Thursday, May 31, 2012

रेल चक्र - कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ! Load on shoulder

रेल चक्र - कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !








तो दिवाळीचा आदला दिवस होता. अंबरनाथ लोकलच्या पुढे डेक्कन एक्सप्रेस गेली आणि थोड्यावेळात अंबरनाथ मुंबई लोकल निघाली. लोकल उतारूंनी गच्च भरलेली होती. दोन डब्याच्या कपलिंकवरही लोक बसले होते. काहीजण लोकलच्या टपावरही होते. लोकलच्या पुढे डेक्कन एक्सप्रेस धावत होती. लोकल कुर्ल्याहून निघाली. डेक्कन एक्सप्रेस पुढे काढल्यामुळे लोकल दहा मिनिटे उशीरा धावत होती. त्यामुळे ही दहा मिनिटं भरून काढण्यासाठी मोटरमनला लोकल वेगाने चालवणं भाग होतं. तसं तो चालवतही होता. परंतु त्याला लोकल पुढे काही अंतरावर धुराळा दिसला. त्याने लोकलचा वेग कमी केला. धुराळ्यामुळे पुढे काय झालंय ते त्याला दिसत नव्हतं. परंतु त्यांच्या मनात विचार आला एवढा धुराळा रेल्वे लाइनीत उडतोय. म्हणजे एक्सप्रेसला अपघात झाला असावा. तेवढ्यात त्याला डेक्कन एक्सप्रेसचा एक डबा बाजूच्या रुळावर कलंडलेला दिसला. आता आपली लोकल डेक्कन एक्सप्रेसवर जाऊन आदळणार. ब्रेक लावून काही उपयोग होणार नाही आणि उलट आपला जीव जाणार असा विचार त्या मोटरमनच्या मनात येऊन गेला. कारण गेल्यावषीर् असंच घडलं होतं. मालगाडीच्या मागे लोकल होती. पुढे असलेल्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले होते. मोटरमनच्या लक्षात आलं की आपण कितीही प्रयत्न केला तरी लोकल मालगाडीवर आदळणार व आपला मृत्यू होणार. अपघात तर आपण वाचवू शकत नाही. निदान आपला जीव तरी वाचवू शकतो असा विचार करून त्याने कॅबमधून बाहेर उडी मारली होती. मोटरमन वाचला पण लोकल मालगाडीवर आदळली आणि प्रवाशांना जखमा झाल्या होत्या.

हा प्रसंग त्या अंबरनाथ लोकलच्या मोटरमन , जयंत निमसूडकरला आठवला. क्षणभर त्याला वाटलं , आपणही कॅबबाहेर उडी टाकावी व आपला प्राण वाचवावा , परंतु दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला... कॅबबाहेर उडी नाही टाकायची. प्राण गेला तरी चालेल परंतु अपघात वाचवायचा अटोकाट प्रयत्न करायचा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात त्याला यश मिळालंही. डेक्कन एक्सप्रेसच्या पडलेल्या डब्याच्या चार फुटाच्या अंतरावर त्याला लोकल थांबवण्यात यश आलं. लोकलमधून सगळे उतारू उतरले व त्यांनी मोटरमनकडे धाव घेतली. ते दृष्य पाहून मोटरमनला म्हणाले , ' काही म्हणा तुम्ही स्वत:चा जीव धोक्यात घालून हा अपघात होण्यापासून वाचवलात आणि आम्हाला वाचवलंत. नाहीतर उद्याची दिवाळी ही काळी दिवाळी झाली असती. तुम्हाला किती धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. ' रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्या मोटरमनला रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचं कौतुक केलं. तेव्हा निमसुडकर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना म्हणाला , ' आपण मला रोख रक्कम व प्रशस्ती पत्रक देऊन कौतुक केलं. याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. परंतु आम्हा मोटरमनच्या काही अडचणी आहेत , त्याचा विचार व्हावा अशी आपणास विनंती करतो. '

सिग्नल हा नेहमी रुळाच्या डाव्या बाजूलाच असायला हवा. पण अजूनही काही ठिकाणी असलेले सिग्नल हे रुळाच्या उजव्या बाजूला आहेत. त्यामुळे मोटरमन गोंधळतो व सिग्नल दिला नसतानाही गाडी पास करतो. म्हणजे सिग्नलच्या पुढे जातो. असे प्रकार वारंवार घडूनदेखील सगळे सिग्नल रुळाच्या डाव्या बाजूलाच बसवण्याचे प्रयत्न होत नाहीत. मेल एक्सप्रेस पॅसेंजर गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हरला एक असिस्टण्ट असतो. तो ड्रायव्हरला सिग्नलची स्थिती स्पष्ट करून सांगतो. ते अशी असते , आऊटर सिग्नल - राइट , होम सिग्नल - राइट , स्टार्टर राइट , अॅडव्हान्स स्टार्टर - राइट. त्यामुळे ड्रायव्हर आपलं संपूर्ण लक्ष गाडी चालवण्यावर केंदीत करू शकतो. शिवाय व्हॅक्युम कमी झालं , चेन ओढली इत्यादी घटना घडल्या तर असिस्टण्ट त्या गोष्टी ठीक करू शकतो. परंतु मोटरमनला असिस्टण्ट नसल्यामुळे ड्रायव्हिंग करणं व सिग्नलकडे लक्ष देणं , या व्यतिरिक्त चेन ओढली तर त्याकडे बघणं इत्यादी कामं एकट्यानेच पार पाडावी लागतात. त्याचं थोड जरी लक्ष विचलित झालं तर अपघात होण्याचा संभव असतो. एका मेल एक्सप्रेस गाडीतल्या उतारूंपेक्षा एका लोकल गाडीतल्या उतारूंची संख्या तिप्पट चौपट असते. असं असतानाही रेल्वे प्रशासन मोटरमनला असिस्टण्ट देण्याच्या विरोधात आहे. तेव्हा मोटरमनला असिस्टण्ट देण्यासंबंधी विचार व्हावा. ड्युटी संपल्यानंतर मोटरमन रनिंग रूममध्ये विश्राम करतो तेव्हा त्या रनिंग रूमची व्यवस्था नीट नेटकी असायला हवी.

मध्य रेल्वेतल्या उपनगरीय गाड्यांवर काम करणाऱ्या बहुतांशी मोटरमनची तक्रार आहे की काही ठिकाणी सिग्नलच्या जागा योग्य नाहीत. मोटरमन गाडी चालवताना सिग्नल त्याच्या दृष्टीक्षेपात असला पाहिजे आणि तो मोटरमनकॅबच्या डाव्या बाजूला असला पाहिजे. परंतु बऱ्याच ठिकाणी सिग्नल उजव्या बाजूला आहेत. त्यामुळे तो सिग्नल लाल अवस्थेमध्ये असतानादेखील ओलांडून जातो. त्याबद्दल त्याला शिक्षाही होते. मोटरमनला शिक्षा देण्यामध्ये रेल्वे सरकारची तत्परता दिसून येते. परंतु विधायक कारवाईच्या बाबतीत दिरंगाई होत राहते आणि मोटरमन शिक्षा भोगत राहतात.


- व्यंकटेश बोर्गीकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive