Thursday, May 31, 2012

रेल चक्र - धरमपुरी बाबा का हुकूम Railway order from Dharmpuri baba snakebite

रेल चक्र - धरमपुरी बाबा का हुकूम

परिचलन विभागात काम करणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्टेशन मास्तर. या स्टेशन मास्तरांना रेल्वेकडून युनिफॉर्म मिळतो. त्या युनिफॉर्मचा आकार व स्टेशन मास्तरांच्या शरीराचा आकार यांचं सख्य कधीच जमायचं नाही. त्यामुळे सगळ्यांनी तक्रारी केल्या. युनिफॉर्म देण्याअगोदर माप घ्यायला एक शिंपी यायचा. परंतु माप घेतलं तरी युनिफॉर्मच्या मापात माफक फरक पडायचा. त्यामुळे मिळालेले युनिफॉर्म शिंप्याकडून अंगाला येतील असे शिवून घ्यावे लागत असत. पूवीर् दक्षिण रेल्वेचे स्टेशन मास्तर पॅण्ट घालण्याऐवजी धोतर गुंडाळत , वरून कोट घालत व टाय बांधत. खरं म्हणजे या त्यांच्या मजेशीर पोषाखाकडे पाहून हसूच येई.

छोट्या छोट्या स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरांना ड्युटीनंतर वेळ घालवायचा कसा , हा प्रश्न पडत असे. गावं स्टेशनपासून दूर असायची. स्टेशनवरच्या रेल्वे क्वार्टर्समध्ये यांची राहण्याची सोय असायची. नवविवाहित जोडपी एकत्र राहायची. तेही क्वचितच कारण बायको कुरकुरायची , की इथे वेळ अजिबात जात नाही. इतर मास्तरांसारखं शहरात घर करा. मुलांच्या शिक्षणासाठी शहरात घर केलेले मास्तर दिसायचेही.

पण काही बायका हेका न सोडता शहरात घर करण्याचं टुमणं लावायच्या व आठवड्याच्या सुट्टीला येत जा , असं सांगायच्या.

त्यामुळे बहुतांश लहान स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरांना मुलं होण्यापूवीर्च वेगळं घर किंवा मुलं झाल्यानंतरही वेगळं घर करावं लागे. या मास्तरांना मॅरिड बॅचलर म्हणत असत आणि या लहान स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरांना टू टाइम्स पीपल म्हणत असत. म्हणजेच दोन लाइनची माणसं कारण , काम करत असलेल्या स्टेशनात एक मेनलाइन व एक लूपलाइन असायची. तर इथे ते त्याही अर्थाने लागू होत असे.

गाणगापूर स्टेशन हे दत्ताचं प्रसिद्ध ठिकाण आहे. रात्री दीडच्या सुमारास एक बैल गाडी स्टेशन समोर येऊन थांबली. घोंगड्यात लपेटलेल्या एका माणसाला चौघांनी उचलून स्टेशनसमोर निजवलं व म्हणाले , ' मास्तरसाहेब याला साप चावलाय '.

मी लगेच म्हणालो , ' त्याला इथे का आणलाय डॉक्टरकडे घेऊन जा. '

' अहो मास्तर साप चावला की लोक इथेच येतात फोनवरून मंत्र सांगतात. '

' काय ?' माझ्या टाळक्यात काहीच शिरेना. तेवढ्यात स्टेशनातला एक वयस्कर हमाल माझ्याकडे आला व म्हणाला , ' मास्तरसाहेब तुम्ही नवीन कामाला लागलात त्यामुळे तुम्हाला माहीत नाही. कंट्रोलरला सांगा ' स्नेकबाइट केस ' आहे म्हणून. ते सगळी कामं बाजूला ठेवून ताबडतोब या माणसाची माहिती घेऊन मंत्राची व्यवस्था करतील. '

मी कंट्रोलरला माणसाला साप चावल्याचं सांगितलं. कंट्रोलरला हवी असलेली त्या माणसाची माहिती दिली. कंट्रोलरने सगळं काम थांबवलं व पाच मिनिटांच्या आतच त्यांनी रिंग दिली व सांगितलं , ' त्या साप चावलेल्या या माणसाला उठवून बसवा त्याच्या कानात एकसारखं म्हणा - ' धरमपुरी बाबा के हुकूमसे साप नही काटा उठ जाओ आणि त्याला झोपू देऊ नका. '

हे मी त्या खेडूतांना सांगायचा अवकाश , ते त्या माणसाच्या कानाशी म्हणत राहिले. थोडा वेळ गेल्यावर त्या माणसाने डोळे उघडले. त्याला लिंबाचा पाला खायला दिला. त्या खेडूतांनी येताना सोबत लिंबाचा पाला आणला होता. त्याने लिंबाचा पाला खाल्ला व दोन-चारदा चावून थुंकला. तसं तो वयस्कर हमाल म्हणाला , ' त्याने पाला थुंकला बा मग त्याचं विष उतरलं. '

त्यानंतर मला स्नेकबाइट प्रकरण समजलं. यानंतर बरीच साप चावल्याची प्रकरणं ड्युटीवर घडली. तेव्हा वैद्य डॉक्टरांच्या कमतरतेमुळे साप चावला की जवळच्या रेल्वे स्टेशनात जायचं असं जणू ठरूनच गेलं होतं. रेल्वे नुसती प्रवाशांचीच काळजी घेते असं नाही , तर माणुसकीच्या बांधिलकीची बूज राखते अन् रेल्वेने प्रवास न करणाऱ्या लोकांचीही विना मूल्य सेवा करते.

- व्यंकटेश बोर्गीकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive