प्रत्येक खेडय़ाला, गावाला, शहराला इतिहास असतो. त्या इतिहासाचे आपण सर्वजण गोडवे गात असतो. आपल्या मुंबई शहराचेदेखील असेच आहे. या शहरालाही स्वतचा वेगळा इतिहास आहे. सर्वसाधारणपणे सामान्य मुंबईकराला या शहाराचा इतिहास ज्ञात आहे तो म्हणजे फार पूर्वी हे शहर सात बेटांचं होतं आणि ब्रिटिशांनी ही सात बेटं एकत्र जोडली आणि त्या बेटांचं हे शहर तयार झालं, एवढाच. परंतु या शहरांमध्ये किती खेडी होती, त्यांची नावं काय किंवा या खेडय़ांना ती नावे कशी पडली आदींची तसेच या शहरामध्ये कधीकाळी युद्ध झाली होती काय याची माहिती कुणालाही नसते किंवा ती माहिती जाणून घ्यायची उत्सुकताही नसते..
या मुंबईवर इतर मुंबईकरांप्रमाणेच प्रेम करणारा, त्या प्रेमापोटी स्व-खर्चाने मुंबई शहर पायाखाली घालणारा असाच एक अवलिया या शहरात गेली कित्येक वर्षे राहत आहे.. फक्त मुंबईच नव्हे तर एकूण महाराष्ट्राच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामाजिक जडणघडणीवर अभ्यास करणारा एक मुंबईकर म्हणजे रवींद्र लाड. हे गृहस्थ मुंबईच्या पूर्व उपनगरातील ‘मुचलिंद’ म्हणजे मुलुंड येथे गेली ३० वर्षे राहात आहेत. लौकिकार्थाने रवींद्र लाड हे इतिहासाचे संशोधक नव्हेत. खरे तर ते आकडेमोडीच्या व्यवसायातले. सुमारे ३० वर्षे त्यांनी आपटे उद्योगसमुहाच्या अकाऊंटस् विभागामध्ये आकडेमोडीसारख्या रुक्ष वातावरणात काढली. परंतु अशा रुक्ष वातावरणात राहूनसुद्धा आपली जिज्ञासा मात्र सतत जागृत ठेवली. त्यातूनच रवींद्र लाड हे आजचे आघाडीचे इतिहास अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या कला विभागाचे प्रमुख त्याचप्रमाणे कोकण इतिहास परिषद संस्थेच्या उभारणीच्या कामातदेखील ते गुंतले आहेत. त्यांच्या नावावर आज अनेक शोध-निबंध असून काही पुस्तकांचे संपादनदेखील त्यांनी केले आहे. कुठल्याही प्रकारे पूरक वातावरण नसतानाही इतिहासाशी नाते कसे जोडले असे विचारल्यावर रवींद्र लाड म्हणाले, एखादी घटना तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकून जाते, तसेच काहीसे माझ्याबाबतीत घडले. त्याचं असं झालं की, १९७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३०० वा सोहळा रायगडावर साजरा करण्यात येणार होता. या सोहळ्यास तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील उपस्थित राहणार होत्या. त्याचप्रमाणे इतर शिवप्रेमींप्रमाणे मीदेखील उपस्थित होतो. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर यांची भेट झाली व त्यातूनच इतिहास या विषयाची आवड उत्पन्न झाली. त्यांच्याच सल्ल्याने शिवपूर्वकालीन महाराष्ट्राचा अभ्यास सुरू केला. इतकेच.
याच आवडीतून पुढे बखरी वाचणे, त्याचा अर्थ समजून घेणे, इतिहासाचे संशोधक, अभ्यासकांच्या भेटी घेणे व यातून मुंबई शहर हा विषय ठरवून त्या दिशेने अभ्यासास सुरुवात केली.
आजचे मुंबई शहर आणि पूर्वीचे मुंबई शहर यावर काय भाष्य कराल? लाड म्हणाले, आपण कल्पनाच करू शकणार नाही. इतर मुंबईकरांप्रमाणे मलासुद्धा मुंबईचा इतिहास दीडशे वर्षाचा माहीत होता. परंतु या शहराला इ.स. पूर्व २५० चा इतिहास आहे. या शहरात किती खेडी होती, त्याची नावे कुणी व कशी दिली तसेच यावर कुणाची सत्ता होती याचा अभ्यास केला असता खूपच नवीन माहिती मिळाली.
उदाहरणार्थ, आपले मुलुंड शहर. या नगराला प्रश्नचीन इतिहास आहे. ‘मुंबादेवी’वरून मुंबई हे नाव या शहराला दिले गेले, तसेच काहीसे मुलुंडबद्दल आहे. सम्राट अशोकाची सत्ता इ.स. पूर्व २५० च्या सुमारास कोकणावर होती. त्याकाळी सोपारा, कल्याण, घारापुरी, ठाणे ही आसपासची प्रमुख बंदरे होती व त्या मार्गाने व्यापारी, भिक्षुक, प्रतिष्ठित नागरिक यांची ये-जा सुरू असे. काही बौद्ध भिक्खू येथेच येऊन स्थायिक झाले व त्यांनी त्यांच्या देव-देवतांच्या नावाने येथील गावांना नावे दिली. ‘तारा’ या देवतेवरून तारापूर तर ‘महाबली’ या देवाच्या नावावरून माहूल असे नाव रूढ झाले. ‘आरा’ या देवतेच्या नावामुळे ‘आरे’ असे नामांकन झाले. त्याचप्रमाणे ‘मुचलिंद’ या नाग राजावरून मुळंद, मुलंद असे अपभ्रंश करीत आजचे मुलुंड हे नाव रूढ झाले. मुलुंड हा शब्द आपल्याला ‘नालंद’ या विद्यापीठाच्या नावाची आठवण करून देतो. मुलुंड या नावाचा लिखित पुरावा इ.स. दहाव्या शतकातील शिलाहारकालीन शिलालेख व ताम्रपटात आढळतो. आजचे मुलुंड हे अगदी छोटेसे आणि आटोपशीर असे उपनगर आहे. परंतु त्याकाळी कांदिवली, बोरिवली, कान्हेरी गुंफा, येऊरचे जंगल, घोडबंदर, नाहूर, पवई, भांडुप हा सर्व प्रदेश मुलुंडमध्येच समाविष्ट होता हे सांगताना लाड इतिहासात घेऊन जातात. लाड म्हणाले, इ. स. १०४५ ते १०७० या काळात मुमुणिराजा येथे राज्य करीत होता व तसा उल्लेख या ताम्रपटात असून तेव्हाही मुलुंड असाच उल्लेख आहे. त्याचप्रमाणे मुलुंडच्या माहितीचा आणखी एक ताम्रपट भांडुप येथे सापडला असून इ. स. १०२० ते १०३५ या काळातील राजा छित्तदेव याचा आहे. या ताम्रपटात मुलुंड या गावाची सीमारेषा दाखविण्यात आली आहे. तसेच ठाणे परिसरातील ६६ गावांमध्ये मुलुंड या खेडय़ाचा अंतर्भाव केला होता. या खेडय़ाच्या पूर्वेस गोवणिग्राम म्हणजेच आजचा ‘गव्हाणपाडा’ आहे व इथूनच गव्हाणी नदी वाहत असे. जी गव्हाणी नदी आज ‘आनंद नगरचा नाला’ म्हणून ओळखण्यात येतो. तसेच ‘नोऊर ग्राम’ म्हणजेच नाहूर जो आज भांडुपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याच खेडय़ातून पश्चिमेला राजमार्ग म्हणजेच राजपथ जात असे ज्याला लालबहादूर शास्त्री मार्ग म्हणून आपण ओळखतो. रवींद्र लाड मुलुंडची ओळख करून देत असताना आपण अगदी दिङ्मुढ होत असतो. लाड म्हणाले, मुंबईतील इतर उपनगरांपेक्षा मुलुंड या गावाचे वेगळेपण म्हणजे या नगराची रचना. प्रश्नचीन वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांनुसार हे नगर कमळ फुलाच्या पाकळ्यासारखे डोंगर व टेकडय़ांच्या रांगामध्ये एकात एक गुंफलेले आहे व पवई येथील तलाव हा त्यांच्या मधोमध विसावलेला दिसून येतो व याची जाणीव मुलुंडमध्ये आलेल्या प्रत्येक नवीन माणसाला होते.. मुंबईचा अज्ञात असलेला हा सारा इतिहास ज्ञात करून घेण्यासाठी मुंबईला अशा अनेक रवींद्र लाडांची गरज आहे!
विकास नाईक
No comments:
Post a Comment