Tuesday, May 8, 2012

व्यक्तिवेध : विजय भटकर


व्यक्तिवेध : विजय भटकर


altभारतात मोबाइल क्रांती होऊ घातली असताना, त्या छोटय़ाशा यंत्रावर देवनागरी लिपी बसवणे हे एक मोठे आव्हान होते. भारतीयांना इंग्रजीचे अजिबात वावडे नसले, तरीही मोबाइलमध्ये ही लिपी बसवणे हा अस्मितेचाही प्रश्न होता. डॉ. विजय भटकर यांनी हे आव्हान स्वीकारले आणि आज भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतेक मोबाइल सेट्समध्ये देवनागरीचा अंतर्भाव होतो आहे. अमेरिकेने क्षणार्धात लाखो गणिते सोडवण्याची क्षमता असणारा महासंगणक भारताला देण्यास नकार दिला, तेव्हाही देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. डॉ. भटकर यांनी १९९१ मध्ये पहिला 'परम' हा महासंगणक तयार केला आणि देशाची मान उंचावली. संगणकाच्या क्षेत्रातील भविष्यवेत्ते असे त्यांचे वर्णन यासाठीच केले जाते.
केवळ नवे, अधिक शक्तीचे संगणक तयार करत असतानाच शिक्षणाच्या प्रसारासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी त्यांनी 'एज्युकेशन टू होम' हा प्रकल्प सुरू केला. भारताच्या शताब्दी वर्षांत जगातील माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश व्हावा, यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या 'इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटी' या विद्यापीठाचेही काम सध्या जोमाने सुरू आहे. जगातल्या महत्त्वाच्या संशोधकांमध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या डॉ. भटकर यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून आजवरचा जीवनक्रम व्यतीत केला आहे. शिक्षणात तत्त्वज्ञान असले पाहिजे आणि जगण्यालाही अध्यात्माची बैठक असली पाहिजे, अशी त्यांची जीवनधारणा आहे. त्यामुळे 'परम' महासंगणकाच्या उद्घाटनावेळी त्यांनी केलेल्या पूजेबाबत झालेल्या टीकेला उत्तर देण्याची त्यांना गरज वाटत नाही. विचारवंत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, शिक्षणप्रसारक, लेखक, धोरणकर्ते अशी अनेक बिरुदे मिरवतानाही पाय जमिनीवर ठेवण्याची त्यांची क्षमता म्हणूनच हेवा करण्यासारखी असते. दिल्लीच्या आयआयटीचे अध्यक्ष होण्याचा सन्मान त्यांना लाभला, तो याच अंगभूत गुणांमुळे. त्यांना शुभेच्छा देत असताना आयआयटीसारख्या संस्था अधिकाधिक जीवनसन्मुख करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतील, अशी आशा करायला हरकत नाही.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive