्री असताना सर्व शिक्षकांचा पगार बँकेतून देण्याचा निर्णय घेतला. तो अमलात आणला. आज या निर्णयाचा लाभ असंख्य शिक्षक घेत आहेत.

सत्तेत आल्यावर लोकांकडून कायदेशीर-बेकायदेशीर कामं (legal-illegal work) करवून घेण्यासाठी कशाप्रकारे दबाव येत असत, याचे किस्सेही त्यांनी संयतपणे नमूद केलेले आहेत.

प्रा. वर्दे समवेत केलेल्या परदेशी दौ-यातील धमालही सांगण्यास त्या विसरलेल्या नाहीत. प्रा. वर्दे फेलोशिप मिळवून अमेरिकेला एक वर्षभर (by fellowship lived in USA)राहणार म्हणून त्याही त्यांच्यासमवेत गेल्या. तेथे त्यांच्या 'उद्योगी स्वभावा'मुळे निर्माण झालेला पेचप्रसंग वाचताना वेगळीच मजा येते.

सुधाताईच्या अनुभवसंपन्न जीवनातील कथा आपणापुढे आदर्श जीवनाचा पट अलगदरीत्या उलगडत नेतात. एका वेगळ्याच जीवनात घेऊन जातात.

Goshta Zaryachi, writer Sudha Varde Autobiography

गोष्ट झ-याची

लेखक : सुधा वर्दे

प्रकाशक : ग्रंथाली

पाने : १२८, किंमत : १५० रुपये.

Goshta Zaryachi, author Sudha Varde Autobiography

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive